रोखठोक : सिंगापुरात झाले; आपल्याकडे कधी? ‘फेक न्यूज’विरोधी कायदा!

266

rokhthok

‘फेक न्यूज’ कॅन्सरप्रमाणे वाढत जाणारा आजार. राजकारणात ‘फेक न्यूज’ हे हत्यार म्हणून वापरले जाते. आपल्याकडील लोकसभा निवडणुकांत ‘फेक न्यूज’चा सर्रास वापर झाला. बाजूच्या सिंगापूर देशात ‘फेक न्यूज’विरोधात कठोर कायदा अमलात आणला. हिंदुस्थानातही अशा कायद्याची गरज आहे.

क्त एका तासात संपूर्ण देशाला प्रदक्षिणा घालता येईल अशा सिंगापूर देशात दोन दिवस होतो. विज्ञान, तंत्रज्ञान, डिजिटल युगामुळे जग खूप जवळ आले, पण सिंगापूरसारख्या देशाची प्रगती व तेथील कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा पाहिली की, 125 कोटींचा आपला देश या सगळय़ापासून खूप लांब आहे याची खात्री पुन्हा पटते. महान परंपरा, इतिहास, युद्ध व बोलघेवडे नेते यांमुळे देश घडत नाहीत, तर संकटातून संधी निर्माण करणाऱया, ‘कष्ट हाच धर्म’ मानणाऱया राजकारण्यांमुळे सिंगापूरसारखे देश घडत असतात. समुद्र आणि दलदल बुजवून हा देश निर्माण केला. आज तो जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र बनला. जगभराच्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरला. हिंदुस्थानच्या निवडणुकीत राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करीत होते तेव्हा सिंगापूरच्या वर्तमानपत्रांत ‘फेक न्यूज’च्या मुसक्या आवळणाऱया सिंगापूरच्या नव्या कायद्यावर संयमाने चर्चा सुरू होती. 8 मे रोजी सिंगापूरच्या संसदेने ‘फेक न्यूज’विरोधातला कायदा बहुमताने संमत केला. 72 विरुद्ध 9 असे मतदान झाले व जो कायदा हिंदुस्थानात यायला हवा तो सिंगापूरने आधीच करून ठेवला. हिंदुस्थानच्या संसदेत एखादा कायदा मंजूर करताना जो गोंधळ आणि अराजक माजते त्याचा अंशही सिंगापूरच्या संसदेत दिसला नाही.

नैतिकता आणि सत्य
‘Protection from online falsehood and manipulation Bill’ असे हे सिंगापूर संसदेने मंजूर केलेले विधेयक. समाजाला, नागरिकांना खोटय़ा बातम्या व खोटय़ा प्रचारापासून संरक्षण देणारे हे विधेयक. ‘(Debates) should be based on a foundation of truth, foundation of honour and Foundation where we keep out lies, that’s what this is about.’ सत्य, सन्मान, प्रामाणिकपणा हाच या विधेयकाचा पाया आहे व त्यावरच चर्चा व्हावी असे विधेयक मांडताना तेथील कायदामंत्री के. षण्मुगम यांनी स्पष्ट केले व दोन दिवसांच्या चर्चेत सत्य, नैतिकता यावरच जोर दिसला. एकदाही वॉक आऊट झाले नाही. विरोधक कमी असले तरी ते सभापतींच्या आसनासमोर आले नाहीत. आपल्या खासदारांनी हे गुण घेतले तर जनतेचा पैसा, देशाचा वेळ वाया जाणार नाही.

कॅन्सर
‘फेक न्यूज’ हा आपल्या देशाच्या मीडियाला व राजकारणाला लागलेला कॅन्सर आहे. सिंगापूरला ‘फेक न्यूज’वर कायदा बनत असताना बंगळुरूच्या सिव्हिल कोर्टाने एक निकाल दिला व तो फेक न्यूज विरोधात होता. कोर्टाने आशियानेट (Asianet) आणि सुवर्णा न्यूज या दोन्ही चॅनेल्सना 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला. अभिनेत्री दिव्या स्पंदनाच्या संदर्भात खोटी बातमी छापून तिची बदनामी केल्याचे सिद्ध झाले व न्यायालयाने हा निकाल दिला. पत्रकारितेच्या नैतिकतेचा हा भंग असल्याचे न्यायालयाने म्हटले. ही दोन्ही चॅनेल्स भाजप खासदार चंद्रशेखर यांच्या मालकीची आहेत. देशातील बहुसंख्य वृत्तपत्रे व टीव्ही चॅनेल्स राजकारण्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची खुशामत करण्यासाठी विरोधकांना बदनाम करणाऱया खोटय़ा बातम्यांची दुकानदारी ते करतात. निवडणूक काळात सोशल मीडिया, इंटरनेट, ऑनलाइन माध्यमांमुळे खोटय़ा बातम्यांचा प्रसार होतो. ते देशाच्या व समाजाच्या हिताचे नाही. राजकारणी खोटे बोलतात, थापा मारतात व निवडणुका जिंकतात, पण राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱया वर्तमानपत्रांनी या ‘फेक न्यूज’चा गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलू नये. आपल्या देशाचा ‘सत्यमेव जयते’ हा जगण्याचा मंत्र होता. न्यायालयाच्या भिंतीवर हा मंत्र आजही रंगवलेला दिसतो. प्रत्यक्षात चित्र विरुद्ध आहे. आपले मंत्री व राजकारणीच ‘फेक न्यूज’चे मुख्य स्रोत आहेत हे एकदा मान्य केले तर सगळय़ात कठोर कायदा हा सरकारी पदावर बसून खोटे बोलणाऱयांच्या विरोधात बनवावा लागेल. लोकशाही मंदिराचा पाया, राष्ट्राच्या चौथ्या स्तंभाचा पाया आज खोटेपणावर टिकून आहे. सिंगापूरमध्ये आता हे सर्व कायद्याने बंद होईल. इंटरनेट, ऑनलाइनवर खोटी बातमी पसरवणाऱयांवर बंधने आली व त्यातील गुन्हेगारांना दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद झाली. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण झाले. विरोधी पक्षाचे नेते प्रीतम सिंग यांनी संसदेतील चर्चेत सांगितले की, या कायद्याने मंत्र्यांना अमर्याद अधिकार मिळतील व त्यातून अनेकांची गळचेपी होईल. यावर सिंगापूरचे कायदामंत्री के. षण्मुगम ताडकन उठून म्हणाले, ‘कायद्याचा दुरुपयोग होणार नाही. हे सिंगापूर आहे, महाशय!’ असे आपल्या देशात कोणी ठामपणे सांगू शकेल काय?

