भीमा-कोरेगावात पेशवे हरले, मग जिंकले कोण?

2170

rokhthok

भीमा -कोरेगावची दंगल आणि महाराष्ट्रातील उद्रेक टाळता आला असता. या असंतोषाचे जनकत्व कुणी घेऊ नये. एकसंध महाराष्ट्रात जातीयतेच्या ठिणग्या उडवून पेटवणारे ‘इंग्रज’ मानसिकतेचे गुलाम आहेत. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र नष्ट करण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी उधळून लावायचे असते, पण २०१९ च्या निवडणुका जिंकणे हेच एकमेव ध्येय असणाऱ्या सर्वच राजकारण्यांकडून महाराष्ट्रहिताची अपेक्षा करावी काय? सगळ्यांनाच ‘फोडून, झोडून’ राज्य पुन्हा मिळवायचे आहे.

आापले महाराष्ट्र राज्य नेमके कोणत्या दिशेने चालले आहे या प्रश्नाचे उत्तर भीमा-कोरेगावच्या दंगलीत मरून पडले आहे.

 २०० वर्षांपूर्वीचा इतिहास चिवडण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या एकात्मतेचे कलेवर जणू कोसळून पडले आहे.

आधार काय?

भीमा-कोरेगावात दलितांच्या शौर्याचा २००वा विजय सोहळा साजरा झाला. हा शौर्य दिवस कसला व त्यास आधार काय हे कुणीच सांगायला तयार नाही.

१ जानेवारी १८१८ रोजी पेशवे बाजीराव (द्वितीय) आणि इंग्रज फौजांत कोरेगावात युद्ध झाले. त्यात इंग्रजांकडून पेशव्यांचा पराभव झाला. ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या सैन्यात मोठ्या संख्येने दलितही सहभागी होते. या घटनेस २०० वर्षे झाली म्हणून तिथे शौर्य दिवसाचे आयोजन झाले. दोन लाखांवर लोक तिथे जमा झाले. गावात तणाव वाढत गेला. गावातील कुणी एक गायकवाड याच्या नेतृत्वाखाली ‘राडा’ सुरू झाला व त्याच्या ठिणग्या सर्वत्र उडाल्या. ‘शौर्य’ दिवस नक्की कशाचा साजरा करायचा व स्वाभिमानाची किंमत काय मोजायची या वैचारिक गोंधळातून हे घडले. ‘‘महाराष्ट्रातील पेशवाई बुडवायला मी आलो आहे’’ असे एक विधान जिग्नेश मेवाणी या गुजरातमधून आलेल्या काँग्रेस पुरस्कृत नेत्याने तेथे केले. हे विधान महाराष्ट्राचा व संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान करणारे आहे. ‘पेशवे’ हे छत्रपतींचे पंतप्रधान होते व ते छत्रपतींकडून नेमले जात. पेशवे हे मराठा साम्राज्याचाच एक घटक होते व त्यांनी मराठा साम्राज्य उत्तरेकडे व अटक-कंदहारपर्यंत वाढवले. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांनी इतिहासावर पिचकाऱया मारू नयेत. शौर्यस्तंभ ब्रिटिशांनी बांधला व पेशवे हे छत्रपतींच्या गादीचे पंतप्रधान किंवा सेनापती म्हणून ब्रिटिशांशी लढले. महार रेजिमेंट तेव्हा इंग्रजांच्या बाजूने लढली हा आक्षेप आहे, पण ‘महारांचा’ लढा तेव्हा पेशवाईतील वर्णव्यवस्थेविरुद्ध होता आणि पेशवाईमधील वर्णव्यवस्था टोकाची होती. त्या वर्णव्यवस्थेचा अंत करण्यासाठी ‘महार’ इंग्रजांच्या सैन्यातून लढले. १८१८ची लढाई इतरांसाठी राजकीय असेलही, पण महार समाजासाठी ती सामाजिक लढाई होती.

