रोखठोक : भाजपची वनगांना श्रद्धांजली!

rokhthokचिंतामण वनगा यांनी आयुष्यभर भाजपचा प्रचार केला. त्यांच्या मुलाचा पराभव करून भाजपने वनगा यांना श्रद्धांजली वाहिली! हा पराभव व्हावा यासाठी साम, दाम, दंड, भेद नीती वापरली. भाजप पालघरला जेमतेम जिंकली ती असंख्य षड्यंत्रे रचून. भंडारा-गोंदियात ते पराभूत झाले. तसेच देशात अन्य ठिकाणीही पीछेहाट झाली. पालघर विजयाचा आनंद २०१९ पर्यंत टिकणार नाही असे देशातले वातावरण आहे…

महाराष्ट्रातील ‘पालघर’ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला, पण देशभरात झालेल्या जवळजवळ सर्वच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पराभव केला. विदर्भ हा भाजपचा अभेद्य गड राहिला नाही हे भंडारा-गोंदियाच्या पराभवाने दाखवून दिले. महाराष्ट्राचे वारेही देशाच्या बरोबरीनेच वाहत आहेत. ‘भंडारा घेऊ घासून आणि पालघर घेऊ ठासून’ अशी घोषणा भाजपतर्फे देण्यात आली. प्रत्यक्षात पालघरला विजयी झाले असले तरी हा विजय निर्विवाद नाही. विजयाचे गोडवे गावेत व विजय साजरा करावा अशी परिस्थिती अजिबात नाही. निकालाच्या पूर्वसंध्येस भाजपचे एक आमदार भेटले व त्यांनी सांगितले, ‘पालघर जिंकू की नाही हे माहीत नाही, पण पालघर आम्ही काढले आहे!’ जिंकणे आणि ‘काढणे’ यातला फरक ज्यांना समजला त्यांना पालघर विजयामागचे सत्य समजेल. पालघरचा विजय ठासून नव्हता व भंडारा घासूनही नव्हता. महाराष्ट्रातील दोन्ही निकाल म्हणजे भाजपच्या वाताहतीची सुरुवात आहे.

देशाचे लक्ष
पालघर पोटनिवडणुकीत काय निकाल लागेल त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. शिवसेना व भारतीय जनता पक्ष हे महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र आहेत, पण पालघरात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व त्यात एका सत्ताधाऱ्यांचा विजय झाला तेवढ्यापुरताच या निकालाचा अर्थ नाही. सत्तेत राहूनही शिवसेना भारतीय जनता पक्षाला विरोध करीत राहिली. शिवसेना २०१९ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढेल. त्याची सुरुवात पालघरपासून झाली. पालघरला भारतीय जनता पक्षाला २ लाख ७२ हजार मते मिळाली व शिवसेनेने २ लाख ४३ हजार मते घेतली. स्थानिक बहुजन विकास आघाडीने २ लाख २२ हजार मते घेतली. काँग्रेस व कम्युनिस्ट दोघांनी मिळून लाखभर मते घेतली. हे लक्षात घेतले तर २ लाख ७२ हजार मते मिळवणाऱया भाजपच्या विरोधात सहा लाखांवर मते पालघरात पडली. भाजपने सत्तेचा वापर केला. पैसे वाटले, पोलीस व निवडणूक यंत्रणा गुलामासारखी वापरली. हे सर्व केले नसते व नीतिमत्तेचे दर्शन घडवले असते तर पालघरला भाजप किमान ८० हजार मतांनी पराभूत झाला असता.

कसला निवडणूक आयोग?
निवडणूक आयोग हा सत्ताधारी हुकूमशहाच्या हातचे कळसूत्री बाहुले म्हणून काम करतो. संघ शाखेशी संबंधित असलेले लोक घटनात्मक पदावर बसवून त्यांच्याकडून निवडणुकीचे सूत्रसंचालन करणे हे धोकादायक आहे. यामुळे संघ विचारांची बदनामी होते. महाराष्ट्रात दुर्दैवाने तसे घडत आहे. पालघरला ते प्रत्यक्ष दिसले. मतदान केंद्रांवर दरोडे टाकण्यापेक्षा, बूथ लुटण्यापेक्षाही हे भयंकर आहे.

शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सगळय़ात मोठा राजकीय शत्रू आहे. शिवसेनेचा प्रखर हिंदुत्ववाद यापुढे भाजपास अडचणीचा ठरू शकेल. त्यामुळे गरज आहे तोपर्यंत शिवसेनेबरोबर रहा व सत्ता, पैसा यांचा वापर करून शिवसेनेची ताकद कमी करा हे सध्याचे भाजपचे धोरण आहे. भंडारा-गोंदियात विजयासाठी जेवढी ताकद लावली नाही त्यापेक्षा शंभरपट जास्त ताकद पालघरला शिवसेना पराभूत व्हावी म्हणून लावली गेली.

