राजकीय पंडित आपटले, मोदी-शहांवर आता जुगार नको!

  • संजय राऊत

नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने देशाचे राजकारण व्यापले आहे. अनेक प्रश्न तसेच लटकले आहेत व बरेच विषय अपयशी ठरले. तरीही यशाचा डंका वाजतोय. मंत्रिमंडळ विस्ताराने अनेक राजकीय पंडित साफ आपटले. मोदी व शहांवर कुणालाही जुगार खेळता येणार नाही ही सध्याची स्थिती मान्य करावीच लागेल. तरीही विरोधी पक्षांचा आवाज टिकवावाच लागेल!

पंतप्रधान मोदी व अमित शहा ही शक्तिमान जोडी देशात काहीही घडवू शकते, यावर आता त्यांच्या विरोधकांचेही एकमत झाले असेल. श्री. मोदी व श्री. शहा यांनी दिल्लीतील राजकीय पंडित आणि भाष्यकारांची दुकाने साफ बंद करून ठेवली आहेत. राजकीय भविष्य सांगणारे कसे उघडे पडतात व मोदी-शहा त्यांचा कसा पोपट करतात ते कालच्या मंत्रिमंडळ विस्ताराने दाखवून दिले. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदी नियुक्त करून मोदी यांनी जो धक्का दिला त्या धक्क्यातून देश अद्यापि सावरलेला नाही. मीडिया व राजकीय पंडित अनेक नावांच्या पिपाण्या फुंकत होते व कोविंद यांचे नाव कुणाच्याच खिजगणतीत नव्हते. मोदी यांनी जणू झोपलेल्यांना खडबडून जागे करण्यासाठीच कोविंद यांना निवडले. आम्हीच देश चालवतो व आम्हीच राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करतो अशी बढाई मारणाऱ्या एकाही ‘मीडिया’ने कोविंद यांचे नाव घेतले नव्हते. तीच परिस्थिती कालच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घडली. ‘मीडिया’तून ज्या नावांचा पुकारा चार दिवस सुरू होता व पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी फक्त आपल्याच वृत्तवाहिनीस सर्वात आधी पाठवली आहे अशा आविर्भावात ते मंत्र्यांची नावे जाहीर करीत होते. त्यातील काही जण मोदींच्या यादीत नव्हते. ओम प्रकाश माथूर, विनय सहस्रबुद्धे, भूपेंद्र यादव, आंध्रचे हरी बाबू, कर्नाटकचे सुरेश आंगडी व प्रल्हाद जोशी या मंडळींना ‘मीडिया’ने मंत्रिपदाची शपथही देऊन टाकली, पण डॉ. सत्यपाल सोडले तर सर्व अंदाज मोदी यांनी फोल ठरवले. ज्या निर्मला सीतारामन यांचा राजीनामा घेतला व त्यांना आता घरीच पाठवले जाईल, असे सांगितले जात होते त्या निर्मलाबाईंना मोदी व शहा यांनी थेट देशाचे संरक्षणमंत्रीच करून टाकले.

rokh-thok२०१९ चा विस्तार
२०१९ ची पूर्वतयारी म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाहिले जात असेल तर ते बरोबर नाही. मंत्रिमंडळातील नवे चेहरे भारतीय जनता पक्षाला ‘३५०’चे मिशन कसे पूर्ण करू देणार? श्री. अमित शहा यांनी ३५० लोकसभा जागा जिंकण्याचा अश्वमेध सोडला आहे. सरकारचे काम व मंत्रिमंडळाचा चेहरा यामुळे ३५० जागा जिंकतील हे पटत नाही, पण विस्कळीत व गर्भगळीत झालेला नेतृत्वहीन विरोधी पक्ष यामुळे मोदी व शहा यांना आणखी एक विजय मिळेल हेच सत्य आहे. शरद यादव हे विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम करीत आहेत, पण त्यात काँग्रेसचा सहभाग किती व शरद पवारांसारखे नेते या व्यासपीठावर आहेत काय? उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य काय कौल देते व पुढच्या सहा महिन्यांत कोणते पीक येते यावर चित्र स्पष्ट होईल. मायावती या नितीश कुमार यांच्यापेक्षा बेभरवशाच्या राजकारणी आहेत. लालू यादव यांच्या पाटण्यातील भाजपविरोधी मेळाव्यास त्या गैरहजर राहिल्या. कारण इतरांच्या व्यासपीठावर त्या जात नाहीत, पण मायावती व त्यांचा पक्ष उद्या भारतीय जनता पक्षाबरोबर गेला तरी कुणाला धक्का बसू नये. बिहारात नितीश कुमार गेले व उत्तर प्रदेशातून मायावती जातील आणि दोन मोठी राज्ये पुन्हा मोदी जिंकतील. ‘तोडा-फोडा व राज्य करा’ हा मंत्र राजकारणात इतक्या प्रभावीपणे ब्रिटिशांनीही वापरला नव्हता.

