दोन श्रीमंत छत्रपतींची लढाई! ‘अजिंक्यतारा’चा इतिहास काय सांगतो?

– संजय राऊत

सातारच्या गादीचे दोन ‘वंशज’ सध्या रस्त्यावरचा राडा करीत आहेत. उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे यांच्यातील ‘राडा’ आता कौटुंबिक, व्यक्तिगत राहिला नसून समस्त सातारकर व मराठी माणसाला त्यामुळे वेदना होत आहेत. अजिंक्यतारा किल्लाही आता अश्रू ढाळीत असेल.

तिहास घडविणाऱ्या घरातील वंशजच जेव्हा आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतात तेव्हा काय होते? या प्रश्नाचे साधे-सोपे उत्तर म्हणजे, ‘सातारच्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार होय!’

साताऱ्यातील दोन भोसल्यांत सध्या जे धुमशान सुरू आहे ते पाहता सगळेच मर्द मराठे अस्वस्थ असतील. ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा ज्यांच्या प्रेरणेतून देण्यात येत आहे त्या शिवरायांच्या दोन वंशजांनी साताऱ्यातच एकमेकांच्या छातीवर मरण्या-मारण्यासाठी बंदुका रोखल्या आहेत. हे पाहून शिवरायांचा ऐतिहासिक अजिंक्यताराही अश्रू ढाळत असेल. अजिंक्यताऱ्याने जे पाहिले, जे सहन केले, जे उपभोगले त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. शहाजीराजांपासून ते थेट शेवटच्या प्रतापसिंगांच्या करुण इतिहासाचा हा अजिंक्यतारा साक्षीदार आहे. अजिंक्यताऱ्याने आयुष्यभर जखमा आणि वेदनाच भोगल्या. आजही सातारच्या गादीच्या दोन वारसदारांतील तलवारबाजी आणि बंदुकबाजी बघून अजिंक्यतारा अश्रूच ढाळीत असेल.

अजिंक्यताऱ्याचे दर्शन
साताऱ्याला मी अनेकदा गेलो. येता-जाताना किल्ल्याच्या तटाचे दर्शन घेतले. तेव्हाचा काळ वेगळा होता. साताऱ्याचे दोन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे व शिवरायांनी स्थापन केलेल्या सातारच्या गादीची अप्रतिष्ठा सुरू आहे. ती पाहून अजिंक्यतारा पुन्हा एकदा जणू शिवरायांना साकडे घालीत आहे. शहाजीने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले व त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. तो आनंद मनात साठवून रोमांचित झालेला अजिंक्यतारा तो हाच! त्याने शिवरायांचे दुःख पाहिले. त्यांचा आजार पाहिला, औरंगजेबाला मारलेली धडक पाहिली. राजारामाची हतबलता पाहून व त्यांच्या निधनाचे दुःख ऐकून शोकमग्न झालेल्या अजिंक्यताऱ्याने असे असंख्य घाव स्वकीयांकडूनच झेलले आहेत, पण मोगलांचा हल्ला होताच किल्लेदार प्रयागजी प्रभूंचे अतुल शौर्य पाहून तो गहिवरला हेसुद्धा तितकेच खरे.

मनोगत एका गडाचे
माधव गडकरी आज नाहीत. त्यांच्याबरोबर चार वेळा साताऱ्यात गेलो व अजिंक्यताऱ्याची माती मस्तकी लावली. साताऱ्याच्या राजघराण्यातील राजकीय भाऊबंदकी पाहून अजिंक्यताऱ्याचे मनोगत काय असेल असा प्रश्न पडला. अजिंक्यताऱ्याचे मनोगत गडकरी यांनी मांडले ते रंजक आहे.

१३५८ ते १३७५ हा बहामनी बादशाहीचा वैभवाचा काळ. अजिंक्यताऱ्याचा जन्म याच काळातला. विजापूरकरांनी नंतर तो आपल्या ताब्यात घेतला व त्याची जोपासनाही मोठ्या ईर्षेने केली. शहाजीराजे जेव्हा विजापूरकरांचे नोकर होते तेव्हा त्यांना देशमुखी मिळाली ती कऱ्हाड प्रांताची. अजिंक्यताऱ्याचा अधिक उपयोग विजापूरकर करीत होते ते तुरुंग म्हणून. या तुरुंगात असलेले मुधोजी व बजाजी निंबाळकर पळाले ते शहाजीराजांच्या मदतीनेच. त्यांनी फलटणची जहागिरी मिळविली. शहाजीचे ऋण बजाजी निंबाळकराने नाते जोडूनच फेडले. त्यांची बहीण सईबाई शिवाजीची पत्नी झाली.