महान आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब हे महाराष्ट्राचे महान सुपुत्र होते, पण आंबेडकर हे ब्रिटिशांचे एजंट होते व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान नव्हते असा आरोप तथाकथित संशोधक, लेखकांनी केला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एका सुरात डॉ. आंबेडकरांचा जयजयकार करण्यासाठी उभा होता. त्यामुळे ब्रिटिशांनी उभारलेल्या शौर्यस्तंभास मानवंदना देणे हे डॉ. आंबेडकरांना तरी पटले असते काय?हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. सर्वात मोठा प्रश्न महागाई व बेरोजगारीचा असताना समाजाने २०० वर्षे मागे जाऊन ‘जातीय’ संघर्ष करावा हे योग्य नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व सैन्यात ‘महार’ रेजिमेंटचे योगदान आहे, पण ज्या शौर्यस्तंभावरून महाराष्ट्र पेटला त्या शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब कधी गेले होते याचा पुरावा नाही.

महार समाज व रेजिमेंट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ‘बौद्ध’ धर्म स्वीकारला तेव्हा आंबेडकरांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेणारे बहुसंख्य ‘महार’ जमातीचे होते. महार समाज बौद्ध झाला तरी भारतीय सैन्यातील ‘महार रेजिमेंट’ तशीच राहिली. ती काही बौद्ध रेजिमेंट झाली नाही. कारण ‘महार रेजिमेंट’ला एक इतिहास आहे. महार ‘रेजिमेंट’ आजही मराठा रेजिमेंटच्या बरोबरीने राष्ट्राचे रक्षण करीत आहे. श्री. वैभव देशपांडे यांनी ‘महार’ समाज व त्यांच्या कर्तृत्वाविषयी चांगली माहिती यानिमित्ताने माझ्याकडे पाठवली ती रंजक व रोमांचक आहे –

‘‘१५ व्या शतकात संत एकनाथ (पैठणचे कुलकर्णी) यांनी प्रथम महारांचा विटाळ पाळण्यास नकार दिला. एका महार जातीच्या मुलास कडेवर घेतले आणि उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी दिले. त्यांनीच महार समाजाच्या लोकांना श्राद्धास जेवायला घरी बोलावले. पुणे जिल्हय़ातील मोसे खोऱ्यात (सध्याचे पानशेत धरण) राहणाऱ्या बाजी पासलकर-देशमुख यांनी त्यांच्या खासगी सैन्यात अनेक महार, मांग सैनिक ठेवले होते. त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. या सैनिकांनीच पहिल्या पुरंदरच्या लढाईत आदिलशाहीविरुद्ध आणि नंतर २० वर्षांनी मोगलांविरुद्ध कडवी झुंज दिली होती.

सुरुवातीच्या मराठा राज्यात प्रतापगडची लढाई ही फार महत्त्वाची समजली जाते. मोरोपंत पिंगळे पहिले ब्राह्मण पेशवे यांनीच छत्रपती शिवाजीराजांना सांगितले, ‘‘पाचगणीजवळ राहणाऱया बनसोडे या महार कुटुंबास दांडेघरचे पाटीलकीचे वतन द्या. कारण त्यांनी युद्धात पराक्रम केला आहे.’’ महाराज हे सर्वांचे राजे होते. त्यावेळी पाटील म्हणजे आजचे पोलीस. हे वतन फक्त मराठा, अगदी क्वचित कोळी, ब्राह्मण व्यक्तीस दिले जायचे. मात्र छत्रपतींनी ते एका महार व्यक्तीस देऊन सामाजिक चमत्कारच केला. पुढे छत्रपती संभाजी, राजारामाच्या काळात तर वाईजवळच्या सैन्याची जबाबदारी देऊन या कुटुंबावर ठेवलेला विश्वास अजून एक पायरी वाढवला. उत्तर पेशवाईच्या काळात दांडेघरच्या ब्राह्मणांनी हे पाटील वतन बळकावून वाईच्या एखाद्या मराठा कुटुंबास विकण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र तो पुण्याच्या पेशवाईत दरवेळी नाकारला गेला.

