मुस्लिमांनी मानसिकता बदलावी; प्रश्नही सुटतील

>>केशव आचार्य<<

संपूर्ण जगात स्वतःची जी प्रतिमा रोहिंग्यांनी स्वतःच निर्माण केली आहे ती नष्ट करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून दूर राहावे लागेल. हिंसा आणि प्रतिहिंसेमुळे कुठलाही प्रश्न सुटत नाही. उलट तो जास्त कठीण बनतो. केवळ रोहिंग्या मुस्लिमांनीच नाही, तर इतरही सर्व मुस्लिम लोकांनी आणि त्यांच्या संघटनांनी हे ध्यानात ठेवण्याची गरज आहेहिंदुस्थानमधील काही राजकीय नेते येथील मुस्लिमांच्या या धर्मांध वृत्तीला खतपाणी घालत आहेत, पण विचारी आणि शांतताप्रेमी मुस्लिमांनी त्यांना भीक घालू नये. त्यांनी आपली मानसिकता बदलावी. त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्यास मदतच होईल.

फडतूस मानवतावाद’ हे संपादकीय (‘सामना’, दि. २३ सप्टेंबर २०१७) तथाकथित बुद्धिवंतांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरावे. आपल्याकडील मानवाधिकारवाद्यांचा मानवतावाद सज्जनांच्या अधिकारापेक्षा दुर्जनांच्या (यात दहशतवादीही आले) अधिकाराबाबतच अधिक दक्ष असतो. देशाचे रक्षण करणारे सैनिक कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शोधत असताना तेथील पाकसमर्थक तरुण त्यांच्यावर दगडफेक करतात आणि दहशतवाद्यांना पळून जायला मदत करतात. या गुंडांवर पॅलेट गन्सचा मारा केला तर मानवाधिकार आयोगवाले त्या सैनिकांना दोषी धरतात. जणू काही देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना मानवाधिकार नाहीतच!

दुसरीकडे रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न हा मुळात त्यांनीच निर्माण केला आहे. बौद्धबहुल म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी बौद्ध जनतेवर आणि तेथील सैनिकांवर प्रथम हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आपले स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समता, क्षमा, शांती ही बौद्ध जनतेची तत्त्वे असली तरी तेथील लष्करी शासनास हे सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यांचे बंड मोडून काढले. म्यानमारमध्ये हिंदू जर शांततेने राहू शकतात, तर ते रोहिंग्या मुस्लिमांना का जमू नये याचा रोहिंग्या समर्थकांनी विचार करावा. बांगलादेश या मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान हसिना शेखसुद्धा रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय द्यायला तयार नाहीत. अनेक रोहिंग्या मुस्लिमांचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत आणि त्यांच्यामुळे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येते असेच हिंदुस्थानप्रमाणे या राष्ट्राचेही मत आहे.

संपूर्ण जगात स्वतःची जी प्रतिमा रोहिंग्यांनी स्वतःच निर्माण केली आहे ती नष्ट करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून दूर राहावे लागेल. हिंसा आणि प्रतिहिंसेमुळे कुठलाही प्रश्न सुटत नाही. उलट तो जास्त कठीण बनतो. केवळ रोहिंग्या मुस्लिमांनीच नाही, तर इतरही सर्व मुस्लिम लोकांनी आणि त्यांच्या संघटनांनी हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. इसिस, अल कायदा, लश्कर ए तोयबा, सिमी, हिजबुल मुजाहिद्दीन इत्यादी मुस्लिम संघटनांनी जगात जो कमालीचा हिंसाचार चालवला आहे. त्यांनीच जगात अनेक ठिकाणी ‘इस्लामिक आतंकवाद’ हा शब्द रूढ केला आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांत आणि अमेरिकेत सर्वच मुस्लिम लोकांकडे संशयाने पाहिले जाते. जपानमध्ये मुस्लिम लोकांना नागरिकत्व देऊ नये असा नियम आहे. ‘एका निष्पाप व्यक्तीला मारले, तर तो सबंध मानवजातीविरुद्ध गुन्हा ठरतो’ असे इस्लामचे एक चांगले तत्त्व आहे, परंतु प्रत्यक्षात जगात जे अनेक आतंकवादी हल्ले झाले आहेत, त्यातील बहुतेक मुस्लिमांनी केले आहेत आणि त्यात अनेक निष्पाप लोक मारले गेले आहेत (सर्व मुस्लिम आतंकवादी नाहीत हेदेखील खरेच).

दहशतवादी आणि धर्मांध मुस्लिमांच्या हिंसाचारामुळे इस्लाम बदनाम होत आहे. याबाबत सर्व शांतताप्रेमी मुस्लिमांनी अधिकाधिक प्रबोधन करायला हवे. हिंसाचारी मुस्लिमांवर बहिष्कार टाकायला हवा. महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, भूतपूर्व न्यायमूर्ती महंमद अली छागला यांचे आदर्श समाजापुढे ठेवायला हवेत. हिंसाचारी कृत्यांची निर्भर्त्सना करायला हवी. आपला धर्म शक्यतो खासगी जीवनापुरता मर्यादित ठेवून त्याला राजकारणात थारा देऊ नये. आपण ज्या देशात राहतो त्या देशाशी इमान राखण्याचा प्रयत्न सर्व मुस्लिमांनी करायला हवा. ‘पाण्यात राहून माशाशी वैर करू नये’, ‘जसा गाव तसा वेश’ या अर्थपूर्ण म्हणींपासून बोध घ्यावा.

