पाथरीतील ज्ञानेश्वर नगरात दरोडा

सामना प्रतिनिधी । पाथरी

परभणीच्या पाथरी शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकुळ घातला आहे. शनीवारी पहाटे शहरातील ज्ञानेश्वरनगर मधील एका घरात 5 दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून महिलांच्या गळ्यातील दागिने आणि 70 हजार रुपये लुटून पोबारा केला.दरोडेखोरांनी लोखंडी सळ्यांचा धाक दाखवत सुभाष गरड यांच्या घरातील जवळपास अडीच लाखांचा मुद्देमाल लुटुन नेल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी पहाटे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुभाष गरड त्यांच्या पत्नी लताबाई आणि मुलगी वर्षा झोपेत असताना 5 दरोडेखोर कुलूप तोडून घरात घुसले. त्यांनी लोखंडी सळईचा धाक दाखवत घरातील सर्व दागीने आणि रोख रक्कम लुटून नेली. यामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचा हार ,सोन साखळी, कर्णफुले, मोबाईल आणि 70 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे फरार झाले. या प्रकरणी पाथरी पोलीसांनी गरड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक पोलीस करत आहेत.