“मी उभा आहे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

3

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यातील चकलांबा येथे दरवर्षी प्रमाणे दुष्काळी परिस्थितीतही चैत्री पोर्णिमा रोकडेश्वर हनुमान जन्मोत्सव व नाटक सादर करण्याची परंपरा जपण्यात आली. यावेळी सादर करण्यात आलेल्या “मी उभा आहे”ला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोर्णिमेच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत चकलांबा गावातून रोकडेश्वराची छबिना पालखी मिरवणूक काढण्यात आली.

सकाळी सूर्योदयाला 7 ते 8 हजार लोकांच्या उपस्थितीत ‘श्रीं’चा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वर्षी महापूजेचा मान सतीश देशमुख व रामराव कुलकर्णी यांना मिळाला. दुपारी 4 वाजता महाआरती, महाप्रसाद, संध्याकाळी प्रख्यात लेखक प्र. के. अत्रे लिखित राजकीय, सामाजिक विषय असलेले 3 अंकी नाटक ‘मी उभा आहे’ सादर करण्यात आले. पंचपदी गायन नाट्य मंडळ कलावंतांनी सादर केले. विशेष म्हणजे तरुण युवक व पुण्याहुन आलेल्या महिला कलाकारांनी निवडणूक विषयावर असलेले हे नाटक अत्यंत तयारीने व जल्लोषपूर्ण सादर केले.

हनुमान जन्मास नाटकाची ही सादर करण्याची ऐतिहासिक परंपरा 135 वर्षांपासून चकलांबा येथील तरुण पिढीने आजतागायत जपली आहे. नाटक पाहण्यासाठी दूर दूरच्या गावातून व पंचक्रोशीतून आप्तेष्ट, पाहुणे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या वर्षी मंडळाच्या वतीने प्रथम चकलांबा गावातील विविध क्षेत्रात करिअर केलेल्या यशस्वी भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला.

रात्री साडेबारा वाजता रोकडेश्वर मंदिरात दूध खारीक आरतीने व तिसऱ्या दिवशी खडीसाखर आरतीने या उत्सवाचा समारोप झाला.