तोच प्रकार १४ व्या शतकात मंगळवेढा, सांगोलाचे दामाजीपंत देशपांडे यांचा. त्यांचे ‘देशपांडे’ वतनाचे काम म्हणजे सैन्याच्या व्यवस्थेचे कामकाज पाहणे, सैन्यास लागणारे धान्य, घोडे, कपडे, औषधे, रसद, नाईक, सैनिकांचे पगार यांचा हिशेब ठेवणे. आदिलशहास या गोष्टी या विजयनगर साम्राज्याविरुद्ध चाललेल्या युद्धात वापरायच्या होत्या, मात्र दामाजीपंतांना हे युद्ध दुष्काळामुळे पुढे ढकलायचे होते.

काही दिवस गेले. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांनी ठरवले, हे धान्य सरकारी खजिन्यातून लोकांना वाटायचे. झाले, बादशहाने त्यांना कैदेत टाकले. देहदंड सुनावला तेव्हा त्यांना सुटकेसाठी जी आर्थिक भरपाई द्यायची होती त्याची सोय एका महार व्यक्तीनेच केली आणि त्यांना कैदेतून सोडवले. ग. दि. माडगूळकरांनी १९४० च्या दशकात ‘झाला महार पंढरीनाथ’ हा मराठी चित्रपट काढला होता. माडगूळकरांना या चित्रपटाद्वारे एक सामाजिक संदेशच द्यायचा होता.

तीच गोष्ट महादेव आंबेडकर या बाबासाहेबांच्या ब्राह्मण शिक्षकाबद्दल. त्यांनी शक्य तितकी मदत बाबासाहेबांना बालवयात केली. पुढे मराठा कोल्हापूरकर शाहू छत्रपती आणि बडोदेकर सयाजीराव गायकवाडांनी पण केली. आचार्य अत्र्यांनी १९२० च्या दशकात त्यांच्या पुण्याच्या घरात एक महार विद्यार्थी पेइंग गेस्ट ठेवला होता. जेव्हा अत्र्यांना लंडनला शिक्षणासाठी १९३० मध्ये जाण्यास काही पैसे कमी पडले तेव्हा त्यांना मदत याच महार व्यक्तीने केली. अत्र्यांनी त्यांचा खंडाळ्यातील बंगला बाबासाहेबांना वाचन, लेखनाच्या कामासाठी खुला केला तो पुढच्या १९४०च्या दशकात. जेव्हा कधी आजच्या भाषेत सलग सुट्ट्यांमुळे ‘लाँग वीकेंड’ येत असे तेव्हा बाबासाहेब या खंडाळ्यांच्या बंगल्यातच वाचन, लेखनाकरिता येत असत.

महार समाजाचा त्याग
महार रेजिमेंट आजही सैन्यात आहे. मात्र त्यात सर्व जातीधर्मांचे लोक असतात. जाट रेजिमेंट, गुरखा रेजिमेंट, मराठा लाइट इन्फंट्री यांचे प्रमुख हे मुद्दाम वेगळ्या राज्यातले ठेवले जातात. महार, मातंग समाजाने शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात चांगली कामगिरी केली. संभाजी छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शवाचे तुकडे तुकडे करून फेकून द्यावे व त्यावर अंत्यसंस्कार होऊ नयेत असा औरंगजेबाचा कुटिल डाव होता. मात्र वढूच्या काही महार पैलवान लोकांनी तो हाणून पाडला. रात्रीच्या वेळी तसेच दिवसाही छावणीत अनेक वेशांत शिरून त्यांना हे शक्य झाले आणि विधिवत अंत्यसंस्कार छत्रपतींवर होऊ शकले. बाजीराव पेशव्याचे काही अंगरक्षक महार होते. पानिपतच्या युद्धात सदाशिवभाऊंबरोबर असेच काही महार अंगरक्षक लढता लढता मृत्युमुखी पडले.

