
सामना ऑनलाईन । नवी मुंबई
महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आयोजित एसीटी (अॅक्ट फॉर कलेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन) कॉनक्लेव्हमध्ये ए.सी. पाटील तंत्रमहाविद्यालयाच्या रोहित इनकर या विद्यार्थ्याने आपले विचार मांडले. निरंतर प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राला अजून प्रगत बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या स्पर्धेत ए.सी. पाटील तंत्रमहाविद्यालयाला द्वितीय क्रमांकांचं पारितोषिक मिळालं. या स्पर्धेत समाविष्ट झालेल्या ‘प्रयोग’ नामक प्रकल्पाचं प्रतिनिधित्व रोहित इनकर या विद्यार्थ्याने केलं होतं. तब्बल २३ हजार प्रवेशिकांमधून ए.सी. पाटील तंत्रमहाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला.
हे पारितोषिक मिळाल्यानंतर झालेल्या सभेतही त्याने आपले विचार सर्वांसमोर मांडले. महाराष्ट्र आणि एकूणच हिंदुस्थानाला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्य आणि राष्ट्र तांत्रिकदृष्ट्या सबळ बनवणं गरजेचं असल्याचं तो म्हणाला. आपल्याला मिळालेलं पारितोषिक ही त्याच्या कामाला मिळालेली दाद असल्याचं त्याने नम्रतेने सांगितलं. या यशामध्ये ए. सी. पाटील तंत्रमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. बोरसे आणि इस्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिक विभागप्रमुख डॉ. अरुणा देवगिरे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल रोहितने त्यांचे आभार मानले.