संगमेश्वरला बंद घरातून ७ लाखांचा ऐवज लंपास

सामना प्रतिनिधी, देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे रेमजे वाडीतील एक महिना बंद असलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने ७० हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि ६ लाख ६० हजारची रोकड असा ७ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

संगमेश्वर पोलीस गेले दोन दिवस कुचांबे परिसरात ठाण मांडून असून श्वान पथकासह ठसे तज्ञाच्या हातीही फारसे काही लागलेले नाही. त्यामुळे चोरट्याला जेरबंद करण्याचे आव्हान संगमेश्वर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. कुचांबे रेमजेवाडीतील शुभांगी रेमजे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. १९ जुलै ते २१ ऑगस्ट या काळात शुभांगी रेमजे या कामानिमित्त नातेवाईकांकडे गेल्या होत्या. २१ ला आल्यावर घरात प्रवेश करताच वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहून त्यांना संशय आला. कपाट उघडून सोने आणि रोख रक्कम गायब असल्याचे दिसताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक महेश थिटे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

रेमजे यांनी केलेल्या तक्रारीनुसार ५५ हजार ५०० रुपये किमतीच्या विविध आकारच्या सोन्याच्या अंगठ्या, ४५०० रुपये किमतीच्या लेडीज अंगठ्या, ४००० किमतीचे सोन्याचे झुमके, ४ हजारचे रिंगजोड, २ हजारांची सोन्याची पाने असा ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज तर ६ लाख ६० हजारची रोकड असा ७ लाख ३० हजार किमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.