कोणते देव? कोणते संत? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

rokhthok‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला!

संत आणि देवांच्या व्याख्या बदलाव्यात असे सध्याचे वातावरण आहे. चांगली माणसे कमी व संत आणि देवांचा आकडा जास्त अशी आपल्या समाजाची स्थिती आहे. संत आणि तथाकथित भगवंतांना लाखो आणि कोटी कोटी भक्त सहज मिळतात; पण गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धेच्या गर्तेत रुतलेल्या समाजाचे हाल काही संपत नाहीत. हरयाणातील एक ‘बाबा’ राम रहिम यास जगभरात पाच कोटी अनुयायी आहेत. हे पाच कोटी लोक राम रहिम यास देव मानतात. त्याच्यात देवाचा अंश आहे व हा देव कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो, या भ्रमातून त्याचे भक्त आता तरी बाहेर पडले असतील. बलात्काराच्या दोन आरोपांखाली राम रहिमला दोषी ठरवले तेव्हा तो मनाने कोसळला, हात जोडून दयेची भीक मागू लागला.

जो कायदा तो कालपर्यंत जुमानत नव्हता त्या कायद्यापुढे याचक म्हणून हात जोडून उभा होता. बाबा कायद्यापुढे दयेची भीक मागत होता तेव्हा बाहेर त्याचे लाखो अनुयायी हिंसाचार व जाळपोळ करीत सुटले होते. त्या हिंसाचारात ३५ लोकांना प्राण गमवावे लागले. भक्तांचा हा उन्माद कशासाठी तर आपल्या देवाची ताकद दाखविण्यासाठी त्यांना हिंसा करावी लागते. याच बाबाला २० वर्षांची सजा ठोठावली तेव्हा त्याच्यातून ‘देवाचे भूत’ उतरले. तो एक सामान्य माणूस म्हणून जमिनीवर गडबडा लोळू लागला व दयेची भीक मागणा-या त्या ‘देवा’स फरफटत तुरुंगात न्यावे लागले.

कायदा एकच!

मुसलमान समाज समान नागरी कायद्यास विरोध करतो, पण हिंदूंची श्रद्धास्थाने व देव, संतही कायद्याच्या कचाटय़ातून सुटत नाहीत. तामीळनाडूच्या मुख्यमंत्री असताना जयललिता यांनी कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनाच खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले तेव्हा आमच्या शंकराचार्यांनाही डोळ्यांत अश्रू व हात जोडून दयेची भीक मागताना पाहिले. जयललितांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी शंकराचार्य तयार होते. ‘संत’ म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले आसाराम बापूही बलात्काराचे आरोपी म्हणून तुरुंगात गेले व आजही तुरुंगातच आहेत. देव आणि संत म्हणवून घेणाऱ्यांचे पायही मातीचेच आहेत. भक्तांच्या हाती शस्त्र देऊन ते स्वतःभोवती कवचकुंडले तयार करतात. श्रद्धेच्या आड संपत्ती व शोषणाचे प्रकार घडतात व एखादी अबला त्याविरोधात एकाकी लढा उभा करते व संत, देवांचा पराभव करते.

पाठिंबा हवा

आसाराम बापूंपासून बाबा राम रहिमपर्यंत सगळेच संत व देव हे राजकारण्यांचे आश्रयदाते. आसाराम बापू व नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे व व्हिडीओ अनेकदा प्रसिद्ध झाले. राम रहिम बाबाने तर भारतीय जनता पक्षाला सरळ पाठिंबा दिला व पाठिंबा दिला तेव्हाही राम रहिम महाशयांवर खून, बलात्काराचे आरोप होतेच. दीडशे गाड्यांत शेकडो सशस्त्र अंगरक्षक घेऊन राम रहिम ‘हडकंप’ माजवीत फिरत होताच, पण अशा व्यक्तीचा पाठिंबा घेण्यापेक्षा पराभव पत्करू असे ठणकावण्याची नैतिकता कुणातही नाही. जामा मशिदीच्या इमामाचा पाठिंबा काँग्रेसवाले घेतात हे जितके चूक तितकेच धर्माच्या नावावर ठेकेदारी करणाऱ्या इतर धर्मीय गुरूंचा पाठिंबा घेणेही चूक.

