खोल्यांचे सोवळे; भाऊ कदमांचा गणपती, फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्रात पराभव!

पुण्यात डॉ. मेधा खोले यांचे ‘सोवळे’ प्रकरण गाजले तसे मुंबईत भाऊ कदमांचा दीड दिवसाचा गणपती अडचणीत आला. जातीच्या विळख्यातून आपण बाहेर पडायला तयार नाही. जातीच्या आधारावर सवलती घेणारेच डॉ. खोले यांच्या विरोधात बोलतात, पण हे लोक भाऊ कदमांचे समर्थन करायला तयार नाहीत. हे ढोंग नाही तर काय?

rokh-thokहात्मा फुले, आंबेडकर, शाहूंचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायत आहे व जातीचा वारसा अभिमानाने आपण मिरवतो. जातीच्या आधारावर सवलती मिळविण्यासाठी सगळेच जण आता मोर्चे काढीत आहेत व हेच लोक जातीप्रथेविरुद्ध बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. जोतिबा फुल्यांपासून विठ्ठल रामजी शिंदे यांच्यापर्यंत हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी हिंदू धर्मात शिरलेल्या व्रतवैकल्यांवरच जास्त टीका केली. निसर्ग, हवामान यांच्याशी संबंध ठेवणारी व्रतवैकल्ये धर्मरक्षकांनी आणली; परंतु त्यामुळे धर्म गौण झाला आणि उदरभरणासाठी व्रतवैकल्ये ही साधनं होऊन बसली. त्यात पुन्हा अधिकारांचा प्रश्न आला. चातुर्वर्ण्य आला. हे सारे लक्षात घेता नव्या पिढीस जातीधर्म पाळावयाचा असेल तर त्यांनी तो वैयक्तिक पातळीवर व्रतवैकल्यांचे स्तोम न माजवता पाळावयास हवा. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात ब्राह्मण वर्गापासून बौद्ध वर्गापर्यंत सध्या जे घडते आहे ते पूर्णपणे विरुद्ध आहे. पुण्यातील डॉ. मेधा खोले प्रकरणात जेवढे वातावरण तापवले तेवढे प्रख्यात कलावंत भाऊ कदम यांच्या घरच्या गणपती प्रकरणात तापवले गेले नाही. कारण या सर्वातही जातीय रंग आहेत.

श्रद्धा जपण्याचा अधिकार
देशात श्रद्धा पाळण्याचा अधिकार घटनेने सगळ्यांनाच दिला आहे, पण श्रद्धेची मारामारी चव्हाट्यावर येते तेव्हा प्रश्न निर्माण होतात. पुण्यातील डॉ. मेधा खोले यांच्या धार्मिक भावना त्यांनीच नेमलेल्या स्वयंपाकीणबाईने दुखावल्या (किंवा बाटवल्या) म्हणून डॉ. खोले यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. निर्मला यादव या वृद्ध स्वयंपाकीणबाई मराठा असतानाही ब्राह्मण असल्याचा बहाणा केला व त्यांनी खोले यांच्या घरात स्वयंपाक केला. त्यामुळे देव बाटले. धर्म आणि सोवळे भ्रष्ट झाले, असे डॉ. खोले यांना वाटत असेल तर त्या त्यांच्या वैयक्तिक श्रद्धा आहेत. पण या सर्व प्रकरणानंतर डॉ. खोले यांना ज्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला ते सर्व लोक कोण होते? जातीच्या आधारावर सर्व सवलती घेणारे व जातीय राजकारणाचे समर्थन करणारे हेच लोक आहेत. स्वतः जातीची लेबलं लावून हक्क मागायचे व एखादी डॉ. खोले पिंजऱ्यात अडकली तर तिचे लचके तोडायचे हे ढोंग आहे.

medha_kholeडॉ. खोले यांचे समर्थन मी करीत नाही. जात न मानणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पंथातला मी आहे. पण इतके प्रयत्न करूनही जात नष्ट का होत नाही? ब्राह्मणांपासून बौद्धांपर्यंत प्रत्येकजण आपल्या जातीचा अभिमान बाळगून का वावरत आहे, याचाही विचार आता होऊ द्या.

