देशाचाच मारुती कांबळे झालाय!

  • संजय राऊत

देशातील लोकशाही व स्वातंत्र्यास धोका निर्माण झाल्याची बोंब मारली जात आहे. स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी वृत्तपत्रांची असते व त्यासाठी हिंमत लागते. ‘मीडिया’चे मालक सरकारजमा झाल्यावर स्वातंत्र्य कसे टिकणार? सामान्य जनतेचा मारुती कांबळे झालाय असे आता म्हणू नये, देशाचाच मारुती कांबळे झालाय.

कार्ला येथील एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सहज चोरीला गेला. कळस सोन्याचा होता याला महत्त्व नाही. मंदिरावरचा कळस चोरीला गेला हे धक्कादायक. इतिहासकाळात मोगलांनी देवळांचे कळस व कनाती कापून नेल्या; पण आज मोगलांचे राज्य नसतानाही देवांवरही दरोडे टाकण्याचे स्वातंत्र्य चोरांना मिळाले आहे. नव्या राजवटीत मानवी स्वातंत्र्याची व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय व बोलणाऱ्यांचा आवाज दडपला जातोय असे ज्यांना वाटतेय त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, असे आरोप करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. चोरांना आज चोरी करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण हे चोर अब्जाधीश असावेत. पुण्यातील एक खासदार संजय काकडे व आमदार लक्ष्मण जगताप हे विजयादशमीच्या दिनी खाकी पॅण्ट व काळी टोपी, दंडुका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनास गेले. काकडे यांचे हे नवे रूप पाहून पुण्यातील संघ स्वयंसेवकांनाही धक्का बसला असेल. संघ हा एक विचार आहे व संघ स्वयंसेवक हा जन्माला येतो तो अचानक गरजेनुसार निर्माण होत नाही या मताचा मी आहे. पण ‘संघमुक्त भारत’ करण्याचे नारे देणारे बिहारचे नितीश कुमार हे संघाच्याच कृपाछत्राखाली गेले व पुण्यातील उद्योजक काकडे हे संघ स्वयंसेवक बनले. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व मुखवटे बदलण्याचे स्वातंत्र्य आजही कायम आहे.

rokh-thokगळचेपी कोणाची?
स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे व त्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत पुन्हा आंदोलन करणार आहेत. लोकशाही रुळावरून घसरली आहे असे कुणास वाटत असेल तर त्यास आमची वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उगाच भूमिका घेण्याचे कारण नाही व विरोधासाठी विरोध या धोरणाने मोदी व त्यांच्या सरकारला एकांगी झोडपणेही योग्य नाही. बोलणाऱ्यांचा सध्या गळा दाबला जातोय असे जे सांगतात त्यांना देशातील लोकशाहीचा आवाका माहीत नाही. यशवंत सिन्हा यांनी मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर हल्ला केला. कश्मीरबाबतच्या धोरणांचेही वाभाडे काढले व मीडियाने त्यास महत्त्व दिले. पण सरकारला जितके हवे तितकेच महत्त्व दिले. लोकांनी बोलायचे नाही व लिहायचे नाही. कारण सत्य सांगण्यासाठी जी हिंमत लागते ती आज दिसत नाही. चमचेगिरी व गुलामी यांना महत्त्व देणारा मोठा वर्ग आजही एका बेबंद धुंदीत आहे व त्या धुंदीत ते स्वतःला धन्य मानत आहेत. हिंदुस्थानातील बहुसंख्य मीडियाचे मालक हे सरकारजमा झाले आहेत आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य नेमके किती असावे याचे प्रमाण मालकांनी संपादकांना ठरवून दिले व मालकांना सरकारने ठरवून दिले. त्या मापात बसले म्हणूनच स्वातंत्र्याचा आज जप सुरू झाला आहे, हासुद्धा धोकाच आहे आणीबाणीतही असे घडले नव्हते.

