जिवंतपणीच मोक्षाचा मार्ग, वेदांत्यांचा सोशल मीडिया

लोकांना निर्धन करा, गरीब करा, त्यांची सुख-चैन नष्ट करा असे एक सूत्र वेदांतात आहे, पण त्या काळात एकाही राजाने वेदांत्यांचे हे सूत्र स्वीकारले नाही, पण नवे वेदांती सत्तेच्या माध्यमातून महागाई व त्यातून लोकांना निर्धन करीत आहेत. सोशल मीडियावरील भंपकपणा हा त्यावरचा उपाय नाही.

पला देश मोठा चमत्कारिक आहे. त्यामुळे चमत्कारिक घटना घडवून राज्य मिळविणे हा आता पायंडा पडला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सहज सांगितले की, ‘‘होय, मी व माझे सरकार अल्टिमेट आहे.’’ मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे. त्यांच्या राज्यात कोथिंबिरीची जुडी १४० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे तेच. महाराष्ट्रात सरकार चालवायचे की नाही याचा निर्णय घेण्याबाबत एक भूमिका शिवसेनेने मांडली. प्रसिद्धीमाध्यमांनी त्यास शिवसेनेचे ‘अल्टिमेटम’ म्हटले, पण आघाडीचे व युतीचे राज्य चालविणाऱ्या नेत्याने सर्व गोष्टी विनम्रपणे सहन करायच्या असतात. सत्तेचा ‘मोदक’ कोणत्याही संघर्षाशिवाय हाती पडला की विनम्रतेचा कडेलोट होतो. अल्टिमेटमला दिलेले अल्टिमेटचे उत्तर चमत्कारिक आहे. सरकार किती ‘अल्टिमेट’ आहे याचे दर्शन आता सोशल मीडियावर जास्त होते. ज्या सोशल मीडियाचा वारेमाप व खर्चिक वापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, विरोधकांची यथेच्छ बदनामी केली त्या सोशल मीडियाची ‘खाजकुयली’ आता लोक भाजपच्याच अंगावर फेकत आहेत व खाजवताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. सोशल मीडियातील सरकारविरोधी अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले. हेसुद्धा अल्टिमेट आणि चमत्कारिक आहे.

rokh-thok

सोशल मीडियावर…
सोशल मीडियावर सुरू असलेल्या भाजपविरोधी प्रचाराला बळी पडू नका असे आता भाजप अध्यक्षांना का सांगावे लागले? काँग्रेस राजवटीस बदनाम करण्यासाठी व मनमोहन सिंग यांना खाली खेचण्यासाठी याच सोशल मीडियाचा वापर भाजपने केला. राहुल गांधी यांना ‘मूर्ख’ ठरवणे हेच काम सोशल मीडियाने केले. त्या सोशल मीडियाचे बूमरँग आता मोदी व भाजपवर रोज होत आहे. (सोशल मीडियावर राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवले गेले. तोच सोशल मीडिया आता पंतप्रधान मोदी यांना ‘फेकू’ वगैरे पदव्या देत आहे याचे मला वाईट वाटते.) विरोधकांना ‘बदनाम’ करण्यासाठी १००० लोक पगारी पद्धतीने भाजपच्या सोशल मीडिया ग्रुपसाठी काम करीत आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना एक स्वतंत्र आणि परखड भूमिका मांडत असते. त्यामुळे ही १००० जणांची टोळी सोशल मीडियावर शिवसेनेच्या विरोधातही मोहीम राबवत असते. पण आता तोच ‘सोशल’ मीडिया भाजपच्या नाकीनऊ आणीत आहे. भाजप नेत्यांची जुनी भाषणे व वचने दाखवून हैराण करीत आहे व या सगळ्यावर भाजपचे उत्तर फक्त शिवसेनेवर टीका व काँग्रेसवर आरोप हेच आहे. महाराष्ट्राचे व देशाचे सरकार ‘अल्टिमेट’ कसे? यावर सोशल मीडियावर कशी खिल्ली उडवली जात आहे ती पहा-

  • बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अहमदाबादेत सांगितले, महाराष्ट्राचा विकास गुजरातच्या दिशेने सुरू होईल. आतापर्यंत महाराष्ट्र देशाला दिशा देत राहिला. आज महाराष्ट्रावर ही काय ‘अल्टिमेट’ वेळ आली आहे?
  • काहीच कारण नसताना महाराष्ट्राने ‘बुलेट ट्रेन’साठी ३०,००० कोटींचा भुर्दंड सोसला आहे. बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच जास्त, यावर आता सोशल मीडियावर एक विनोद फिरत आहे. ‘‘एकेकाळी छत्रपतींनी सुरत लुटून आणली होती आणि आज पेशव्यांनी महाराष्ट्र लुटून ३० हजार कोटी रुपये सुरतेच्या हवाली केले.’’
  • जिसने विदेश से चार लाख करोड का काला धन लाने का वायदा किया था, वो जापान से एक लाख करोड का कर्जा ले आए.
  • प्रधानमंत्र्यांचा फोटो टाकून फक्त दोन ओळींची एक कॉमेंटही सनसनाटी आहे.
    ‘‘मैंने गरिबी पास से देखी है…
    तुम्हे भी दिखा दूंगा…’’

हे सर्व आज सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. या लोकभावना असतील तर या ‘अल्टिमेट’ लोकभावनांचा विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागेल. मुख्यमंत्री बोलतात गोड, वागतात छान; पण त्यांच्या राज्यात कोथिंबिरीची जुडी १४० रुपयांना पडते व राज्याच्या सामाजिक शिक्षणाचा कणा असलेले हजारो अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत, याचा विसर त्यांना पडू नये!

