दसाने गावात तीन लाखांचा दरोडा

सामना ऑनलाईन । सटाणा

नाशिकमधील सटाणा तालुक्यातील दसाने गावापासून २ कि. मी. अंतरावर मळ्यात राहणाऱ्या केवल खैरनार यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यात खैरनार दाम्पत्याला जबर मारहाण करून सुमारे तीन लाख रुपयांची रोकड व तब्बल २० तोळे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोरांनी तिथून पोबारा केला आहे.

दसाने तळवाडे रस्त्यावरील आपल्या मळ्यात केवल खैरणार (५४) व त्यांची पत्नी सुशीला खैरणार (५०) दोघेही राहतात. रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुशीला यांना घरावरील पत्र्यांचा आवाज आल्याने जाग आली. त्याच वेळी अज्ञात दरोडेखोर दरवाजावर लाथा मारून ते घरात घुसले. तोंडाला काळे कापड बांधलेले सातही दरोडेखोर शुद्ध अहिराणी भाषा बोलत होते. त्यांनी कपाटाची चावी देण्यास विरोध केल्याने त्यांनी दरोडेखोरांनी केवल देवचंद खैरनार यांना डोक्यात लोखंडी गज मारल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. त्यामुळे सुशीला यांनी दरोडेखोरांना कपाटाची चावी दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरात दोन तास उच्छाद मांडत कपाटासह घराची मोडतोड केली. तसेच कपाटातील तीन लाख रुपयांवर आणि २ तोळे दागिन्यांवर डल्ला मारत दोन तासांनंतर सातही दरोडेखोर पसार झाले.

पहाटे खैरनार शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना घरी दरोडा पडल्याचे सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी तातडीचे श्वानपथकाला बोलावले. मात्र दरोडेखोरांचा माग दाखवण्यास अडचणी निर्माण होत आहेत.