फलटणची कन्या पत्नी झाली तरी १६७५पर्यंत शिवछत्रपतींकडे सातारचा किल्ला आला नव्हता. मे १६७३ मध्ये शिवाजीने परळीचा किल्ला घेतला, परंतु सातारा किल्ला हस्तगत व्हावयास नोव्हेंबर उजाडला. विजापूरकरांनी त्याची बांधबंदिस्ती चांगली केली होती व अनेक महिने वेढा घातल्यावर व झुंज दिल्यावरच तो किल्ला शिवाजी महाराजांना जिंकता आला. ११ नोव्हेंबर १६७५ हाच तो दिवस. याच दिवशी शिवशाहीचा जरीपटका अजिंक्यताऱ्यावर झळकला. परंतु किल्ला मिळाला व महाराज आजारी पडले. त्याच अवस्थेत चारपाच महिने ते अजिंक्यताऱ्यावर राहिले. संभाजीच्या हुडपणाने व्यथित झालेल्या त्या राजाने याच काळात रामदास स्वामींशी तत्त्वचिंतन केले व राज्यपदासंबंधीची आपली अनासक्ती प्रकट केली. एकीकडे स्वराज्य तर निर्माण झाले आहे, पण ती धुरा वाहणारा वारस समोर दिसत नाही, ही व्यथा शिवाजी महाराजांनी अजिंक्यताऱ्याला त्या वेळी ऐकविली असावी. राजे गेले, संभाजीला मोगलांनी धुळीला मिळविले व औरंगजेब स्वतः अजिंक्यताऱ्यासमोर, मराठेशाहीवर निकराचा व अखेरचा प्रहार करण्यासाठी येऊन उभा ठाकला.

ज्याने राज्याचा लोभ धरला नव्हता, त्या राजारामावर मराठेशाहीचा पडता डोलारा सावरण्याची व औरंगजेबाच्या आक्रमणाला तोंड देण्याची वेळ आली. १६९८ मध्ये त्याने सातारा हीच राजधानी केली. १६९९ मध्ये औरंगजेब साताऱ्याच्या सरहद्दीवर हजर झाला. तो पन्हाळ्यावर चालून जाईल या अपेक्षेने राजारामाने काही आराखडे बांधले होते. ते चुकीचे ठरले. मराठेशाहीची नवी राजधानी घेण्यासाठी आलमगीर दरवाजात उभा ठाकला होता.

परंतु त्याच वेळी मराठे आपल्या मर्दुमकीला, सत्त्वाला जागले. किल्लेदार प्रयागजी प्रभू याने औरंगजेबाशी जी झुंज दिली तिच्या रोमहर्षक स्मृतीवरच अजिंक्यतारा आपली शान आज राखून आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला अझमशहा, दक्षिणेला शिर्झेखान, पूर्वेला तबियतखान असे औरंगजेबाचे सवाई शिलेदार मोर्चे लावून बसले. आत धान्यसाठा कमी होता तरी किल्ला सोडायचा नाही या हिमतीने मराठे आतच बसले. औरंगजेबाने किल्ल्यावर चढाई केली तेव्हा वरून मोठमोठ्या दगडांचा असा जबरदस्त मारा या किल्लेदाराने केला की औरंगजेबाला केवळ त्या वर्षावामुळे परत फिरावे लागले. साडेचार महिने वेढा घालूनही किल्ला पडेना, तेव्हा तबियतखानाने सुरुंग पेरण्याचे ठरविले. तटापर्यंत मजल मारून दोन ठिकाणी त्याने सुरुंग पेरले. मराठे तटाजवळ पुढे यावेत म्हणून त्यांनी माघार घेण्याचे नाटक केले. मराठे तटावर आले तसा पहिला सुरुंग त्याने उडविला. हा अपूर्व प्रसंग पाहण्यासाठी सर्व मोगल जमा झाले होते व अजिंक्यताऱ्याची अवनती पाहण्यासाठी औरंगजेब जातीने तिथे हजर झाला होता. पहिल्या सुरुंगाने तटाला अनेक खिंडारे पडली. आवाजही इतका जबरदस्त झाला की किल्ल्यातील मराठे साफ गोंधळून गेले. किल्लेदार प्रयागजी प्रभू उधळलेल्या दगडाखाली गाडला गेला, परंतु मराठ्यांनी हाय खाल्ली नव्हती. निष्ठा सोडली नव्हती. दुसरा सुरुंग उडाला व बाजूही उलटली. त्या सुरुंगाची पेरणी चुकीची ठरली व अजिंक्यताऱ्याची शकले उडताना पाहण्यासाठी जमलेल्या दोन हजार मोगल सैनिकांच्या या सुरुंगाने चिंधड्या उडाल्या. किल्लेदार प्रयागजी प्रभू ढिगाऱ्यातून पुन्हा वर आला. तो जिवंत होता. मराठ्यांना तो शुभशकूनच वाटला व शस्त्र गमावलेले व धान्यसाठा नसलेले मराठे पुन्हा लढाईला उभे राहिले. ईर्षा होती, पण अस्त्र नव्हती. माणसे कमी होती. शिबंदी संपली होती. अखेर किल्ला औरंगजेबाने घेतला. एप्रिल १७०० मध्ये हा किल्ला मोगलांकडे गेला. त्याच्या एक महिनाच आधी सिंहगडावर राजारामाचे निधन झाले होते. हे वृत्त जेव्हा साताऱ्याला आले तेव्हा वेढा घालून बसलेल्या मोगल सैन्यात आनंदाची लाट उसळली व अजिंक्यतारा मात्र शोकसागरात बुडाला, परंतु राजा मेला तरी त्याच्या गादीसाठी हिंमत न सोडता लढणाऱ्या या किल्लेदाराचे नाव अजिंक्यताऱ्याने अमर केले. अझमशहाने किल्ल्यावर झेंडा लावला तेव्हा किल्ल्याचे नाव अझमतारा ठेवले.