सत्य मांडायचे नाही?
हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांचा जयजयकार असो, असे सतत बोलणाऱ्यांपैकी मी आहे म्हणून राज्यातील सत्य मांडायचे नाही काय? हिंदुस्थानात आता ‘संघ’ विचाराने म्हणजे हिंदुत्व संस्कृती व परंपरेने राज्य चालले आहे व मोदी हिंदुत्वाचा अजेंडा राबवीत असल्याचा आरोप विरोधक करीत असतात. त्यात अजिबात तथ्य नाही. हा देश चमत्कारिक आहे असे मी पुन्हा म्हणतोय व येथील माणसेही चमत्कारिक आहेत. काल ज्यांना खांद्यावर घेऊन नाचले त्यांना कधी तुडवतील ते सांगता येत नाही व काल ज्यांना तुडवले त्यांना खांद्यावर घेऊन नाचतील. त्यामुळे येथे ‘अल्टिमेट’ कोणीच नाही. आजची सरकारी धोरणे ही लोकांना गुदमरून मारणारी आहेत. लोकांच्या हातात पैसा ठेवू नका व त्यांना गरीब करा असे एक वेदांताचे सूत्र आहे. वेदांतातील मुख्य तत्त्व हे की, या जगातील सर्व स्पृहणीय वस्तूंबद्दल द्वेष आणि तिटकारा उत्पन्न झाला पाहिजे.

लोकांपाशी पैसा जमा होतो, पैशांमुळे चैन सुचते, चैनीसाठी विषयवासना जागृत होतात, विषयोपभोगापासून आसक्ती निर्माण होते. त्यामुळे राज्य आणि समाजाचे नुकसान होते. शंकराचार्यांनी त्या वेळी ‘‘सर्व लोकांच्या जवळील पैसा नाहीसा करून द्या,’’ अशी सर्व राजांना विनंतीपत्रे लिहिली आणि मग नंतर त्यांनी भाष्य लिहिण्याला सुरुवात केली! तेव्हापासून ‘‘लोकांजवळ पैसा उरू देऊ नका, त्यांना थोडे तडफडू द्या,’’ अशी सर्व वेदांत्यांनी आपापल्या राजाजवळ सारखी टकळी चालविली होती, त्या वेदांत्यांपैकी कित्येक श्रेष्ठ लोक राजगुरू म्हणून स्थानापन्नही झालेले होते. ते आपल्या शिष्यांना अतिशय गळ घालीत असत व तुम्ही आपल्या अमलातील सर्व लोकांना निर्धन करून सोडाल तर आम्ही तुम्हाला गुरुपदेश देऊ, असेही निक्षून सांगत असत. तरी पण एकाही राजाच्या हातून ही वेदांत्यांची मागणी पुरी करण्यात आली नाही, कारण लोकांना निर्धन करून त्यांच्या मनात विरक्तीची आवड निर्माण करून त्यांना जिवंतपणीच ‘मोक्षा’चा मार्ग दाखविण्यात सामर्थ्य नसून उलट लोकांपाशी पैसे शिल्लक पडू देऊन त्याच्या जोरावर सुख निर्माण करणे, प्रजेला आनंद मिळू देणे हेच वेदांतापेक्षा श्रेष्ठ आहे असे तेव्हाच्या राजांना वाटले. त्यामुळे त्यांनी ‘नोटाबंदी’ वगैरे चमत्कारी व अल्टिमेट प्रयोग करून जनतेला छळले नाही!

अंगणवाडी सेविका
मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रात उत्तम चालले आहे. हे त्यांचे भाग्यच आहे. मात्र महाराष्ट्रातील लाखभर अंगणवाडी सेविका त्यांच्या मागण्यांसाठी काही दिवसांपासून संपावर आहेत व प्रजेचे बरे चाललेले दिसत नाही.

राज्यातील आदिवासी भागात त्या प्रामुख्याने काम करतात. तेथे बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे व या मुलांचे पोषण व शिक्षण करण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर आहे. त्यांना अर्धपोटी राहून काम करावे लागते. या अंगणवाडी सेविकांना पदरमोड करून, कर्ज काढून या बालकांना आहार शिजवून द्यावा लागतो व सरकार आडाला तंगडय़ा लावून झोपले आहे! चांगल्या पावसामुळे महाराष्ट्रात पाणी उत्तम झाले आहे. पाऊस जणू सरकारनेच पाडला व सर्व बरे सरकारमुळेच चालले आहे. पण अंगणवाडी सेविका वर्षभरापासून रस्त्यांवर आहेत व कोथिंबिरीची जुडी १४० रुपयांना मिळत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावाचे बोलायचेच नाही.

भाववाढीची बुलेट ट्रेन आधीच सुरू झाली आहे व या बुलेट ट्रेनसाठी जपान सरकारचे कर्जही नाही. आमच्याच सरकारच्या कृपेने ही बुलेट ट्रेन वर्षानुवर्षे सुरू आहे व ती रुळावरून घसरत नाही आणि तिला अपघातही होत नाही. चमत्कार तर हासुद्धा आहेच! त्या चमत्कारालाही सलाम! नव्या वेदांत्यांचे नवे राज्य सुरू झाले आहे. त्यांनाही सलाम.

twiter: @rautsanjay61
email :  [email protected]