रोखठोक : एका ‘आजोबा’ची हत्या!

rokhthokधर्मा पाटील यांच्या आत्महत्येने सरकार खरोखर जागे झाले काय? गेल्या पंधरा वर्षांत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण धर्मा पाटील यांनी थेट मंत्रालयात घुसून मरण पत्करले. जणू एका ‘आजोबा’ने लाखो शेतकऱ्यांसाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्याने राजकारण्यांतील मृतात्मे जागे झाले; पण पुढे काय?

धर्मा पाटील हे अनंतात विलीन झाले आहेत. त्यांचे वय ८४ वर्षांचे होते. पिकले पान केव्हातरी गळणारच होते. अशी अनेक पाने रोज गळतच असतात. त्यांच्या गळण्याची व अस्तित्वाची तशी कुणीच दखल घेत नाही, पण धर्मा पाटील यांच्या मृत्यूने सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले. त्यांच्या अंत्ययात्रेला महाराष्ट्राचे मंत्री व बडे सरकारी अधिकारी उपस्थित राहिले. धर्मा पाटील असेच अनंतात विलीन झाले असते तर गावातल्या व नात्यागोत्यातल्यांनी एकत्र येऊन रामनाम, कीर्तनाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढली असती; पण धर्मा पाटलांच्या अंत्ययात्रेस पंचक्रोशीतली गावे लोटली, मोठा सरकारी फौजफाटा हजर राहिला. त्यांच्या श्रद्धांजलीचे व सरकारच्या निषेधाचे फलक लागले. ‘धर्मा पाटील अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. हे सर्व भाग्य ८४ वर्षांच्या धर्मा पाटलांना लाभले. त्यासाठी त्यांना मंत्रालयात आत्महत्या करावी लागली, विष पिऊन तडफडून मरावे लागले. त्यांच्या मरण्याने महाराष्ट्रातील १५ हजार शेतकऱ्यांचे मृतात्मे जागे झाले व सरकारला गुडघे टेकावे लागले. हौतात्म्याची ही ताकद आहे.

कसले स्वातंत्र्य?
दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून जे जगले आणि तगले, त्यांना आज स्वातंत्र्यात ‘जगावे कसे’ हा प्रश्न पडावा यापेक्षा स्वातंत्र्याची अधिक विटंबना ती कोणती? परकीय लोकांच्या राज्यात जीवनाच्या ज्या सुखसोयी होत्या तेवढय़ादेखील आपल्या स्वतःच्या राज्यात जनतेला मिळू नयेत यापेक्षा स्वराज्याची बदनामी ती कोणती? इंग्रजांच्या राज्यात निदान एक तरी मोठी सोय होती ती ही की, प्रत्येक दोषाचे खापर इंग्रजांच्या डोक्यावर निर्धास्तपणे फोडता येत होते. काहीही मनाविरुद्ध घडले की, ‘‘याला गोरा साहेब जबाबदार आहे, साहेबाला या देशातून हाकलून दिल्याशिवाय काही हे सगळं दुरुस्त होणार नाही,’’ असे मुक्तकंठाने बोलता येत होते. शिवाय साहेबाला शिव्या देण्याने देशभक्तीचे पुण्यही अनायासे पदरी पडत होते. पण आता स्वतंत्र देशात आणि स्वतः निवडलेल्या राज्यात धर्मा पाटील यांनी आत्महत्या का केली? किंवा ही आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेने केलेली हत्याच आहे असे बोलणे व कुजबुजणे हा नुसता गुन्हाच नाही, तर देशद्रोह ठरवला जात आहे. काँग्रेसवाल्यांना त्यांच्या बेमुर्वतखोर कारभारासाठी सहज शिव्या देता येत होत्या व त्याबद्दल कुणाचे काहीच वाकडे केले जात नव्हते, पण आताची दिल्ली व महाराष्ट्राची सरकारे आपली आहेत. काहींना त्यात ईश्वराचा अंशही दिसत आहे. त्यामुळे अशा ईश्वरी वरदानाच्या सरकारला नाव ठेवणे, टीका करणे यासारखा दुसरा देशद्रोह नाहीच. असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. संपूर्ण जनतेला सगळे डोळय़ांनी दिसते आहे, सगळे कळते आहे, सगळे काही उमगत आहे, पण सांगायचे कोणाला? बोलायचे कोणाला? तोंड उघडायची चोरी झाली आहे. मनात जे भडभडून येते ते बोलून दाखवायची आज बंदी आहे. धर्मा पाटील हे विरोधी पक्षांचे किंवा नक्षलवाद्यांचे हस्तक होते, त्यांनी आत्महत्या करून विरोधकांना मदत केली, सरकार उलथवण्याचा त्यांचा कट होता असे सांगून धर्मा पाटलांवरच आत्महत्या व देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणजे झाले.