भाऊ कदम यांचे काय?
सोवळ्याचा पुरस्कार केला म्हणून डॉ. खोले यांना ज्यांनी आरोपी केले ते सर्व लोक भाऊ कदम यांच्या गणपती प्रकरणात उसळून उठले नाहीत. भाऊ कदम या कलावंतास आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. दादा कोंडके, मेहमूद व राजा गोसावी यांच्यानंतर भाऊ कदम यांनीच विनोदाचा बादशहा ही कीर्ती संपादन केली. मेहमूदला त्याचा धर्म कोणी विचारला नाही. दादा कोंडके व राजा गोसावींची जात कोणती हे कधीच कुणी विचारले नाही. भाऊ कदमांचेही तसेच आहे. पण भाऊ कदम यांनी घरात दीड दिवसाचा गणपती आणला काय आणि बौद्ध पंचायतीने त्यांना जात धर्मातून बहिष्कृत करण्याचीच धमकी दिली! भाऊ कदम यांना गद्दार ठरवून जहरी टीका करण्यात आली. तेव्हा कोठे महाराष्ट्राला या नटाची जात कळली. डॉ. आंबेडकर, फुले, शाहू, टिळकांना एका जातीचे बनविण्याचा प्रयत्न झाला तोच प्रकार भाऊ कदमांच्या बाबतीत घडला. हे मराठी माणसांचे दुर्दैव. पुण्याच्या प्रकरणात डॉ. खोले यांनी पोलिसांत तक्रार देऊन प्रकरण सार्वजनिक केले. भाऊ कदम हा साधा माणूस आहे. त्याने माफी मागून प्रकरण मिटवून टाकले. जातपंचायतीशी लढण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती व जे विद्वान खोले यांच्या विरोधात उभे राहिले ते भाऊ कदम यांच्या बाजूने उभे ठाकले नाहीत. पुण्यात खोले यांचे देव बाटले तर डोंबिवलीत भाऊ कदम बाटले म्हणून बौद्ध जातपंचायतीने भाऊंना ‘फासावर’ लटकवले. हा मूर्खपणा आहे. भाऊ कदम म्हणे बौद्ध आहेत आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा घेतल्या आहेत. मी गणपती बसवणार नाही अशी त्यातली एक प्रतिज्ञा होती. ती मोडल्याने महान अभिनेता भाऊ कदम गुन्हेगार ठरला. भाऊ एक उत्तम माणूस आहे. मोठा नट आहे व नट म्हणून तो रोज हजारो लोकांना दुःख विसरायला मदत करतो. हे सर्व आता गौण ठरले. त्याने गणपती आणून श्रद्धेने पूजा केली हा गुन्हा ठरला व महाराष्ट्र भाऊंच्या मागे उभा राहिला नाही. प्रत्येकाने श्रद्धा पाळाव्यात हा अधिकार ज्या डॉ. आंबेडकरांनी दिला त्यांच्या संविधानाचाही हा अपमान आहे.

आंबेडकरांच्या प्रतिज्ञा
डॉ. खोले व भाऊ कदम यांच्या प्रकरणात फरक आहे असे जे म्हणतात त्यांच्या मतांशी मी सहमत नाही. दोघांच्या श्रद्धा आहेत व त्यांनी त्या घरापुरत्या मर्यादित ठेवल्या. सध्याच्या युगात सोवळेओवळे पाळणे हास्यास्पद आहे, पण यादव-खोले प्रकरणात अनेकांचे सोवळे सुटले. घरात गणपती आणणे ही श्रद्धा आहे. सलमान खान हा त्याच्या घरी गणपती बसवतो, पूजा व आरती करतो. सलीम खान हे ‘वंदे मातरम्’चे समर्थन करतात व मुसलमान समाजातील अंधश्रद्धांवर कोरडे ओढतात. त्यामुळे धर्मांध मुसलमानांनी सलीम खान यांचे पुतळे त्यांच्या घरासमोरच जाळले. म्हणून सलीम खान शरण गेले नाहीत. सलमान खानने गणपती आणायचे बंद केले नाही. पण बौद्ध जातपंचायतीने मुसलमानांच्या वरताण भूमिका घेतली. लालबागच्या राजाचे जंगी स्वागत भेंडीबाजारातील मुसलमान करतात व सार्वजनिक गणपतीच्या मंडपात गणपती दर्शनासाठी मुसलमान रांगेत उभे राहतात हे मी अनेकदा पाहिलेय. डॉ. आंबेडकरांच्या नावावर काहीही खपवले जाते ते बरोबर नाही. गणपती आणू नये असे जर डॉ. आंबेडकरांनी सांगितले असेल तर काँग्रेसच्या जळक्या घरात शिरू नका, अशीही प्रतिज्ञा त्यांनी दिलीच होती. पण स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे सत्तेसाठी सर्वच बौद्ध पुढारी हे काँग्रेसचा गणपती घरात बसवून सत्तेचा स्वर्ग गाठण्यासाठी पूजाअर्चा करीत होते, तेव्हा धर्म बुडाला नाही काय? राखीव जागा व आरक्षणाचा पांगुळगाडा स्वातंत्र्यानंतर फक्त १० वर्षेच ठेवा, नंतर हा पांगुळगाडा फेकून स्वावलंबी व्हा, अशीही डॉ. आंबेडकरांची प्रतिज्ञा त्यांनी बौद्ध बांधवांना दिलीच होती. पण त्या प्रतिज्ञेच्या पाठीत सुरा खुपसून आरक्षणाची अखंड अमरज्योत पेटती ठेवली आहे, हे कसे चालते? मूर्तिपूजेचा विरोध भगवान बुद्धांनी केला, परंतु भगवान बुद्धाच्या जेवढ्या मूर्ती जगात निर्माण झाल्या तेवढ्या दुसऱ्या कोणत्याच एका व्यक्तीच्या झाल्या नाहीत. देशात डॉ. आंबेडकरांच्या झाल्या व उत्तर प्रदेशात मायावतींच्याही झाल्या. ही मूर्तिपूजा बौद्ध धर्माविरुद्ध आहे, असे कुणी सांगितले नाही. कारण मायावती सत्ताधीश होत्या व आंबेडकरांच्या नावाने सत्ता व मते त्यांना मिळतात!