टीकेला उत्तर
गौरी लंकेश या महिला पत्रकाराची हत्या कर्नाटकात झाली. कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असतानाही टीका भाजप व पंतप्रधान मोदींवर होत आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या काँग्रेस राजवटीत झाल्या. या हत्यांमागे काँग्रेस राज्यकर्त्यांचा हात नक्कीच नसावा. पण या सगळ्यांच्या हत्या एका विचारसरणीच्या मंडळींनी केल्या असा आरोप आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केली वा भारतीय जनता पक्षाला झोडपले म्हणून कुणाची हत्या झाली असे आतापर्यंत घडले नाही. सोशल मीडियावर सरकारविरोधी भावना व्यक्त करणाऱ्या युवकांना नोटिसा पाठवून धमकावण्याचे काम सरकारी यंत्रणेमार्फत होत आहे, पण सरकारी यंत्रणा हे सर्व उद्योग परस्पर करीत असते याचा अनुभव आणीबाणीत अनेकांनी घेतला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कर्नाटकातील एक अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर ‘मार्मिक’ टीका केली म्हणून आता या अभिनेत्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी स्वतः अनेकदा पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांवर जोरदार टीका केली आहे व त्या टीकेस कमरेखालच्या भाषेत उत्तर देण्याचे स्वातंत्र्य सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी घेतले आहे. स्वातंत्र्य हे एकतर्फी नसावे. ती दुधारी तलवार आहे. स्वातंत्र्य सहज मिळत नाही, ते झगडून मिळवावे लागते. तरच त्याचे मोल.

नक्की काय?
देशात खरोखरच दडपशाही सुरू आहे काय यावर आता खुली चर्चा व्हायला हवी. आणीबाणीचे उदाहरण आपण नेहमीच देत असतो. तेव्हा आजच्याप्रमाणे टीव्हीच्या वृत्तवाहिन्या नव्हत्या, पण वृत्तपत्रांची मुस्कटदाबी झालीच होती व आकाशवाणी ही संजय गांधींची बटीक बनली होती. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली होती व ‘मार्मिक’लाही त्याचा फटका बसला. काँग्रेसविरोधी भूमिका घेणाऱ्या किशोर कुमारसारख्या गायकांवर आकाशवाणीने सरळ बहिष्कार टाकला होता व अनेक वृत्तपत्रांना टाळे लागले. तसे वातावरण आता खरोखर असते तर ‘सामना’सारख्या वृत्तपत्रांना टाळे लावायला एव्हाना सरकारी माणसे आली असती. आज परिस्थिती अशी आहे की, वृत्तपत्रे व मीडियातील एका वर्गाने स्वतःच सरकारची गुलामी पत्करली आहे. कारण मालकांना सरकारकडून स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे सरकारचा उदो उदो हीच त्यांची राष्ट्रभक्तीची व्याख्या. ती धोकादायक आहे. मराठीतील दोन नामवंत लेखकांनी व्यक्त केलेल्या भावना शेवटी देतो व हा विषय संपवतो. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी ठाण्यातील एका साहित्यविषयक कार्यक्रमात सांगितले.

सत्य सांगणाऱ्या लेखकांना संपविण्याचे षड्:यंत्र सुरू आहे.