कॅसिनोचा व्यापार
सिंगापूरचा नागरिक फक्त त्याच्या कामावर चर्चा करतो. दुसऱयांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात त्याला रस नाही. मुंबईत मलेरिया व डेंग्यूचा हल्ला नेहमीचा आहे. मुंबईत अस्वच्छता व डबकी असणे हे त्याचे कारण. त्याचे खापर शेवटी सरकार, पालिकेवर फोडले जाते. सिंगापूरची आरोग्य यंत्रणा उत्तम, स्वच्छतेची तडजोड नाही, पण वर्षभरात तिथे साडेतीन हजार जणांना डेंग्यूची लागण झाली. सिंगापूरला प्रचंड ‘कॅसिनो’ उभी राहिली आहेत. जगभरातील पर्यटक ‘कॅसिनो’त पैसे उधळतो. त्यातून सरकारला प्रचंड महसूल मिळतो, पण पुन्हा येथे सरकारने एक कायदा करून ठेवला. कोणत्याही सिंगापुरी नागरिकाला ‘कॅसिनो’त जाऊन जुगार खेळता येणार नाही. म्हणजे बाहेरचा पैसा देशात यावा व देशातील जनतेने स्वतःच्याच देशात जुगार खेळून कंगाल होऊ नये. मलेशिया, इंडोनेशिया, जपान आणि चीनचे लोक ‘कॅसिनो’त येऊन पैसे उडवतात व सिंगापूरची अर्थव्यवस्था त्यातून बळकट होते, पण या देशात फक्त कायद्याचेच राज्य आहे.

महाभारतात काय झाले?
गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानात ‘फेक न्यूज’चा कारभार वाढला आहे. हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद, मुसलमानांची धर्मांधता यावर ‘फेक न्यूज’चा कमालीचा प्रभाव पडला आहे. या फेक न्यूजचे मूळ पुन्हा महाभारतात आहे. ‘अश्वत्थामा मेला’ अशी अफवा युद्धभूमीवर पसरली. द्रोणाचार्य अस्वस्थ झाले. त्यांना कळेना, कुणाला विचारावे? सगळय़ात विश्वसनीय व्यक्ती धर्मराज म्हणजे युधिष्ठर. तो कधीही खोटे बोलणार नाही याची त्यांना खात्री होती. ते त्याला विचारतात. धर्मराजाला धर्मसंकटातून सोडविण्यासाठी भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला असतो.
युधिष्ठर सांगतो, ‘होय, अश्वत्थामा मेला.’ आणि द्रोणाचार्यांना ऐकू येणार नाही अशा आवाजात पुटपुटतो, ‘नरो वा कुंजरोवा!’ माणूस की हत्ती ते माहीत नाही. धर्मराज म्हणून जो विख्यात, तोच खोटे बोलला. धर्मराजांचे उत्तर ऐकल्यावर पुत्रवियोगाने खचलेले द्रोणाचार्य शस्त्र्ात्याग करतात आणि दृष्टद्युम्न त्यांची हत्या करतो व युद्धाचा निकालच बदलून जातो. हिंदुस्थानी इतिहास आणि संस्कृतीतील ही पहिली ‘फेक न्यूज.’ फेक न्यूजचा आधार घेऊन कृष्णाने पांडवांना महाभारतात विजय मिळवून दिला, पण शेवटी ती राजनीती होती व कृष्णाची लढाई असत्य आणि अधर्माविरुद्ध होती.

आज नेमके कोण कशासाठी लढत आहेत? मी सांगेन तेच सत्य असे सांगणारे व असत्य उजळवून टाकणारे लोक सभोवती आहेत. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग केले. पण ज्याने त्यांना गोळी मारली ते गोडसेही अखंड हिंदुस्थान हेच सत्य असे फाशी जाईपर्यंत ओरडत राहिले. राजकारणात व उद्योग-व्यवसायात आता सगळेच खोटे बोलतात. त्यामुळे सत्य बोलणाऱयावरही विश्वास ठेवता येत नाही. सिंगापूरच्या संसदेने आता खोटे छापणाऱयांच्या विरोधात सरळ कायदा केला. हिंदुस्थानालाही एक दिवस हे करावेच लागेल.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या