रोहिंग्या घुसखोरांचा वाढता धोका

ब्रिगेडियर हेमंत महाजन

ज्याप्रमाणे प. बंगाल आणि आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मतपेटीकरिता उपयोग केला जातो  तसाच उपयोग कश्मीरातील राजकीय पक्ष भविष्यात रोहिंग्या घुसखोरांचा मतदार म्हणून करतील. एका कायद्यान्वये जम्मू-कश्मीर विधानसभेत कश्मिरी मुस्लिमांचे वर्चस्व असावे अशी सोय करून ठेवण्यात आली आहे. आता जम्मूमधील रोहिंग्या घुसखोरांमुळे जम्मू भागातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि ते फुटीरतावाद्यांच्या पथ्यावर पडू शकतात.

बांगलादेश सीमेला लागून असलेल्या राखिने या राज्यातून रोहिंग्या मुसलमान हे पश्चिमेला बांगलादेशात घुसतात किंवा उत्तरेला ईशान्य हिंदुस्थानातील मिझोराम, मणिपूर, नागालँड या राज्यांत स्थलांतर करतात. परंतु ते बंगाली बोलू शकतात. त्यामुळे सामान्य हिंदुस्थानी त्यांना बंगालीच समजतो. २०१५ मध्ये नागालँडच्या दिमापूर शहरात एका नागा मुलीच्या बलात्काराच्या आरोपीला नागा लोकांनी कारागृहाच्या बाहेर काढून ठेचून मारले. हा आरोपी बांगलादेशी होता आणि नागालँडमधील वाढत्या बांगलादेशी घुसखोरीबद्दल हा असंतोष उफाळून आला होता. एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या घटनेनंतर नागालँडमधील जवळपास ४ हजार रोहिंग्या मुस्लिमांनी हिंदुस्थानात अन्यत्र आश्रय घेतला आहे. बांगलादेशात उपजिवीकेची सोय होत नसल्याने रोहिंग्या समुदाय हिंदुस्थानात स्थलांतरित होत आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने प. बंगालमधील बर्धमान स्फोटप्रकरणी हैदराबादमधून खालीद मुहम्मद या व्यक्तीस अटक केली. ही व्यक्ती राखिने राज्यातील ‘रोहिंग्या एकता’ या अतिरेकी संघटनेची सदस्य आहे.

काही अभ्यासकांच्या मते रोहिंग्या मुस्लिमांची हिंदुस्थानातील संख्या ३६ हजारांपर्यंत आहे. परंतु ही आकडेवारी दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यात भर नक्कीच पडलेली असणार. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘इमिग्रेशन ब्युरो‘ने जुलै २०१५ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात १० हजार ५६५ रोहिंग्या बेकायदेशीरपणे स्थलांतरित असून त्यातील ६ हजार ६८४ हे केवळ जम्मू आणि कश्मीर राज्यातील हिंदूबहुल जम्मू भागात राहतात.

हिंदुस्थानातील बहुतांश रोहिंग्या शरणार्थी हे जम्मू किंवा दिल्लीचा पर्याय निवडतात. जम्मूमधील निर्वासितांना अनेक मुस्लिम सेवाभावी संघटनांकडून उपजीविकेसाठी मदत पुरविली जाते. हिंदुस्थानात अन्यत्र कागदपत्रांच्या अभावी अनेक अडचणी येतात, परंतु जम्मूत त्रास होत नाही. उलट अनेक व्यापारी त्यांचा वापर स्वस्त मजूर म्हणून करतात. ऑक्टोबर २०१५ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी रोहिंग्या शरणार्थींच्या मुलांसाठी सहा मदरशांची घोषणा केली होती. त्यामुळे त्या पक्षालादेखील रोहिंग्या घुसखोर हवे आहेत असे दिसून येते. जम्मू आणि कश्मीर राज्याचे लोकसंख्याशास्र पाहता जम्मू हा हिंदूबहुल भाग असून कश्मीर खोरे मुस्लिमबहुल आहे. पाकपुरस्कृत फुटीरतावादी कारवायांना जम्मू भागात कधीच शिरकाव करता आलेला नाही. त्यामुळे रोहिंग्या शरणार्थींचा वापर फुटीरतावादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ज्याप्रमाणे प. बंगाल आणि आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मतपेटीकरिता उपयोग केला जातो  तसाच उपयोग कश्मीरातील राजकीय पक्ष भविष्यात रोहिंग्या घुसखोरांचा मतदार म्हणून करतील. १९९५  च्या J&K Representation of peoples Act अन्वये जम्मू-कश्मीर विधानसभेत कश्मिरी मुस्लिमांचे वर्चस्व असावे अशी सोय करून ठेवण्यात आली आहे. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात मतदारांची सरासरी संख्या ८३ हजार ५३ एवढी आहे, परंतु कश्मीर खोऱ्यातील मतदारसंघात मतदारांची सरासरी कमी असून जम्मू भागातील सरासरी त्यापेक्षा जास्त आहे. तसेच जम्मूमधील काही मतदारसंघांत मुस्लिमबहुल भाग जोडण्यात आले आहेत. येथील विधानसभा निवडणुकांत विजयी झालेले उमेदवार सरासरी ३ ते ४ हजार मतांनी निवडून येतात. तेव्हा जम्मूच्या वेगवेगळ्या भागांत स्थायिक झालेले रोहिंग्या घुसखोर पुढे जम्मू भागातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