१७९५ची खर्ड्याची लढाई ही मराठा साम्राज्याचे सगळे गटतट एकत्र येऊन केलेली शेवटची एकमेव यशस्वी लढाई होती. त्यातील सांगलीकर पटवर्धनांच्या सैन्यात अनेक महार सैनिक होते. १८०० नंतर मराठा साम्राज्यातील एक-एक कर्तबगार लोक मरण पावले आणि इंग्रजांच्या कंपनी सैन्यात जाण्यासाठी अनेक जातींची रीघ लागली.

१७९५ नंतर जशी महार रेजिमेंट बनवली गेली, त्या काळातच बंगाल, यूपी भागात ब्राह्मण रेजिमेंटदेखील बनवली गेली हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. ५०० महार सैनिकांनी २५ हजार पेशव्यांना ठार मारले हा खोटा प्रचार आहे. भीमा-कोरेगावला ब्रिटिश सैन्यात यावेळी अनेक महार होते तसेच पेशवे आणि छत्रपतींच्या सैन्यात पण होते. पेशव्यांच्या सैन्यात तर अनेक अरब होते. खराटा, गळ्यात मडके घालणे हा उत्तर पेशवाईचा एक अमानुषपणा फक्त पुणे शहराच्या १४ पेठांपुरता मर्यादित होता. हडपसर शिंद्यांच्या ताब्यात होते. पाचगाव-तळजाई ही गावे भोरचे पंडित संस्थानिक सांभाळत. चाकणमध्ये काटे नावाच्या मराठा सरदाराचे संस्थान होते. या पेठांपुरते हे नियम. बाकी हजारो संस्थानिकांचे नियम या पेठांइतके तीव्र नव्हते (त्यात प्रतिनिधी/पटवर्धन/पंडित यांसारखे ब्राह्मणही होते). प्रतिनिधींच्या माणदेश संस्थानात महार/मांगास वाईट वागणूक नव्हती, अशी शिवाशिव पाळण्यास संस्थान कायद्याने बंदी होती.

१८५७ मध्ये महार रेजिमेंटच्या २१ आणि २७ या तुकडीने उठावात भाग घेतला होता. पुढे १८८५ पासून महार रेजिमेंट बंद करण्याचे प्रकार लॉर्ड रॉबर्ट या ब्रिटिशाकडून सुरू झाले आणि १८९२ मध्ये ती बंद झाली. अनेक महार सैनिकांना हा धक्का होता. मात्र काही माजी सैनिकांकडून जसे शिवराम कांबळे, गोपाळ बाळंगकर यांनी ब्रिटिश सरकारकडे महार रेजिमेंट किंवा सैन्य भरती सुरू करा अशा विनंत्यांचा सपाटा १८९४ नंतर सुरू केला. भारत सेवक संघटनेचे गोपाळ कृष्ण गोखले यांनी या अर्जाचे समर्थन केले. त्यांनी ही विनंती त्यावेळच्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात ठेवली. शेवटी १९१७ मध्ये १११ ही रेजिमेंटची एक बटालियन सुरू केली गेली व १९२०च्या काळात ती बंदही झाली.

१९४१ मध्ये बाबासाहेबांची नेमणूक व्हाईसरॉयचे संरक्षण सल्लागार म्हणून झाली आणि बेळगाव, विदर्भात कामठी येथे ही रेजिमेंट सुरू झाली. त्यातील सैनिकांची वायव्य खैबर प्रांतात नेमणूक झाली. इराक, बर्मामध्येही या रेजिमेंटने सेवा बजावली. १९४६ साली मशीनगनचे प्रशिक्षणही या सैन्यास मिळाले. १९४७ साली फाळणीच्या वेळी पंजाब, हरयाणामधून दोन्ही बाजूंचे निर्वासित येऊ लागले. त्यांच्या नियंत्रणासाठी मद्रास, म्हैसूर, महाराष्ट्रातून रेजिमेंट आणाव्यात असा प्रस्ताव सरदार पटेल आणि व्हाईसरॉयने मांडला. कारण त्या सेना या स्थानिक सामाजिक परिस्थितीशी अनभिज्ञ होत्या. या काळात महार रेजिमेंटच्या तीन बटालियननी दोन्ही धर्मांच्या लोकांचे दंगलीपासून रक्षण केले हे येथे लक्षात घेतले पाहिजे.’’