रोमहर्षक इतिहास
मराठेशाहीने अखेर औरंगजेबाचेच महाराष्ट्रात थडगे बांधले. साताऱ्याची राजधानी नंतर परत मिळविण्यासाठी प्रथम पुढे कोण आले, हा इतिहास तर कादंबरीइतका रोमहर्षक आहे. जिंजीच्या किल्ल्यातून सुटलेला अण्णाजी पंत नावाचा एक नकल्या शाहीर, गमती जमती करीत मोगलांच्या ताब्यात असलेल्या अजिंक्यताऱ्यात एकटा शिरला. आपल्या चतुर गोष्टींनी त्याने सर्वांना भारावून टाकले. खुद्द किल्ल्यात राहण्याची त्याने परवानगी मिळविली. इकडे ताराबाई धैर्याने उभी राहिली होती. तिच्या प्रतिनिधीमार्फत मावळे मिळविले. वेषांतर करून त्यांना किल्ल्यात आणले व एकदम छापा घालून या ‘विदूषका’ने किल्लाच घेतला. नंतर शाहूची दिल्लीहून सुटका झाली व त्याने ताराबाईच्या पक्षाचा किल्लेदार शेख मिरा याला फितवून किल्ला हाती घेतला. मार्च १७०८ मध्ये शाहूचा अजिंक्यताऱ्यात राज्याभिषेक झाला. अजिंक्यताऱ्याच्या इतिहासातील हा परम आनंदाचा क्षण.

कारण त्यानंतर भरभराटीस आलेली मराठ्यांची राजवट अनेक वर्षे अजिंक्यताऱ्याने अनुभविली. शाहूचा सेनापती धनाजी जाधव याचा साधा कारकून म्हणून काम करीत असलेला बाळाजी विश्वनाथ, या अजिंक्यताऱ्यानेच प्रथम पाहिला. त्याला पेशवाईची वस्त्र या अजिंक्यताऱ्यातच मिळाली. पहिल्या बाजीरावाचे कोडकौतुक शाहूने याच किल्ल्यात केले. अनेक मसलती, कितीतरी स्वाऱ्यांचे मनसुबे याच किल्ल्याने रचले. नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मराठेशाहीने अटकेपार मारलेली घोडदौड ऐकून अजिंक्यतारा कृतकृत्य झाला.

परंतु नंतर काळ फिरला. ज्या भोसल्यांनी तिथे राज्य स्थापन केले तिथेच तुरुंगात बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. माणसासारखे गावालाही ग्रहमान अनुकूल असावे लागते. उदाजी चव्हाणामार्फत ताराबाईने लुटालूट सुरू केली. तेव्हा खुद्द ताराबाईला व तिच्या सुनेला राजसबाईला याच किल्ल्यात कैदी म्हणून यावे लागले. कान्होजी भोसलेला अजिंक्यताऱ्याच्या कैदेतच मृत्यू आला.