बौद्धाचा खरा विचार
भाऊ कदम यांनी गणपती आणला म्हणून त्यांना गुन्हेगार ठरवणाऱ्यांनी गौतम बुद्धाचा विचार सांगितला, पण बुद्धाचे इतरही विचार फार महत्त्वाचे होते. बुद्धाने समाजाच्या दुःखाला वाचा फोडली. व्यक्तिगत खासगी मालमत्तेवर आधारलेली श्रीमंती बुद्धाला नको होती. संपत्ती संचय करू नये, असे बुद्धाने सांगितले. मालमत्तेचा मोह सोडण्याचा मार्ग बुद्धाने सांगितला. आज किती ‘बौद्ध’ या मोहातून बाहेर पडले आहेत? रामदास आठवले तर संघविचाराचे भोईच बनले आहेत. सरकारी खात्यात ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रंगेहाथ पकडले जाते त्यांची एक यादी सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध करावी व त्यांच्यासमोर त्याची जात टाकावी म्हणजे या सगळ्यांची सोवळी आपोआप सुटतील. बुद्धाने शेतकऱ्यांचा विचार केला. त्याने अजातशत्रूला विचारले, ‘‘तुझ्या राज्यात कोण कोण लोक राहतात?’’ त्याने जातवार व धंदेवार नावे सांगितली, पण शेतकरी विसरला. तेव्हा बुद्ध म्हणाला, ‘‘एकाला विसरलास. शेतकऱ्याला विसरलास!’’ जे शेतकऱ्याला विसरले ते बुद्धाला विसरले, बुद्धाला विसरले ते डॉ. आंबेडकरांना विसरले. हेच लोक भाऊ कदमांच्या गणपतीला विरोध करीत आहेत.

हिंदूंचेच लढे!
धर्मसुधारणा आणि जातीभेद निर्मूलनासाठी जितके प्रयत्न व लढे हिंदू धर्मात झाले तितके अन्य कोणत्याही धर्मात झाले नसतील. जोतिबा फुले यांच्याइतकेच हे श्रेय आगरकर, लोकहितवादी देशमुख व प्रबोधनकार ठाकरे यांना द्यावे लागेल. मेधा खोले प्रकरणात अनेक दलित विचारवंतांनी आपला कंडू शमवून घेतला, पण हेच सर्व लोक ‘जात’ प्रमाणपत्र घेऊन एखाद्या सरकारी पदासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या दारात उभे असतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जातात. दलित राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती करणार आहात तर मग आम्हीच आहोत, असे तिथे जाऊन सांगणाऱ्यांत महाराष्ट्रातील पुढाऱ्यांची व विचारवंतांचीच संख्या जास्त. पुन्हा हे सर्व लोक डॉ. खोलेंचा जातीयवाद व सोवळेवाद काढण्यात आघाडीवर. त्यापैकी एकानेही भाऊ कदम यांना संरक्षण दिले नाही. लोकमान्यांनी गणपती उत्सव सुरू केला तो धर्म म्हणून नव्हे, तर लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येण्याचे साधन म्हणून याचा विसर सगळ्यांना पडला. अजमेरच्या व हाजी अलीच्या दर्ग्यात हिंदू जातात. अनेक बौद्ध बांधवांना मी तिथे पाहिले. मुंबईतील माऊंट मेरी जत्रेत सर्वच जातीधर्माचे लोक श्रद्धेने जातात म्हणून त्यांना बहिष्कृत केल्याचे फतवे काढावेत काय? १८७३ मध्ये जोतिबा जो स्फुल्लिंग फुलवितात त्याचे विशाल रूप गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारात मिळते. १८५७ ते १८९६ हा आगरकरांचा काळ. फक्त ३९ वर्षांचे आयुष्य मिळालेल्या या खऱ्याखुऱ्या समाजसुधारकाने जातीभेद नष्ट करण्यासाठी जे लिहिले ते नव्या पिढीने निदान वाचावे. आगरकर लिहितात, ‘‘जातींमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातींमुळे ज्ञान, कला, शास्त्र वगैरे जिथल्या तिथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातींमुळे सर्व आचारांत व विचारांत मतभेद निर्माण होऊन ती परस्पर वैरास, छळास आणि मत्सरास कारण झाली आहेत. जातींमुळे अन्न, व्यवहार, विवाह वगैरेच्या संबंधाने कितीतरी गैरसोय झाली आहे. जातीभेदामुळे आमची भूतदया, आमचे बंधुप्रेम, आमचे औदार्य, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकारी वृत्ती, आमचे विचार यांचे क्षेत्र किती मर्यादित झाले आहे याची लोकांना कल्पनाच येत नाही.’’

