जामखेड शहरात दिवसाढवळ्या चोर्‍यांचे सत्र सुरूच 


सामना प्रतिनिधी । जामखेड 

शहरातील मराठी शाळेमागील दत्तनगर भागातील भरवस्तीती सोमवार दुपारी दोनच्या सुमारास घरफोडी होऊन अडीच तोळे सोने व रोख ७० हजार रुपये चोरटे घेऊन पसार झाले. दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडी मुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दत्तनगर भागातील रवींद्र परदेशी वय ४१ हे साडेबाराच्या सुमारास शहरात सोनारगल्ली भागात राहणारे आपले बंधू मुकुंद  परदेशी यांच्या घराच्या वास्तूशांतीसाठी सहकुटुंब गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रवींद्र परदेशी यांच्या घराचे कुलूप तोडून बहिणीने हॉलमध्ये ठेवलेल्या पिशवीतील पर्समधून अडीच तोळे सोने, पाच हजार रोख व इतर कॉस्मेटिक साहित्य तर रवींद्र परदेशी यांच्या कपाटातून रोख ५८ हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. रवींद्र परदेशी हे वास्तूशांती उरकून घरी अडीच वाजता आल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून फेकून दिलेले निदर्शनास आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

याबाबत जामखेड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले आहेत पुढील तपास सुरू आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. शहरातील स्टेट बँक परिसरातील झालेल्या चोर्‍यांचा तपास लागला नाही तोच पुन्हा भरदुपारी चोरी झाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.