शेख अब्दुल्लांच्या राजवटीत १९५२ मध्ये असंख्य उयघूर मुस्लिम कुटुंबांना (चीनमधून पळून आलेले) आणि श्रीनगरमधील जामिया मशिदीत वसाहत करून राहिलेल्यांना नागरिकत्वाचे पूर्ण हक्क देण्यात आलेले होते. त्याच भागात बक्षी गुलाम मोहम्मद यांच्या राजवटीत १९५९ मध्ये अनेक तिबेटी मुस्लिमांचे पुनर्वसन करण्यात आलेले होते. झिंझियांग प्रांतातील उयघूर मुस्लिम आणि तिबेटी मुस्लिम कम्युनिस्ट चीनच्या कोपापासून सुटका करून घेण्याकरिता कश्मीरमध्ये स्थलांतरित झालेले होते. याचसंदर्भात प. पाकिस्तानातून जम्मू प्रांतात येऊन राहिलेल्या निर्वासितांना नागरिकत्वाचे हक्क का नाकारण्यात आले हे पाहिले पाहिजे. बहुतांशी दलित-हिंदू पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचारांतून आणि छळांतून सुटका करून घेण्यासाठी प. पाकिस्तानातून जम्मूस स्थलांतरित झालेले होते. मात्र प. पाकिस्तानी हिंदू निर्वासित, कश्मिरी पंडित १९४७ सालापासून पूर्वग्रहदूषित प्रणालीचे बळी ठरले आहेत. अजूनसुध्दा ते निर्वासिताचे आयुष्य जगत आहे. जम्मू-आणि-कश्मीर हे हिंदुस्थानातले एकमेव राज्य असे आहे की, जिथे २० टक्के लोक पूर्ण राज्यावर उघडपणे तसेच आडूनही नियंत्रण करत असतात आणि सत्तेचा गैरवापरही करत असतात.

हिंदुस्थानात बांगलादेशी घुसखोरांचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. त्यात आता रोहिंग्या घुसखोर हिंदुस्थानला सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाही. आधीच फुटीरतावादाला बळी पडलेल्या जम्मू आणि कश्मीर राज्यात रोहिंग्यांची वाढती संख्या म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. बांगलादेशी घुसखोरीबद्दल तत्कालीन सरकारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आज उद्भवलेल्या परिस्थितीचा अनुभव पाठीशी असताना रोहिंग्या समस्येकडे दुर्लक्ष करणे ही मोठी घोडचूक ठरेल. यातून धडा घेत हिंदुस्थान सरकारने मलेशिया, थायलंड यांच्या मदतीने म्यानमारवर रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न सोडविण्यासाठी दबाव टाकणे गरजेचे आहे.

मुंबईतील आझाद मैदानावरील दंग्यानंतर एक मार्मिक एसएमएस आला. उत्तर कोरियात तुम्ही घुसखोरी केलीत तर तुम्हाला १२ वर्षे सक्तमजुरी मिळेल. इराणमध्ये घुसखोरी केलीत तर आजीवन कारावासाची शिक्षा होते. अफगाणमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलात तर बंदुकीची गोळी घातली जाते. सौदी अरेबियात कारावासाची शिक्षा होते. चीनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा पत्ता कधी लागत नाही. क्युबात प्रवेश केलात तर आयुष्यभर तुरुंगात सडावे लागेल. इंग्लंडमध्ये बेकायदेशीर प्रवेश केलात तर तातडीने खटला चालवून तुरुंगात रवानगी केली जाते. मात्र हिंदुस्थानात घुसखोरी केलीत तर तुम्हाला रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना आणि पासपोर्ट मिळेल. मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य सुविधाही मिळतील, नोकरीत आरक्षणही दिले जाईल. तुम्ही आमदार, खासदार, मंत्री बनाल. २०२१ च्या पूर्वी तुम्ही आसाम, प. बंगालचे मुख्यमंत्री पण बनाल.