नव्या पिढीने जात विसरण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर नवे अराजक निर्माण होईल.

महाराष्ट्रात आजही जातपंचायत आहे. जातीतून बहिष्कृत करण्याचे फतवे निघतात. फुले, आंबेडकरांचा हा पराभव आहे. खोले, भाऊ कदमांच्या प्रकरणात हा पराभव झाला. कारण लढणाऱ्यांनी तलवारी म्यान केल्या.

twiter –  @rautsanjay61
email –  [email protected]

 • Rajesh Mac

  खोले बाई यांच्यावर झालेली टीका अधोरेखित करताना, संपादक हे भाऊ कदम आणि सलीम खान यांचे उदाहरण देतात. या सर्वांची सांगड घालताना ते या तीनही जणांच्या विचारांना विरोध करणार्यांना जातीयतेच्या पिंजऱ्यात उभे करू पहातात.

  परंतु या तिन्ही प्रकरणांमध्ये, जे ब्राह्मणी विचारश्रेष्ठत्व आणि व्रतवैकल्य ते मांडतात त्यातच खरा या सर्व गोष्टीचा गाभा दडलेला आहे. येथे मनुष्य केंद्रित न होता साहित्यकेंद्रीत झाल्यावरच आपला यातला भ्रम दूर होतो. व्रतवैकल्ये, गणपती किंवा जय हिंद हि समाजातील एका विशिष्ट्य वर्गाकडून प्रमाणित केलेल्या प्रथा. यामध्ये प्रमाणित होते ती पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा, केरळातील ओणम, पपडम, गुजराथमधील रसदांडिया, किंवा भारतीयांचा सर्वात मोठा समजला जाणारा सण दिवाळी यांचेही प्रमाणीकरण या वर्गाकडून ठरवले जाते. हे तर झाले उत्सवांचे प्रामाणिकरण, हे इतक्यावरच संपत नाही, या साच्यामध्ये सामाजिक प्रथा, चालीरुढी, दलितद्वेष आणि मुस्लिमद्वेष, खाण्या पिण्याच्या आणि राहणीमानाच्या, कुणी काय बोलावे, काय परिधान करावे, काय प्रदर्शित करावे इत्यादी बर्याच बाबी समाविष्ट होतात.

  मात्र जेव्हा खोले बाई जातीय द्वेष करतात, त्या त्यांच्याच मनुस्म्रीतीद्वारे शूद्र गणल्या गेलेल्या स्वतःच्या स्त्रीजातीत जन्मलेल्या एका स्त्रीला द्वितीय पायदानावर लेखतात आणि तसे वर्तनही करतात हे संपादक अधोरेखित करू इच्छित नाहीत, त्याला त्यांचे सामाजिक राजकीय स्थानही कारणीभूत आहे आणि त्यांच्या स्थानस्थिरतेसाठी असे करणे त्यांना गरजेचेही आहे. तेव्हा हे स्पष्ट होते कि अब्राह्मण स्त्रीचे जेवणही न स्वीकारणारे, असे ब्राह्मण्यवादी मानसिकतेचे अब्राह्मणी ज्ञानही कशे प्रमाणित करू इच्छितील.

  ब्राह्मण्यवादी वृत्ती म्हणजे स्वश्रेष्ठता आणि परद्वेष्टता. समाजाच्या सांस्कृतिक सनातनी विचारांचा गाभा हा खरा ब्राह्मण्यवादताच आहे हे जोपर्यंत आपण समजावून घेत नाही तोपर्यंत आपला क्रन्ति-प्रतिक्रांतीचा पराक्रम चालूच राहणार. मग तो हिंदू-मुस्लिम पराक्रम असो, ब्राह्मण-श्रमण पराक्रम असो, दलित-दलितेतर असो, ब्राह्मण-शूद्र असो कि आणखी इतर कोणता. काहीं विशिष्ट प्रथांचे, विचारांचे उदात्तीकरण वा काहींचे विवंछन करणे हे या वर्गाचे काम.