पवार काय म्हणतात?
महाराष्ट्राचे बलदंड नेते श्री. शरद पवार यांच्याशी भेट झाली. देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. ‘‘आपण भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला आहात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शरद पवारांना स्थान असल्याच्या बातम्या जोरात होत्या, हे कसे?’’ यावर श्री. पवार म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? त्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.’’
‘‘मग तुमच्या किंवा राष्ट्रवादी काँगेसच्या बाबतीत बातम्या का येतात?’’
‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत, पण गोंधळ उडविण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात.’’

शरद पवार यांचे हे म्हणणे, पण आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पुढारी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीने फडणवीस मंत्रिमंडळात सामील व्हावे असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल व त्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठका सुरू असतील तर त्यामुळे शिवसेनेस विचलित होण्याचे कारण नाही. आज फक्त ४१ आमदारांची ताकद असलेल्या राष्ट्रवादीसाठी उंटाच्या पाठीवरील ती शेवटची काडी ठरेल व भाजपचीही त्यामुळे एकदाची पोलखोल होईल.

काँग्रेसयुक्त भाजप!
काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकांना पक्षात घेऊन भाजप आपली ताकद वाढवीत आहे व गुळास मुंगळे चिकटावेत तसे काँग्रेसवाले तिथे जात आहेत. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी किंवा संध्याकाळी हॉटेलात चक्कर टाकली तर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक बसलेले दिसतात व पुढच्या दोन दिवसांत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध होतात. हे प्रयोग सध्या देशभरात सुरू आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याची ही नवी योजना चांगली आहे. काँग्रेसलाच भाजपमध्ये सामावून घ्यायचे, पण ज्या दिवशी काँग्रेसला उभारी देणारा नेता मिळेल त्या दिवशी भारतीय जनता पक्ष काँग्रेसमुक्त होईल व जे कमावले ते सर्व निघून जाईल. नारायण राणे हे भाजपच्या उंबरठ्यावर उभे आहेत व भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने त्यांना अधांतरी ठेवले आहे. श्री. राणे हे शिवसेनेतून काँग्रेस पक्षात गेले, काँग्रेसमधून ते आता भाजपमध्ये निघाले. सर्वच पक्षांतील बऱ्या-वाईट नेत्यांना सामावून घेणारा आधुनिक काँग्रेस पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आज झपाट्याने पुढे येत आहे. मोदी यांची हवा व अमित शहांचे पक्ष विस्ताराचे धोरण यशस्वी होत आहे तोपर्यंत हा फुगवटा सुरू राहील.

वादळ व विरोधक
देशाच्या राजकारणात फार मोठे वादळ निर्माण करण्याची ताकद आज विरोधी पक्षांत नाही. पण विरोधक नसतील तर राजकारण अळणी ठरेल व सत्ताधाऱयांचा भस्मासुर होईल हे मान्य करावे लागेल. राजकारण हे नेहमीच सत्ताकेंद्रित असते. विरोधी पक्ष विस्कळीत आणि दुबळा होतो तेव्हा उंदीर उड्या मारून सत्तापक्षात जात असतात. आज देशभरात सर्वत्र तेच चित्र दिसत आहे. स्थिर सरकार व बळकट विरोधी पक्ष ही देशाची गरज असते. पण सरकारला आज विरोधक नको आहेत. विरोधी बोलणारे व प्रश्न विचारणारे नकोसे झाले आहेत. हे चित्र इंदिरा गांधींनी निर्माण केले म्हणून त्यांच्या विरोधात एक लढा निर्माण झाला. भारतीय जनता पक्षाला आज तसे आव्हान कुणाचेच नाही. त्यामुळे उत्तम काम करण्याची संधी त्यांना आहे. सोशल मीडिया व प्रसिद्धीची साधने हातात असली तरी हा सर्व ‘मेकअप’ आहे व केव्हातरी तो खरवडून काढावाच लागतो. कालच्या मंत्रिमंडळ विस्ताराने अनेक राजकीय पंडितांचा मेंदू बधिर झाला व डोळ्यांची बुबुळे बाहेर आली. ‘डोकलाम’ची भानगड सुरूच राहील असे वाटत होते, पण मोदी चीनला जाऊन ‘डोकलाम’ प्रकरण मिटवून आले. आणखी काही काळ हे असेच चालत राहील. तोपर्यंत विरोधी पक्षांनी योगा, व्यायामशाळा व बौद्धिक शाळांत मन रमवावे.

twitter : @rautsanjay61

email : [email protected]

 

  • Rajesh Dusane

    Apratim, Its excellent article Mr. Editor, These possible indications seems to Too Scary,….India really need A Leader to drive the Opposition Party…People should understand Yuti ..coalition is advantageous solution for the Politicians but its is dangerous to the Country.

  • Rahul Naik

    I can understand this stance from Mr. Raut, but Shivsena is still in power in Maharashtra and Central…somehow not able to comprehend this logic.
    Mr. Raut, In next editorial, can you please explain this position? Currently your number 1 enemy is BJP, still you are supporting them in state and Central, why?