‘साम-दाम-दंड-भेद’ वापरून पालघरला जिंकू असे ते म्हणाले, पण ही भाषा त्यांनी भंडारा-गोंदियाच्या संदर्भात वापरली नाही. भंडारा-गोंदिया विदर्भात असूनही मुख्यमंत्री गाफील होते व पालघरला ते ठाण मांडून बसले. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पराभवासाठी त्यांनी काँग्रेसकडून राजेंद्र गावित यांना आयात केले. भाजपला शिवसेनेवर विजय मिळवण्यासाठी स्वतःचा उमेदवारही मिळाला नाही. वनगा यांच्या मुलास तिकीट नाकारले, पण चिंतामण वनगा यांचे फोटो गावितांच्या बाजूला लावून मते मागितली. वनगा यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ती निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली नाही. मतदारांना पैसे आणि दारू वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना खुलेआम पकडले गेले. निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱयांनी येथेही दुर्लक्ष केले. मतदान संपताच रात्री आठ वाजता जिल्हाधिकाऱयांनी ४६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. हा अधिकृत सरकारी आकडा होता, पण पुढच्या १२ तासांत ही टक्केवारी अचानक बदलली. मतदान ५६ टक्के झाले व एका रात्रीत ८२ हजार मते वाढली. हे धक्कादायक होते. मतपेटय़ांची वाहतूक खासगी वाहनांतून केल्याचे उघड झाले. याहीपेक्षा मोठा घोटाळा ईव्हीएमचा होता. मतदानाच्या दिवशी पालघरात किमान शंभर ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बिघडली. त्यामुळे चार तास रांगा लावूनही ६० हजार लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. शिवसेनेने मतदानाची वेळ वाढवून मागितली तेव्हा त्यास नकार देणाऱया निवडणूक अधिकाऱयांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी मतदानासाठी वेळ वाढवून मागताच त्यांची मागणी मंजूर केली व संध्याकाळी वेळ संपल्यावर ज्या मतदान केंद्रांवर मतदान झाले त्या प्रत्येक ईव्हीएमवर भाजप उमेदवाराला सरासरी १०० मते जास्त पडली. अशा पद्धतीत काही हजार मते वाढवून घेतली. ही फसवणूक व गैरव्यवहार आहे असे न वाटणाऱ्या निवडणूक आयोगाकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा करणे चूक आहे. कायद्याचे राज्य संपले आहे. तसे न्यायालये व निवडणूक आयोगातील तटस्थता नष्ट झाली आहे. ज्याची सत्ता त्याचेच कायद्याचे राज्य असा ‘हम करे सो कायदा’ सर्व स्तरांवर चालला आहे.

कारस्थानी कोण?
शरद पवार हे राजकारणात कारस्थाने करतात, असा सतत आरोप करणाऱ्यांनी अचंबित व्हावे असे प्रकार देवेंद्र फडणवीस व त्यांचे लोक राज्यात करीत आहेत, पण शरद पवार हे टीकेचे लक्ष्य होतात. भाजप सत्तेत आहे या संभ्रमातून बाहेर पडण्याची वेळ नक्कीच आली आहे. महाराष्ट्राचे व देशाचे राजकारण वेगाने बदलत आहे. २०१९ साली भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर पराभव होईल हे आता नक्की झाले आहे. जे योगी पालघर मतदारसंघात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी आले व फक्त हिंदी भाषिकांना थापा मारून गेले त्या योगी आदित्यनाथ यांचा तिसरा दारुण पराभव कैराना लोकसभा मतदारसंघात झाला. उत्तर प्रदेशातील नुरपूरची विधानसभा पोटनिवडणूकदेखील ते हरले. पालघरमध्ये जो बाप कालपर्यंत भाजपचा शिलेदार होता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचा पराभव करण्यासाठी फडणवीस व भाजपने साम, दाम, दंड, भेद नीती वापरली. मुलाचा पराभव घडवून बापाला श्रद्धांजली वाहिली हे कारस्थान नाही तर काय? देशाचे मानस आज असे आहे की, राहुल गांधी किंवा देवेगौडाही चालतील, पण मोदी-शहांची जोडी नको. महाराष्ट्रात भंडारा-गोंदिया भाजपने गमावले. तेथे विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांत थेट लढाई होती. भंडारा-गोंदियात दुष्काळाचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी हाहाकार आहे. त्यामुळे सरकारविरोधाचा रोष मतपेटीतून बाहेर पडला. काही झाले तरी विदर्भातील जागा आपण सहज जिंकू असे श्री. फडणवीस व भाजपने गृहीत धरले. पालघरला शिवसेनेच्या पराभवासाठी सर्वकाही पणास लावले. पांडवांनी द्रौपदी पणास लावली त्यापेक्षा भयंकर काम येथे झाले. सरकारी यंत्रणा इतकी लाचार, निवडणूक यंत्रणा इतकी गुलाम झालेली मी काँगेसच्या राज्यातही पाहिली नव्हती. मोखाडासारख्या भागात मतदार रांगेत उभे आहेत हे पाहून पाण्याचे टँकर पाठवले व कोरडय़ा विहिरीत ओतले. मतदार रांगा सोडून पाण्यासाठी धावले. असे प्रकार हा निवडणूक भ्रष्टाचार आहे, असे कुणाला वाटू नये. कारण भाजपसाठी घाम गाळणाऱ्या चिंतामण वनगांच्या मुलाचा पराभव करणे हेच त्यांचे ध्येय होते.

हा त्यांचा आनंद औटघटकेचा ठरेल!

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]