  परंतु हा वर्ग कोणता हे जर आपणास ठाऊक नसेल तर हा वर्ग आहे तो भद्रलोकींचा – शब्दशः नव्हे तर गुणधर्म सापेक्ष अर्थ घेतल्यावर आपणाला या वर्गाची मक्तेदारी स्पष्ट होईल. या भद्रलोकीची महिमा ही सर्व नेपथ्यांवर कार्यरत आहे आणि ती तशी राहीलही, परंतु बुद्ध, पैगंबर, येशू, बसवेश्वर, कबीर, रोहिदास, तुकाराम, फुले, एकनाथांनी आणि इतर संतमहात्म्यांनी ही मक्तेदारी तोडून मानव धर्माचे दैदिप्य जपले. तसेच कार्य गॅलिलिओ, कोपर्निकस यांनी वैज्ञानिक क्षेत्रातही खरे नेपथ्य दाखवून जनतेची होणारी दिशाभूल थांबवली. परंतु धर्मवेड्या जनतेला आणि त्याचा गाडा हाकणाऱ्या या प्रमाणित करणाऱ्या भद्रलोकींना या खऱ्या क्रांतीची भीती भेडसावत असते.

  मग ते जातिप्रथेचे समर्थन असो कि पौराणिकत्वाचे उदात्तीकरण असो, कोणत्याही एका विचारधारेचे श्रेष्ठत्व हे पूर्ण काळ पूर्ण भूलोकावर परिभाषित होऊ शकत नाही, नव्हे ते शक्य नाही , हे त्या भद्रलोकी मज्जारज्जू आणि मज्जातंतूंतल्या विचारला समजत नाही तोपर्यंत या भारतीय समाजाचा तिढा सुटणे अशक्य. अब्रहम लिंकन या अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्षांनी दिलेले विचारधन आजही कामी येते, ‘आपण सर्व लोकांना काही वेळ मूर्ख बनवू शकता, आणि काही लोक नेहमीच मूर्ख बनवू शकता, परंतु कधीही सर्व लोक नेहमीच मूर्ख बनवू शकत नाही.’
  देवदेवतानासुद्धा मातीचेच पाय असतात मग आपण तर मनुष्य, आपले ज्ञानही या भूलोकीवर ऋण ठरू शकते त्यात शंका ती काय.

  खरा मानवधर्म तेव्हाच पूर्णत्वास जाईल जेव्हा आपण सर्व व्यक्तिसापेक्ष भेदभावाचे राजकारण दूर सारून जातिसंस्थेचे उदात्तीकरण थांबवू.

 • Sushil Bansode

  अत्यंत वैयक्तिक मते आहेत तुमची लेखक साहेब आणि अत्यंत सुमार दर्जाचा अभ्यास आहे. फॅक्टस माहीत नसताना असे पेपर मध्ये काहीही लिहू नये.
  खोले बाई या जातीच्या आधारावर एखाद्याला कमी लेखले म्हणून बहुजनांनी या प्रकरणात विरोध केला. भाऊ कदम यांनी गणपती बसवला याला विरोध केला कारण की हिंदू धर्मामध्ये महार जातीला नीच आणि अस्पृश्य समजले जाते. कितीही नाही म्हणाल तरी आजही जातीय अत्याचार गावोगावी होत आहेतच. मनुष्याला समान न मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून महार समाज बौद्ध झाला आहे. भाऊ कदम एक सेलिब्रिटी असल्याने बौद्ध समाजातील लोक पुन्हा हिंदू धर्माच्या दलदलीत जाण्याची शक्यता असल्याने त्यांना दम देण्यात आला. खोले प्रकरण आणि भाऊ कदम प्रकरण यांच्यात गल्लत करू नका. धार्मिक स्वातंत्र्य सर्वांना आहे. याचा अर्थ खोले बाईंनी जे केलं त्याला धार्मिक स्वातंत्र्य समजून त्याला विरोध नाही झाला पाहिजे. भाऊ कदम यांनाही धार्मिक स्वातंत्र्य आहे पण जसे हिंदू धर्मात काही गोष्टी चालत नाहीत तसे बौद्ध धम्मात गणपती पूजने चालत नाही. हा देखील मग वैयक्तिक मामला आहे असे समजा. कुणीही त्यात लक्ष घालू नये. तुम्ही धर्मनिरपेक्ष असल्यास तसे जाहीर करून दाखवा. शिवसेनेचा भगवा सोडून तिरंगा वर धरा.

  राहिला विषय 10 वर्षे आरक्षणाचा तर बाबासाहेब फक्त 10 वर्षे आरक्षण ठेवा असे कोठे म्हणाले होते ते ऑफिशियल पुरावा सांगा. युट्युब वर या बाबतीत एक महत्वाचा व्हिडीओ आहे तो बघा. त्यात सर्व पुराव्यासह हे सिद्ध केलंय की असे कोणतेही स्टेटमेंट बाबासाहेबांनी कधीही केले नव्हते.

  आरक्षण पूर्ण बंद झाले पाहिजे या मताचा मी देखील आहे पण जातीय अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत आरक्षण असले पाहिजे असेही माझे मत आहे. एखादा कांबळे नावाचा माणूस सरकारी ऑफिसर असल्यास त्याला तुम्ही त्याला ज्या पद्धतीने बघता तो नजरिया बदलेपर्यंत आरक्षण राहीले पाहिजे. Stop discrimination first then we will stop the
  reservation.

  • Atul Suryawanshi

   सामना संपादकाने स्वतःचं ज्ञान नीट चाचपूनच तोंड उघडलेलं योग्य ठरेल.
   दहा वर्षे मर्यादा हि फक्त आणि फक्त राखीव जागेवरील आरक्षण करिता शिक्षण-नौकरी-पदोन्नती मध्ये नव्हते.
   ह्यांचा बाळ पण डॉ. बाबा साहेब आंबेडकरजी लिखित “हिंदूत्वातील कोडं” पुस्तकातील ‘राम-कृष्ण कोडं’ वर अपरिपक्वता (बचपणा) दाखवायचे आणि त्यांचेच चेलेचपाटे आज डॉ. बाबा साहेब आंबेडकरजींच्या बूद्ध धम्मातिल बाविस प्रतिज्ञांचा घोळ वादग्रस्त पैदाईश गणपती च्या माध्यमातून परत बौद्ध विरूध्द हिंदू दंगली घडवून आणण्यासाठी गद्दार भालचंद्र कामाला मोहरा बनवण्याचा ब्राह्मणी षडयंत्र करण्याचा डाव खेळतांना परत दिसून येत आहे.

  • nitin gaikawad

   फारच छान प्रतिक्रिया आहेत सर तुमच्या.

 • Rajesh Mac

  तुमचे विचार महान आणि आमचे स्पॅम – यालाच म्हणतात विचारस्वातंत्र्य
  खोले बाई यांच्यावर झालेली टीका अधोरेखित करताना, संपादक हे भाऊ कदम आणि सलीम खान यांचे उदाहरण देतात. या सर्वांची सांगड घालताना ते या तीनही जणांच्या विचारांना विरोध करणार्यांना जातीयतेच्या पिंजऱ्यात उभे करू पहातात.
  परंतु या तिन्ही प्रकरणांमध्ये, जे ब्राह्मण्यवादी विचारश्रेष्ठत्व आणि व्रतवैकल्य ते मांडतात त्यातच खरा या सर्व गोष्टीचा गाभा दडलेला आहे. येथे मनुष्य केंद्रित न होता साहित्यकेंद्रीत झाल्यावरच आपला यातला भ्रम दूर होतो. व्रतवैकल्ये, गणपती किंवा जय हिंद हि समाजातील एका विशिष्ट्य वर्गाकडून प्रमाणित केलेल्या प्रथा. यामध्ये प्रमाणित होते ती पश्चिम बंगालमधील दुर्गापूजा, केरळातील ओणम, पपडम, गुजराथमधील रसदांडिया, किंवा भारतीयांचा सर्वात मोठा समजला जाणारा सण दिवाळी यांचेही प्रमाणीकरण या वर्गाकडून ठरवले जाते. हे तर झाले उत्सवांचे प्रामाणिकरण, हे इतक्यावरच संपत नाही, या साच्यामध्ये सामाजिक प्रथा, चालीरुढी, दलितद्वेष आणि मुस्लिमद्वेष, खाण्या पिण्याच्या आणि राहणीमानाच्या, कुणी काय बोलावे, काय परिधान करावे, काय प्रदर्शित करावे इत्यादी बर्याच बाबी समाविष्ट होतात.
  मात्र जेव्हा खोले बाई जातीय द्वेष करतात, त्या त्यांच्याच मनुस्म्रीतीद्वारे शूद्र गणल्या गेलेल्या स्वतःच्या स्त्रीजातीत जन्मलेल्या एका स्त्रीला द्वितीय पायदानावर लेखतात आणि तसे वर्तनही करतात हे संपादक अधोरेखित करू इच्छित नाहीत, त्याला त्यांचे सामाजिक राजकीय स्थानही कारणीभूत आहे आणि त्यांच्या स्थानस्थिरतेसाठी असे करणे त्यांना गरजेचेही आहे. तेव्हा हे स्पष्ट होते कि अब्राह्मण स्त्रीचे जेवणही न स्वीकारणारे, असे ब्राह्मण्यवादी मानसिकतेचे अब्राह्मणी ज्ञानही कशे प्रमाणित करू इच्छितील.
  ब्राह्मण्यवादी वृत्ती म्हणजे स्वश्रेष्ठता आणि परद्वेष्टता. समाजाच्या सांस्कृतिक सनातनी विचारांचा गाभा हा खरा ब्राह्मण्यवादताच आहे हे जोपर्यंत आपण समजावून घेत नाही तोपर्यंत आपला क्रन्ति-प्रतिक्रांतीचा पराक्रम चालूच राहणार. मग तो हिंदू-मुस्लिम पराक्रम असो, ब्राह्मण-श्रमण पराक्रम असो, दलित-दलितेतर असो, ब्राह्मण-शूद्र असो कि आणखी इतर कोणता. काहीं विशिष्ट प्रथांचे, विचारांचे उदात्तीकरण वा काहींचे विवंछन करणे हे या वर्गाचे काम.
  परंतु हा वर्ग कोणता हे जर आपणास ठाऊक नसेल तर हा वर्ग आहे तो भद्रलोकींचा – शब्दशः नव्हे तर गुणधर्म सापेक्ष अर्थ घेतल्यावर आपणाला या वर्गाची मक्तेदारी स्पष्ट होईल. या भद्रलोकीची महिमा ही सर्व नेपथ्यांवर कार्यरत आहे आणि ती तशी राहीलही, परंतु बुद्ध, पैगंबर, येशू, बसवेश्वर, कबीर, रोहिदास, तुकाराम, फुले, एकनाथांनी आणि इतर संतमहात्म्यांनी ही मक्तेदारी तोडून मानव धर्माचे दैदिप्य जपले. तसेच कार्य गॅलिलिओ, कोपर्निकस यांनी वैज्ञानिक क्षेत्रातही करून, खरे नेपथ्य दाखवून जनतेची होणारी दिशाभूल थांबवली. परंतु धर्मवेड्या जनतेला आणि त्याचा गाडा हाकणाऱ्या या प्रमाणित करणाऱ्या भद्रलोकींना या खऱ्या क्रांतीची भीती भेडसावत असते.
  मग ते जातिप्रथेचे समर्थन असो कि पौराणिकत्वाचे उदात्तीकरण असो, कोणत्याही एका विचारधारेचे श्रेष्ठत्व हे पूर्ण काळ पूर्ण भूलोकावर परिभाषित होऊ शकत नाही, नव्हे ते शक्य नाही , हे त्या भद्रलोकी मज्जारज्जू आणि मज्जातंतूंतल्या विचारला समजत नाही तोपर्यंत या भारतीय समाजाचा तिढा सुटणे अशक्य. अब्रहम लिंकन या अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्षांनी दिलेले विचारधन आजही कामी येते, ‘आपण सर्व लोकांना काही वेळ मूर्ख बनवू शकता, आणि काही लोक नेहमीच मूर्ख बनवू शकता, परंतु कधीही सर्व लोक नेहमीच मूर्ख बनवू शकत नाही.’
  देवदेवतानासुद्धा मातीचेच पाय असतात मग आपण तर मनुष्य, आपले ज्ञानही या भूलोकीवर ऋण ठरू शकते त्यात शंका ती काय.
  खरा मानवधर्म तेव्हाच पूर्णत्वास जाईल जेव्हा आपण सर्व व्यक्तिसापेक्ष भेदभावाचे राजकारण दूर सारून जातिसंस्थेचे उदात्तीकरण थांबवू. यासाठी जाती विरहित धर्म संस्था आणि जातीविरहित धर्मज्ञान करणे ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतील.

 • Pratik Mohite

  सर…..देवळांचा धर्म आणि देवळातला धर्म हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाचले आहे का तुम्ही ??

 • कुलदिप यादव

  राखीव जागा व आरक्षणाचा पांगुळगाडा स्वातंत्र्यानंतर फक्त १० वर्षेच ठेवा, नंतर हा पांगुळगाडा फेकून स्वावलंबी व्हा, अशीही डॉ. आंबेडकरांची प्रतिज्ञा त्यांनी बौद्ध बांधवांना दिलीच होती.

  हा शोध कुठून लावलात खा. राऊत साहेब आणि तुम्हाला बाबासाहेब झेपणार नाहित तरी कमीत कमी एक वेळ तरी आद. प्रबोधनकार ठाकरे वाचावे

 • Buddham Ahire

  Sala kadi prabhodakar vicharanch kadi samarthan karnar rautya, tumcha rajkaran dharmavar chalta na tula Kay farakh padto

 • Jayanand Kamble

  Mr. Sanjay Raut,
  I dont understant how you became editor of such a big newspaper?
  You are comparing Khole chapter with Bhau Kadam. It shows your mental backwardness.
  As a editor first you need to study the background of both the incidences, and then write. I dont know what is your social background (even dont want to know) but your article is biased. and before saying anything about Dr. Ambedkar, first read your own Prabodhankar Thakare. when Khole says “Dharm Batala/Budala” and your comment on this as “her own matter-shraddhecha vishay” here is defeat of your own Prabodhankar…