शेतीचे ओझे
धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. शेतकरीपणाचे ओझे असहय़ झाले तेव्हा त्यांनी मंत्रालयाच्या दारात येऊन आत्महत्या केली. धर्मा पाटील हे काही अल्प भूधारक किंवा कर्जबाजारी शेतकरी नव्हते. त्यांची पाच एकर बागायती शेती होती. धुळे जिल्ह्यातील विखरण गाव शिंदखेडा तालुक्यात येते. तेथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी त्यांची जमीन संपादित केली, पण पाच एकर बागायती जमिनीचे मूल्यांकन फक्त चार लाख रुपये झाले. ज्या काळ्या आईने पिढ्यानपिढ्या जगवल्या त्या जमिनीची किंमत फक्त चार लाख! म्हणजे शेती गेली, उत्पन्नाचे साधन गेले व संपूर्ण कुटुंब भिकेस लावले. म्हणून जाब विचारण्यासाठी हा ८४ वर्षांचा ‘आजोबा’ सरकारदरबारी खेटा मारू लागला तेव्हा त्यास दाद मिळाली नाही. जमिनीचे सौदे करणाऱया एजंटांनी धर्मा पाटलांना हतबल केले. धर्मा पाटलांच्या गावातील शेकडो एकर जमिनी विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांच्या मालकीच्या. हे रहस्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आधी सांगितले, ‘‘माझ्या राज्यात भ्रष्टाचार संपला आहे, सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचार नष्ट झाला आहे.’’ मोदी यांच्याकडे चुकीची माहिती आहे हे धर्मा पाटलांच्या आत्महत्येने सिद्ध झाले. धर्मा पाटील धुळय़ातून मुंबईत आले. मंत्रालयात त्यांना कुणी विचारले नाही. ८४ वर्षांचा एक म्हातारा त्याच्या हक्कासाठी मंत्रालयात आला तेव्हा त्याचा मृतदेहच तिथून बाहेर निघाला. धर्मा पाटलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. हे जिवंत माणसांचे विडंबन आहे.

चार वर्षे हेलपाटे
गेल्या पंधरा वर्षांत हजारो धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्या. मंत्रालयातही अनेकांनी जीव देण्याचा प्रयत्न केला; पण ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांनी स्वतःची चिता पेटवताना एक ठिणगी सरकारच्या खुर्चीखाली टाकली. परंतु गेंड्याच्या कातडीच्या राज्यकर्त्यांना कसलेच चटके बसत नाहीत. शेतकरी मरण पावला म्हणून देश सुन्न झाला व पेटून उठला असे आतापर्यंत घडलेले नाही. दिल्लीत एका निर्भयावर बलात्कार झाला व तिला ठार केले तेव्हा पुढचे चार दिवस संसद चालली नाही व बलात्काऱ्यांना फाशी देणारा कायदा संमत करावा लागला; पण शेतकऱ्यांच्या हत्या व आत्महत्या फक्त राजकीय विषय ठरतो. धर्मा पाटील यांच्या जमीन संपादनाचे प्रकरण आधीच्या राजवटीतले आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूस आताचे सरकार जबाबदार नाही, असे सांगणे हे कोडगेपणाचे लक्षण आहे. अन्याय काँग्रेस राजवटीत झाला, पण चार वर्षे न्यायासाठी ते तुमच्याच दारात हेलपाटे मारीत होते. तुम्ही काय केलेत? न्याय नक्की कोणाला मिळतो ते सांगून टाका. धर्माचे रामराज्य यावे व त्यात शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत असे वाटले म्हणून लोकांनी महाराष्ट्राची सत्ता भाजपकडे सोपवली. पण धर्म पराभूत झाला. धर्मा पाटील मरण पावले. रामराज्यात रावणांचेच ‘अच्छे दिन’ आले. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही व आत्महत्या केल्याशिवाय जमिनीचा मोबदला मिळत नाही हेच ‘धर्मा’चे राज्य आहे काय?

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]