जामखेड तालुक्यात चोरट्यांचा हल्ला, दोन व्यक्ती गंभीर जखमी

1
jamkhed-injured

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून पकडले जाऊ नये म्हणून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही सुरू आहेत. जामखेडच्या धोत्री गावात अशीच घटना घडली असून चोरट्यांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

धोत्री गावातील अजिनाथ निवृत्ती जाधव हे त्यांच्या कुटुंबासह शेतात वस्तीवर असतात. मध्यरात्री अंदाजे 8 ते 9 चोरट्यांनी घरावर हल्ला केला. चोरट्यांनी धारदार हत्याराने आजीनाथ निवृत्ती जाधव (वय ६०) आणि नर्मदा आजीनाथ जाधव (वय ५५) यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन मुले सुना नातवंडे यांनादेखील जबर मारहाण करून ७५ हजारांची दागिने रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती समजताच गावातील लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अजिनाथ जाधव यांना जास्त मार लागलेला असल्यामुळे त्यांना प्रथमोपचार करून तात्काळ पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.