धर्माच्या आधारावर हिंदुस्थानचे दोन तुकडे करून पाकिस्तान नावाचे मुस्लिम राष्ट्र निर्माण केल्यावर पुन्हा हिंदुस्थानमध्ये काही मुस्लिम धर्माच्या आधारावर आरक्षण आणि सवलती मागत आहेत. येथील बहुसंख्य हिंदूही केवळ धर्माच्या आधारावर या गोष्टी मागत नाहीत. तरीही हिंदूंनी ‘हिंदुस्थान’, ‘हिंदू राष्ट्र’ असे शब्द वापरल्यास त्यांना हे पाक निर्माते मुस्लिम आणि त्यांचे समर्थक  ‘सांप्रदायिक’, ‘कम्युनल’ म्हणून हिणवत असतात आणि हा देश ‘सेक्युलर’, ‘धर्मनिरपेक्ष’ आहे म्हणून सुनवत असतात. हिंदुस्थान त्यांना सेक्युलर असावा असे वाटते; परंतु त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या पाकिस्तानने अथवा अन्य मुस्लिमबहुल राष्ट्रांनी सेक्युलॅरिझम स्वीकारला नाही हे मात्र त्यांना खटकत नाही. मुस्लिम अल्पसंख्य असतात त्या देशात सेक्युलॅरिझम हे आदर्श तत्त्व आणि तिथे अल्पसंख्य मुस्लिमांना विशेष अधिकार असावेत आणि मुस्लिमबहुल देशात मात्र शरीयतप्रमाणे कायदे असावेत आणि अल्पसंख्य मुस्लिमेतरांनी तिथे भीत भीत जगावे अशी बहुतेक धर्मांध मुस्लिमांची मानसिकता दिसते. हिंदुस्थानमधील काही राजकीय नेते येथील मुस्लिमांच्या या धर्मांध वृत्तीला खतपाणी घालत आहेत, पण विचारी आणि शांतताप्रेमी मुस्लिमांनी त्यांना भीक घालू नये. त्यांनी खऱ्या सेक्युलॅरिझमचा प्रचार जगात केला पाहिजे आणि हिंदुस्थानमध्ये तो प्रामाणिकपणे पोसला पहिजे. मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर आपली ‘व्होट बॅंक’निर्माण होऊ देऊ नये. राजकीय नेते मुस्लिमांचा ‘व्होट बॅंक’म्हणून कसा दुरुपयोग करतात याचे ताजे उदाहरण नुकतेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. मोहरमच्या दिवशी दुर्गादेवीचे विसर्जन करण्यास मनाई करण्याचा फतवा त्यांनी काढला. आपल्या संविधानाच्या हे विरुद्ध होते. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने तो फतवा रद्द केला आणि ‘‘दोन समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचा ममता बॅनर्जी यांचा हा प्रयत्न आहे’’ असे ताशेरे ओढले. ममता बॅनर्जी यांच्यावर यामुळे सर्वत्र टीका होत आहे. दुर्गापूजा आणि मोहरम हे एकाच वेळी शांततेत साजरे होऊ शकतात हे जनतेने सिद्ध करून दाखवावे. म्हणजे धर्मांध राजकीय नेत्यांचे स्वार्थी हेतू साध्य होणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी अयोध्येत राममंदिर बांधावे, मशीद अन्यत्र बांधावी  असे काही शांतताप्रेमी मुस्लिम म्हणतात. त्यास बहुसंख्य मुस्लिमांनी पाठिंबा दिला तर अयोध्या प्रश्नावर राजकारण करणे बंद होईल.

‘‘मुस्लिमांनी गोल टोपी घालून स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण करू नये, औरंगजेब, गझनी यांचा अभिमान बाळगू नये, गौरव करू नये’’ असे थोर गांधीवादी, समाजवादी नेते आणि भूतपूर्व कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य डॉ. राम मनोहर लोहिया म्हणत असत. मुस्लिमांनी राजकारणात धर्म आणला नाही, खरा सेक्युलॅरिझम पाळला तर ते कोणत्याही देशात शांतपणे राहू शकतील.

युनोने जगातील सर्व देशांना जरी शरणार्थींना आश्रय देण्याची विनंती केली आणि ती संबंधित देशांनी मान्य केली तरी ही तात्पुरती मलमपट्टी ठरेल. युनोकडून कायमचा तोडगा निघणे कठीण आहे. कारण शरणार्थी निर्माण होण्यास जो हिंसाचार कारणीभूत होतो, त्याला शस्त्रास्त्रs आणि युद्धसामग्री आवश्यक असते आणि युनोमधील प्रबळ राष्ट्रे या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा व्यापार करतात. कायमचा उपाय म्हणजे प्रत्येकाने मानवता, अहिंसा आणि शांती ही तत्त्वे अंगिकारणे. शांततेचा संदेश जगात आणि युनोमध्येही प्रभावी ठरला तर शस्त्रास्त्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर, आयात- निर्यातीवर बंदी घालता येईल. असे झाले तर ‘शरणार्थी’ ही संकल्पना नामशेष होईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपण राहतो त्या देशावरील निष्ठाsला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे.