रोखठोक : 2019! त्रिशंकू लोकसभेकडे…कोण किती पाण्यात?

347

rokhthok2014 चे मोदी वादळ सरले आहे. लाटेत पाणी उरले नाही हे पाच राज्यांच्या निकालांनी स्पष्ट केले. 2019ची लोकसभा त्रिशंकू असेल. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर कोण? गडकरी, राजनाथ सिंह की राहुल गांधी?

पंतप्रधान मोदी यांनी एक मोठी मुलाखत प्रसारित केली. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तरे दिली. याचा दुसरा अर्थ असा की, सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा फेब्रुवारी महिन्यात होईल. मार्च ते मे महिन्यापर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल व देशाला नवे सरकार मिळेल. निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील काय, या प्रश्नाभोवती देशाचे राजकारण फिरते आहे. 2014 साली मोदी राष्ट्रीय राजकारणात आले तेव्हाचे वातावरण व आजचे यात मोठा बदल झाला. 2014 चा माहोल हा फक्त मोदीमय होता. सोनिया गांधी, राहुल गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंगांसह काँग्रेसला घालवायचेच या एकमेव भूमिकेतून तेव्हा मतदान झाले. आज वातावरण संपूर्ण मोदी यांच्या बाजूने आहे असे ठामपणे कोणीच सांगणार नाही. 2014 साली कुणीच नसलेले राहुल गांधी हे मोदी यांच्यासमोर उभे आहेत. मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी यांचे नेतृत्व टोलेजंग नाही हे मान्य करायला हवे. पण मोदी यांच्या उत्तुंग नेतृत्वाने पाच वर्षांत भ्रमनिरास केला. त्यामुळे तुफानासमोरच्या दिव्याला महत्त्व आले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेसचे मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत. या तीनही राज्यांतील गणिते बदलतील व 2014चे आकडे भाजपला मिळणार नाहीत. निवडणुका सार्वत्रिक असल्या तरी प्रत्येक राज्यात स्वतंत्र युद्ध होईल व त्यानंतर दिल्लीची खिचडी पकेल हे आजचे चित्र आहे.

नक्की कोण हवे?
भारतीय जनता पक्षाने देशभरात 80 ते 100 जागा गमावल्या तर चित्र काय असेल यावर आजपासून खलबते सुरू आहेत. मधल्या काळात अचानक भाजपच्या घोडय़ावर स्वार झालेले खासदार संजय काकडे दिल्लीत भेटले. भाजपबरोबर राहणार नाही असे ते म्हणाले. याचा अर्थ असा की, वारे उलट्या दिशेने वाहू लागले आहेत. काकडे हे खासगी संस्थांमार्फत निवडणुकांची सर्वेक्षणे करीत असतात व अनेकदा त्यांचा ‘आकडा’ बरोबर येतो हे पुणे महानगरपालिकेत दिसले. देशातले वातावरण भाजपला पोषक नाही व भाजप 150च्या वर तरी जाईल काय अशी शंका आहे, असे श्री. काकडे म्हणाले. त्याचवेळी अंबानी गोटातील खासदार, उद्योगपती म्हणाले, ‘‘काँग्रेस 125 पर्यंत जात आहे.’’ हे आकडे चिंताजनक व भाजपला अस्वस्थ करणारे आहेत. त्यावेळी भाजपमध्ये कशा प्रकारचे वातावरण असेल याची झलक नितीन गडकरी यांच्या वागण्या-बोलण्यातून मिळते. गडकरी हे उद्या शड्डू ठोकून उभे राहू शकतात व भाजपसह इतर कुंपणावरचे पक्ष त्यांना पाठिंबा देतील. केंद्रीय मंत्रिमंडळात झपाटल्यासारखे काम करणारे मंत्री म्हणून त्यांचा लौकिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भक्कम पाठबळ जितके गडकरी यांना आहे तितके इतर कोणाला नसेल. योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेते तेव्हा गडकरींच्या पाठीशी उभे राहतील. अर्थात त्याचवेळी राजनाथ सिंह हेदेखील पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील. राहुल गांधी नकोत व मोदीही नकोत अशा वळणावर उभा असलेला दिल्लीतील सत्तासंघर्ष मला आज दिसतो आहे. पराभवाची व आमदार-खासदारांच्या अकार्यक्षमतेची जबाबदारी ही पक्षाच्या अध्यक्षांचीच असते, असे एक विधान गडकरी यांनी पाच राज्यांतील पराभवानंतर केले ते सूचक आहे. गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा मोदी, शहा हे राज्यात होते. अमित शहा कुठेच नव्हते. राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी टर्म गडकरी यांना मिळू नये यासाठी दिल्लीत कारस्थाने झाली. गडकरी हे पुन्हा अध्यक्ष झाले असते तर दिल्लीत मोदी व शहांचा उदय झाला नसता. त्यातून ‘पूर्ती’ प्रकरण निघाले व शेवटी त्या पूर्तीचा बार फुसका ठरला. पण गडकरी यांना त्याचा फटका बसला. ती वेदना घेऊन गडकरी आज दिल्लीत वावरत आहेत. प्रमोद महाजन यांच्यात धमक होती, पण ते आज आपल्यात नाहीत. शरद पवार यांना उत्तरेचे राजकारण आडवे गेले. गडकरी 2019 च्या त्रिशंकू लोकसभेची वाट पाहत उभे आहेत.

…तर मोदी विरोधी बाकावर
काँग्रेस पक्षाने शंभरपर्यंत मजल मारली तरी मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना विरोधी बाकावर बसावे लागेल. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांनी एकत्र येऊन निवडणुका लढू नयेत यासाठी सरकारी पातळीवर अघोरी प्रयोग सुरू आहेत. सी.बी.आय., अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व ई.व्ही.एम. ही तीन महत्त्वाची हत्यारे आजही भाजपधुरिणांच्या मुठीत आहेत व हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी व्यापारी डोक्याने कोणत्याही थराला जातील असा विश्वास जनतेला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव होऊनही ई.व्ही.एम.चा संशय कायम आहे. हे आपल्या निवडणूक यंत्रणेचे अपयश आहे. जगभरात ई.व्ही.एम.चा वापर बंद केला, पण आमच्या देशात तो हट्टाने केला जातोय. एरवी आपण युरोप, अमेरिकेचे अनुकरण करतो, पण या दोन्ही देशांत ई.व्ही.एम. कचऱयात फेकले. त्यात दोष आहेत, तरीही मोदी-शहा यांनी नेमलेले निवडणूक आयुक्त ई.व्ही.एम.ला पर्याय नाही असे सांगतात. गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपने सरळ मार्गाने जिंकली नाही असे ठामपणे सांगणारे लोक भेटतात तेव्हा चिंता वाटते. सुरतमध्ये भाजप, मोदी, शहांच्या विरोधात टोकाचे वातावरण होते, पण या भागांतील सर्व जागा शेवटच्या दोन तासांत भाजपच्या पारडय़ात गेल्या व गुजरातचे पारडे फिरले. एक महत्त्वाची व्यक्ती मला भेटली व तिने सांगितले, 20 ते 25 टक्केच ई.व्ही.एम. मॅनेज केल्या जातात व त्यासाठी गुजरातच्या एका बडय़ा उद्योगपतीवर जबाबदारी आहे. ही 20-25 टक्के व्यवस्थाच भाजपला ग्रामपंचायती, विधानसभा, लोकसभेत विजयी करते. पोटनिवडणुका सोडून दिल्या जातात. लोकसभेतील उद्याच्या मतदान घोटाळय़ाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून तीन राज्यांतील विधानसभांवर पाणी सोडले, तेव्हा ‘सावधान’ असे जेव्हा लोक बोलताना ऐकतो तेव्हा धक्का बसतो.

महाराष्ट्र धूसर
महाराष्ट्राचे राजकीय चित्र अस्पष्ट आहे. शिवसेना-भाजप युतीची अद्याप फोडणीही पडलेली नाही. त्यामुळे काय शिजेल ते सांगता येत नाही. दिल्लीतील प्रवासात अशोक चव्हाण भेटले. ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची युती होईल काय?’’ यावर ‘‘व्हायला हरकत नाही’’ असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील कोणत्याही युती किंवा आघाडीविषयी खात्रीने कोणीच सांगू शकत नाही. एकमेकांचे तोलणे-मापणे सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 2014 पेक्षा मोठा विजय मिळवू असे अमित शहा सांगतात व मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असे राहुल गांधी बोलतात. देश त्रिशंकू लोकसभेकडे निघाला. याला जबाबदार शेवटी मोदी हेच आहेत. संधीचे सोने झाले नाही. त्यामुळे नव्या पर्यायाच्या शोधात देश पुन्हा चाचपडतो आहे.

TWITTER – @rautsanjay61
GMAIL – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या