मीरा-भाईंदरचा एक जैन मुनी सरळ सरळ भाजपचा प्रचार करतो, मांसाहार करणाऱ्यांना शिव्या देतो व त्यांच्या पाठिंब्याने धर्माची मते मिळवून एक राजकीय पक्ष विजयी जल्लोष करतो हे योग्यच नाही. त्याच धर्माचा दुसरा एक मुनी जैन लोकांकडे सर्वाधिक पैसा व संपत्ती असल्याच्या जोरावर हवे ते करू व हवे त्याला विकत घेण्याची भाषा गुजरातमध्ये बसून करतो. यात धर्म व समाजसेवेची भावना आली कुठून? पैसा व संपत्ती तर पोप, इमाम व अल कायदावाल्यांकडेही आहे व आपण समाजसेवा करतोय असे त्यांनाही वाटते. हाजी मस्तान हादेखील समाजसेवक होता व माटुंग्याचा वरदराजन हा त्यांच्या तामीळ समाजाचा ‘नायक’ होता व गरीबांसाठी तो अन्नछत्रच चालवीत होता, म्हणून तो देव किंवा संत ठरत नाही.

इस्लामचे काय?

हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैनांचे मिळून कोट्यवधी देव असतानाही समाजात इतके दैन्य व असुरक्षितता का आहे? ‘इस्लाम’ इतका भक्कम व शक्तिमान असताना पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया, इराक, लिबियासारखी राष्ट्रे धुळीस मिळाली. तिथे धर्म व अल्लाच्या नावावर रक्तपात सुरूच आहे व ‘इसिस’चे लोक इस्लामचा जय करीत महिलांवर अत्याचार आणि बलात्कार करतात तेव्हा अल्लाही त्या अबलांचे रक्षण करू शकत नाही. कश्मीर खोऱ्यात रोजच युद्ध सुरू आहे व राष्ट्राच्या रक्षणासाठी शेवटी तरुण सैनिकांनाच मरण पत्करावे लागत आहे. देवांच्या रक्षणासाठीही आज अनेक ठिकाणी सैन्य कसे उभे आहे ते अयोध्येत पोहोचल्यावर दिसते.

गाडगे महाराज

धर्म, अध्यात्माच्या नावावर सुरू असलेली ठेकेदारी माणसाचे मन अस्थिर करीत आहे. मांसाहाराविरोधात जैन मुनी बोलतात व भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करतात. संपूर्ण भारतीय जनता पक्ष अद्यापि संपूर्ण शाकाहारी झाल्याचे दिसत नाही. ‘‘शिवसेनेला मत म्हणजे मांसाहाराला मत,’’ असे बोलणारे उद्या अहिंसेच्या नावाखाली ‘‘कश्मीरही पाकिस्तानला द्या,’’ असे सांगायला कमी करणार नाहीत. देवापुढे बोकड व कोंबडे कापण्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या संत गाडगेबाबांनी जागृती केली. त्यांचा लढा अंधश्रद्धेविरुद्ध होता. आजच्याप्रमाणे जैन मुनींचे राजकारण तेव्हा पेटले नव्हते. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तेव्हा लोकांच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्तेच पुढे आले. देवांच्या नावावरचे हे कार्यच शेवटी महत्त्वाचे ठरते. बाकी ‘राम रहिम’सारख्यांची बाबागिरी झूठ असते. सर्वच धर्मांतील अशा ‘बाबागिरी’वर कायद्यानेच बंदी यावी.

देश बाबा-महाराजमुक्त होवो, देवांपेक्षा चांगल्या माणसांचे राज्य येवो! बाबा, महाराजांचा, मुनींचा पाठिंबा घेऊन मते मिळविणारे कोणीही असोत, राम रहिम व बाबा, मुनींच्या पापांचे ते वाटेकरीच ठरतात.

Twitter – @rautsanjay61
Email- [email protected]

 • Kiran Vanarse

  Hyachi janiv rahudya ki Hindu santana fasavae Jaat ahe sagech tase nahi.. tumhcya ahsya pratkiyemue Hindu and marathi cha vishwas shivsene warun uthath chalaa. ahe

 • Raghvendra Kumar

  We can’t expect from ‘Samana’. Everyone Knows about Asaram Bapu Ji’s Fake Case including Udhav Thakre .

  What is happening in Hindu community? why are the ur Paper comparing Asaram Bapu Ji & Ram Rahim?

  If Samana Publication ‘ll not understand that What is Truth about Asaram Bapu Ji ?

  Then,Not A Single Hindu ‘ll Trust on ur Paper & Shivsena Party

  Jago Hindu Jago