बाणेदार प्रतापसिंह
प्रतापसिंहावर स्वतःची गादी सांभाळण्याचा प्रयत्न करतो असाच आरोप ठेवून इंग्रजांनी त्याला फरपटत बाहेर काढले ते याच किल्ल्यातून. १० फेब्रुवारी १८१८ ला अजिंक्यतारा किल्ला इंग्रजांच्या प्रथम हाती आला व नंतर १८४८ मध्ये किल्ल्यासह साताऱ्याचे राज्य इंग्रजांनी आपल्या राज्यात कायमचे समाविष्ट करून टाकले. पण सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांनी शेवटपर्यंत स्वाभिमान जपण्यासाठी जो संघर्ष केला त्यास इतिहासात तोड नाही. इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांना १८३९ साली फितुरीचे आरोप ठेवून पदच्युत केले, पण त्याआधी फितुरीच्या आरोपपत्रकावर मुकाट्याने सही करून द्या तर तुम्हाला राज्यावर बसवू, अशी त्यांना धमकी घालण्यात आली. त्या वेळी इंग्रज रेसिडेंटला छत्रपती प्रतापसिंहाने जे बाणेदार उत्तर दिले ते पाहण्यासारखे आहे. ‘‘राज्य जाईल अशी धमकी देता कशाला? मी कधीच राज्याची हाव धरलेली नाही. उलट चौकशीशिवाय केलेले आरोप मुकाट्याने मान्य करून राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही, समजलात? मी कधी कुणाचे काही वाकडे केलेच नाही तर तुम्हाला अगर प्रत्यक्ष काळालाही मी भिणार नाही. आता माझ्या कबुलीच्या सहीसाठी एवढ्या विनवण्या कशाला करता नि धाक तरी कशाला देता? छाती असेल तर करा ना उघड चौकशी. काय वाटेल ते केलेत तरी असत्यापुढे या प्रतापसिंहाची मान रेसभरसुद्धा वाकणार नाही. फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरून मी आपले चरित्र कलंकित करून घेणारा नव्हे!’’

त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज यांना तर याहीपेक्षा तडफदार उत्तर प्रतापसिंहाने दिले. ते म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही मला काय दुकानदार, सावकार का बंगाली बाबू समजता? मराठी स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांच्या गादीवरचा त्यांचा खास वंशज आहे मी. त्या स्वराज्यावरील हक्क मी सोडून देऊ म्हणता? असे करून माझ्या पूर्वजांच्या नावाला मी तर कलंक लावणार नाहीच, पण माझा एकही वंशज तसे करणार नाही. तुमच्या अटी मान्य करण्यापेक्षा मी मरण पत्करीन!’’

प्रतापसिंहाचा वकील रंगो बापूजी इंग्रजांची मनधरणी करण्यासाठी इंग्लंडला गेला आणि तेथे चौदा वर्षे राहिला. शेवटी लंडनहून त्यांनी तमाम मराठ्यांना अशी निर्वाणीची हाक मारली, ‘‘आशियातल्या सगळ्या राष्ट्रांना जागृत करण्यासाठी मी माझ्या कोट्यवधी हिंदी बांधवांच्या नावाने टाहो फोडून ओरडून सांगेन की, बापहो, जागे व्हा आणि या अंग्रेजांना नीट ओळखून राहा. महाराष्ट्र राज्य बुडवून आपल्या घशात घालावे असा त्यांचा मतलब नजरेस येतो. हिंदूंचे राज्य बुडवावे असा क्रम सुरू आहे. परंतु ईश्वर कसे करतो ते पाहावे. समय औरंगजेबियाचा. जसे सर्व हिंदू बुडवावे तसा आहे. ईश्वर हिंदू राज्ये बुडवील असे घडणार नाही. या लोकांस भ्याले किंवा नरमाई दाखविली म्हणजे तत्काळ गळा कापतात…’’

इतिहासाचे बेभान
अजिंक्यताऱ्याचा इतिहास आज सगळेच विसरले. सातारच्या दोन्ही छत्रपतींच्या मागे ‘आगे बढो’च्या घोषणा देणाऱ्यांनी तरी या इतिहासाची पारायणे करावीत व दोन्ही छत्रपतींना इतिहासाचे भान ठेवायला सांगावे. दोन्ही छत्रपतींना झालेय तरी काय? उदयनराजे व शिवेंद्रराजे हे सख्खे चुलतभाऊ. दोघेही एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार. शिवरायांचा वारसा दोघेही सांगतात व शरद पवारांचे नेतृत्व दोघेही मानतात, पण एकमेकांवर तलवारी रोखून दोन्ही छत्रपती उभे आहेत. छत्रपती उदयनराजेंवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. खंडणीचाही झाला. रस्त्यावर शीळ मारत उदयनराजे जातात तेव्हा त्यांच्यामागे प्रेम करणाऱ्यांचा घोळका चालत जातो. उदयनराजे व शिवेंद्र यांना मानणारा मोठा वर्ग साताऱ्यात आहे, पण दुखावलेला अजिंक्यतारा श्रीमंत छत्रपतींना मानतोय का? रस्त्यावरचे तमाशे व पोलीस ठाण्यात दोन छत्रपतींनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करणे हा सातारच्या गादीचा वारसा नाही. हजारो सातारकरांचाच हा अपमान ठरावा. सातारकरांनीच आता एकत्र यावे व दोन्ही छत्रपतींमधला पेटलेला विस्तव विझवावा.

छत्रपती शिवाजीराजे मोगलांविरुद्ध हिंदवी स्वराज्यासाठी लढले. सातारचे दोन छत्रपती नक्की कुणासाठी लढत आहेत?
अजिंक्यताऱ्याचा हा सवाल आहे!

twiter – @rautsanjay61
[email protected]