लेखकाच्या शब्दाचा धाक वाटावा, लेखकाचे लिखाण सत्ताधीशांसाठी, विषमतावाद्यांसाठी, प्रस्थापितांसाठी अवघड जागेचे दुखणे होऊन बसावे अशी परिस्थिती समाजात निर्माण होणे ही आदर्श स्थिती आहे. मात्र सत्य मांडण्याची लेखकाची ताकद संपुष्टात आणली जात आहे. गौरी लंकेश यांच्यावर लेखणीने प्रतिहल्ला करण्याऐवजी त्यांना संपविण्यात आले. विचारांचा प्रतिवाद विचारांनी होऊ शकतो यावर इथल्या हिंदुत्ववाद्यांचा मुळीच विश्वास नाही, अशी टीका डॉ. पवार यांनी केली. देशभरातील विद्यापीठांमध्ये पाहायला मिळणारी दहशत नुकसानकारक आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, आयआयटी मद्रास येथील अलीकडच्या काळातील लोकशाही समर्थनार्थ उपक्रम रद्द करण्यात आले. विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकगण यांनी स्वतंत्रपणे विचार करणे पूर्णपणे थांबवावे असे सध्याचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला अनेक धुमारे फुटायला हवेत. लेखक, कलावंतांचीच नव्हे तर संशोधक, वैज्ञानिकांची तगडी फळी उभी राहणे गरजेचे आहे. डॉ. पवार यांनी जे सांगितले ते सगळेच सत्य नसेल, पण त्यांना हे सांगावेसे वाटले व अनेकजण आज हेच सांगत आहेत.

रामदास फुटाणे यांच्यासारख्या परखड कवींना आज नव्या आणीबाणीची भीती वाटत आहे.

‘‘देशात २०१९ च्या आधी आणीबाणी जाहीर होईल. काँग्रेसने आणीबाणीत जनतेला अठरा महिने तुरुंगात ठेवले, हे भाजपचे सरकार ३६ महिने तुरुंगात ठेवील. देशातील परिस्थिती प्रक्षोभक होत आहे. अशा वातावरणात सरकारला सद्बुद्धी मिळो, लोकशाही जिवंत राहो…’’ अशा शब्दांत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

श्री. फुटाणे पुढे सांगतात ते महत्त्वाचे. ‘‘जगात हिंसा वाढत चालली आहे. सरकारविरोधी लिहिले म्हणून नोटीस पाठवणे वाईट आहे. अशा प्रकारांचा निषेध केला पाहिजे’’, असे फुटाणे यांनी आवर्जून नमूद केले. ‘‘समाजाचे प्रश्न आर्थिक असताना जातीचे मोर्चे निघत आहेत. राजकारण हा बागायदार, जमीनदारांचा खेळ आहे. पूर्वीच्या राजकारणाला वैचारिक बैठक होती. आता ते उत्पन्नाचे साधन आहे, पण सत्तेची भूक सर्व काळात सारखीच असते. देशाची तीस वर्षे जात गोंजारण्यात गेली आहेत. जाती घट्ट केल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. व्यासपीठावर फुले, शाहू, आंबेडकर यांचा नारा देणारे खाली आले की, मात्र जात पाळतात. मतदारसंघात जातीची घरे किती हा विचार केला जातो. देशापेक्षा धर्म, धर्मापेक्षा जात आणि जातीपेक्षा पोटजात महत्त्वाची झाली आहे. जात आणि धर्माच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षात नाही. हे राजकारण देशाची वाट लावत आहे,’’ असा हल्ला फुटाणे यांनी चढवला.

‘‘सामान्य नागरिकाचा आजही ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळे’ होतो. मारुती कांबळेचा बळी जात आहे. सत्ता, संपत्तीची भूक वाढली आहे.’’

श्री. फुटाणे यांचा सूर टीकेचा असला तरी त्यातील वेदना समजून घेतली पाहिजे.

जे तत्त्वाचे आणि नीतीचे सगळ्यात जास्त बोलतात तेच तत्त्वांचे मारेकरी ठरतात.

लोकशाही व सद्भावनेविषयी जे जास्त चिंता व्यक्त करतात त्यांनाच लोकशाही व स्वातंत्र्य संपवायचे असते.

जगाचा इतिहास तेच सांगतोय.

सामान्य जनतेचा ‘सामना’ चित्रपटातील मारुती कांबळे झालाय असे श्री. फुटाणे म्हणतात.

देशाचाच मारुती कांबळे झालाय!

twiter – @rautsanjay61
[email protected]