स्वर्ग आम्हाला दिसेल काय?

आज सगळ्यानाच भारतीय जनता पक्षात म्हणजे स्वर्गात जायचे आहे. कालपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वर्गासमान भासत होते. काहींना नरकही स्वर्गासमान भासतो. आज राज्यात व देशात आर्थिक अराजक म्हणजे ‘नरक’सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे स्वर्ग कोठे आहे, ते कोणी सांगेल काय?

rokhthok

राज्य कसे करावे यावर नेहमीच चर्चा घडत असतात. आज लोकशाही आहे, पण नेमके कोण राज्य करतेय ते समजत नाही. लोकांना फसवून राज्य करण्यात जो पटाईत तो सध्या राज्य करतो. जुन्या जमान्याची गोष्ट आहे. प्रजा राज्यकारभार चालवीत होती. परंतु राज्य ठीकठाक चालत नव्हते, म्हणून लोक मनूकडे गेले आणि त्यांनी मनूला प्रार्थना केली, आपण राजा व्हावे! मनू म्हणाला, मी तर तपस्या करीत आहे. हे सोडून राजाचे काम करावे असा आपला आग्रह असेल तर तुम्हाला माझे सर्व म्हणणे ऐकावे लागेल. अमूक गोष्ट आम्ही ऐकणार नाही असे तुम्हाला म्हणता येणार नाही. प्रजेने हे कबूल केले. तेव्हा कोठे मनूने राज्यपद स्वीकारले. ही एक कहाणी आहे. मनूला त्याच्या पद्धतीने राज्य करायचे होते व लोकांनी त्यास मान्यता दिली. समाजात असे लोक हवेत की जे निवडणुकीच्या राजकारणात भाग घेणार नाहीत. कारण निवडणुका आल्या की भ्रष्टाचार आला. तो आजही धो धो वाहताना दिसत आहे. कारण निवडणुका रोजच आहेत!

उपभोग्य काय?
सत्ता ही उपभोग्य वस्तू नाही, असा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावला आहे. मोदी यांचे पुढील विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘‘माझ्या राज्यात भ्रष्टाचाराला माफी नाही. यात जो कोणी पकडला जाईल त्याला दयामाया न दाखविता कठोर शिक्षा मिळेल. माझा कोणी नातेवाईक नाही.’’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. पण सत्ता ही उपभोग्य वस्तू नसती तर सत्तेसाठी इतका आटापिटा कोणीच केला नसता. सत्ता मिळविण्यासाठी भाजपने बदनाम राम रहिमचाही आशीर्वाद आणि पाठिंबा घेतलाच आहे व उद्या वेळ पडलीच तर राष्ट्रवादी काँगेसचा पाठिंबा घेऊन महाराष्ट्रातील सरकार चालवायला ते कमी करणार नाहीत. हे सत्य आहे व राजकारणात ही घाण आता सर्वत्र आहे. राजकारणात सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सगळ्यासाठीच वर्तमानपत्रात आलेल्या दोन बातम्यांकडे मी लक्ष वेधतो.

१) राज्यांतर्गत सुरू होणाऱ्या विमानसेवांना गुजरातच्या अरेरावीने खीळ बसली आहे. विविध शहरे व धार्मिक स्थळांना जोडणारी विमानसेवा लवकरच सुरू होणार होती. मात्र विमान उड्डाणासाठी लागणाऱ्या निश्चित वेळा गुजरातमधील शहरांनी पळवल्यामुळे महाराष्ट्राची अंतर्गत विमानसेवा कोलमडून पडली आहे. राज्यात सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक आणि नांदेडमधून मुंबईपर्यंत ही विमानसेवा सुरू होणार होती. त्यासाठी विमानसेवेचे वेळापत्रकही जी.व्ही.के. कंपनीने तयार केले होते. या सर्व वेळा आता राजकीय दबावाने गुजरातला मिळाल्या. त्यामुळे पोरबंदर, सुरत, कांडला या गुजरातमधील विमानतळांना फायदा झाला. बुलेट ट्रेनची १२ पैकी फक्त ४ स्थानके महाराष्ट्राला. तसे राज्यांतर्गत विमानसेवेत आठपैकी २ वेळा महाराष्ट्राला, बाकी सर्व गुजरातला. हे प्रकार सुरूच आहेत.