जिंकले कोण?
भीमा-कोरेगाव प्रकारानंतर बौद्ध समाजाचा उद्रेक झाला व तो हिंसाचार करीत रस्त्यावर उतरला. कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात ‘मराठा’ समाज अस्वस्थ होऊन रस्त्यावर उतरला व त्यातून ‘मराठा क्रांती’च्या झेंड्याखाली लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे शिस्तीत व शांततेत निघाले आणि त्यांनी कुणाचेही नुकसान होऊ दिले नाही. भीमा-कोरेगाव घटनेनंतर उसळलेल्या ‘बौद्ध’ समाजाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी केले व त्यांनी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी झाला. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे पडले आहेत. रामदास आठवले आज भाजपच्या मंत्रिमंडळात सहभागी आहेत, पण भीमा-कोरेगाव प्रकरणात बौद्ध समाजाने त्यांना जुमानले नाही व प्रकाश आंबेडकर यांच्या मागे समाज उभा राहिला. आंबेडकर विरुद्ध आठवले असा सरळ तुकडा येथे पडला. पण हे नेतृत्व आंबेडकरांकडे येईल आणि टिकेल काय? महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात बदल घडविणाऱ्या या घटना आहेत. सरकार म्हणून आज राज्यावर कुणाचे नियंत्रण नाही हे भीमा-कोरेगावनंतरच्या प्रकाराने सिद्ध केले. संसदेत हा विषय खळखळून चर्चेला आला. तेव्हा ‘सरकार संयमाने वागले हे बरे झाले’ असे मी सांगितले. कारण हिंसाचारास काबूत आणण्याचे धैर्य तेव्हा सरकारपाशी नव्हते. त्यामुळे ‘संयम’ बाळगून कातडी बचावणे हाच एकमेव पर्याय त्यावेळी होता. नशिबाने मिळवलेले राज्य ‘फासे’ उलटे पडू लागले की जाते. सरकार म्हणून जे मंत्रालयात बसले आहेत त्यांची धोरणे ही सर्वप्रथम पक्षविस्तारासाठी वाटेल ते करण्याची, शिवसेनेस नष्ट करण्याची व २०१९ च्या निवडणुकांसाठी पैसे जमविण्याची आहेत. त्यासाठी ‘राज्य’ वेठीस धरले जात आहे. राज्य टिकले तर राजकारण टिकेल, समाज दुभंगला तर राज्य फुटेल. वाल्यांच्या जोरावर फार काळ राज्य करता येणार नाही. भीमा-कोरेगावचा संपूर्ण उद्रेक सरकारला कदाचित टाळता आला नसता, पण त्याची तीक्रता कमी करता आली असती. पण मतांचे राजकारण व कातडी बचाव धोरण यामुळे महाराष्ट्र पेटला. शेवटी या भीमा-कोरेगावच्या लढाईत २०० वर्षांनंतरही इंग्रज जिंकले. ब्रिटिशांच्या सैन्यात ‘महार’ होते व त्यांनी पेशव्यांविरुद्ध लढून ब्राह्मणांच्या कत्तली केल्या याचा अभिमान व शौर्य दिवस पाळणे हे सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही. पेशवे व त्यांचे सैन्य ‘छत्रपतीं’च्या आदेशाने परकीय आक्रमक इंग्रजांविरुद्ध लढत होते ही भावनासुद्धा महत्त्वाची ठरते.

‘‘ना जिंकले मराठा,
ना ब्राह्मण, ना दलित,
जिंकले पुन्हा इंग्रज’’
२०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात इंग्रज यशस्वी झाले.

हजारो हुतात्म्यांचा आणि स्वातंत्र्ययोद्ध्यांचा हा अपमान आहे.

ट्विटर – @rautsanjay61
जिमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या