२) पावसाळा संपत आला तरी महाराष्ट्रातील ११ जिल्हे अद्यापि तहानलेले आहेत. विदर्भातील आठ व मराठवाड्यातील ३ जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठलेली नाही. पण यावर कोणी बोलायला तयार नाही. नारायण राणे यांचे काय होणार व इक्बाल कासकर काय करतोय, या राजकीय घडामोडीतच सगळे अडकले आहेत. हे उपभोगाचेच राजकारण आहे!

धोकादायक कंजूष
उपनिषदात एक राजा आपल्या राज्याचे वर्णन करीत आहेः
न स्तेनो जनपदे न कदर्यः न मदय़पः।
न अनादिताग्निः न अविद्वान।
म्हणजे माझ्या राज्यात कोणी चोर नाही, कोणी कंजूष नाही. जेथे कंजूष लोक असतात तेथेच चोर असतात. विनोबा म्हणत असत की, कंजूष हा चोराचा बाप असतो. कंजूष माणूसच चोऱ्या वाढवत राहतो. त्या राजाने पुढे सांगितले की, माझ्या राज्यात कोणी मद्य पीत नाही. त्या काळी हिंदुस्थानात कोणी दारू पीत नसे. पण इंग्रजांनी दारू पिण्याची फॅशन काढली. त्यामुळे शहरांतून दारू उघडपणे चालू लागली. आज ती थांबविण्याचीही आम्हाला भीती वाटते. कारण महसूल, रोजगार बुडतो. त्याही पेक्षा ‘हप्ते’ कमी होतात. आजही सर्वात जास्त दारू गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर विकली जाते व जुगार खेळला जातो आणि त्याच पोरबंदरच्या आमदाराने गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मत दिले. कारण सत्ता व राजकारण हे उपभोगाचे साधन बनलेच आहे.

पैसे कोठून येतील?
३५० लोकसभेच्या जागा जिंकणे हे भाजपचे मिशन आहे. त्या जागा जिंकण्यासाठी पैसे व साधने लागतील. ते सर्व भाषणातील शब्दांचे बुडबुडे उडवून येणार नाहीत व साबरमतीच्या आश्रमातून सूतकताईने मिळणार नाहीत. ते कसे मिळतील याचे खुलासे भारतीय जनता पक्षाचेच एक खासदार नाना पटोले यांनी दिले आहेत. सध्याच्या राज्यात शेतकरी, कष्टकरी मरतोय व बडय़ा उद्योगपतींची धन होतेय, असे श्री. पटोले म्हणाले. त्याबद्दल त्यांना आता गद्दार आणि देशद्रोही ठरवले जाईल. शास्त्रात म्हटले आहे की, ‘राज्यान्ते नरकप्राप्तिः’ राज्याने अखेर नरक प्राप्त होतो. म्हणजे राज्य करणारा राजा मेल्यानंतर नरकात जातो. स्वर्ग, नरक कोणी पाहिलाय, पण आज तरी सगळय़ांनाच स्वर्गात म्हणजे भाजपात जायचे आहे व त्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. कालपर्यंत हा स्वर्ग काँगेस, राष्ट्रवादी काँगेस किंवा शिवसेना होता. स्वर्गाचे नेपथ्य असे बदलत असते. मेलो तरी बेहत्तर पण भाजपच्या दारात पुन्हा जाणार नाही असे सांगणारे नितीशकुमारही स्वर्गस्थ झाले. काही लोक हवा बदलेल तसा स्वर्ग बदलत असतात तर काहींना नरकही स्वर्गासमान भासतो. कारण प्रत्यक्ष राज्याचा नरक झाला तरी चालेल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेने केला, पण स्वर्गसुखाचा उपभोग दुसरेच कोणी घेत आहेत. जनता नरकातच आहे.

[email protected],[email protected]

  • Apurva Navale

    Mumbai?
    yeet swarg aahe kay