 • Dhanraj Gadekar

  राऊत साहेब, आधी धर्माची देऊळे आणि देवळांचा धर्म वाचा…प्रबोधनकार ठाकरे वाचा…मग बाकीच्या गप्पा मारा… बापाने जर पोराला सांगितलं की दारू पिऊ नको पण तरी पोरगा दारू रोज पीत असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे,18 वर्ष पूर्ण आहेत म्हणून मोकळीक देणार का.. एखादा चुकत असेल तर त्याला त्याची चूक समजावून सांगणे म्हणजे जातपंचायत वाटली का तुम्हाला…? आणि बौद्ध समाजाचा जात पंचायत असा उल्लेख करून तुम्ही बौद्ब धम्माचा अपमान करत आहात… भाऊ कदम ला काही प्रॉब्लेम नाही तर मग तुमची मूळव्याध का उठली…

  इथं गावोगावी जेव्हा दलितांवर अन्याय अत्याचार झाले,बलात्कार झाले,समाजाला बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा कोणत्या बिळात होतात तुम्ही…

  आणि एक रामदास तिकडे गेला म्हणून समाज तिकडे गेला असं होतं नाही…
  आणि असंही रामदास आठवले आणि तुमची स्थिती फार काही वेगळी नाही…

  दुसऱ्याला शिकवण्याचं सोडा आधी शिवसेना आणि स्वतःला सांभाळा…

  आमचाच बाप आम्हाला नका शिकवू…
  (तुम्ही बाबासाहेबांना किती मानता हे चांगलं माहीत आहे म्हणून बाबासाहेब फक्त तुमचेच का असा खुळचट प्रश्न करू नका)

 • Pramod Shinde

  कालच्या १७ संप्टेंबर चा संजय राऊत यांचा रोखठोक मधील “खोल्यांचे सोवळे ,भाऊ कदमांचा गणपती, फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्रात पराभव !” हा लेख वाचला .
  लेखावर मी माझी प्रतिक्रिया तर दिली परंतु संजय राऊत यांचा लबाड पणा मित्रांना कळण्यासाठी ती प्रतिक्रिया येथे देत आहे .
  छान … परंतु संजय राऊत हा लेख लिहताना स्वतः गोंधळून गेलेत भाऊ कदम प्रकराणावर तोंडसुख घेताना ब्राम्हणाना कसे दुखवावे? हाच मोठा प्रश्न संजय राऊत याना पडलाय , हाच तो गोंधळ, आपल्या लेखात एके ठिकाणी ते लिहतात मी खोले बाईंचे समर्थन करत नाही, तर दुसरी कडे लिहतात , खोले बाईनी सोवळे पाळताना यादव यांच्यावर जातीचा आरोप करणे , ही त्यांची वैयक्तीक श्रद्धा आहे.
  संजय राऊत जी जे चुक आहे चुक ते चुकच आहे हे बोलण्यासाठी मोठी हीम्मत लागते, ती आपल्याकडे अजिबात नाही .
  – प्रमोद शिंदे , मुंबई

 • nitin gaikawad

  क्रांतीबा फुले यांची आई सांगायची की ज्योतीबाचा जन्म झाला त्याच दिवशी शनिवार वाड्याचा शेवटचा अवशेष जळत होता…!

  क्रांतीबा फुले यांचा जन्म झाला त्याच कालखंडात ईंग्रजी राजवट इथे राज्य करीत होती. 14 व्या शतकापासून जगभर पसरलेले प्रबोधनाचे वारे भारताच्या दारात येऊन थबकले होते. फुलेंची मावशी इंग्रजांच्या घरी कामाला असल्याने फुले तिच्या सोबत रहायचे त्यातूनच त्यांना चांगल्या प्रकारे इंग्रजीचे धडे मिळत गेले, त्यामुळे जगभरची तत्वज्ञाने वाचून फुलेंचा पिंड प्रबोधनात्मक झाला होता. म्हणूनच त्यांना “थॉमस पेन” सारखा विचारवंत वाचता आला अज्ञानामुळे माणसाची ज्ञानाची गती लोप पावली होती तिथेच क्रांतीबा फुले यांनी निखाऱ्यावर फूंकर मारल्या प्रमाणे वडीलांना नकार देऊन एक मोठी प्रबोधनाची क्रांतीमय चळवळ सुरू केली. त्यातूनच स्रीयांना शिक्षणाचा अधिकार नसताना स्वतःच्या बायकोला सावित्रीबाईला शिकवून स्रीयांसाठी प्रथम भारत देशात शाळा काढली. त्यामुळेच खोले बाई आज शिकून मोठ्या झाल्या…

  तो आरंभ झाला म्हणून आज अनेक स्रीया शिक्षण घेत आहेत. त्यापुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडून स्रीयांना सरंक्षण दिले आणि संविधानाच्या माध्यमातून उच्च-निचता आणि जातीभेद कायद्याने कायमचा नष्ठ केला. अशा वेळी सामन्याचा सामान्य संपादक म्हणतो की “सोवळे ओवळे” पाळून खोले बाईंनी आपल्या धर्माचा अधिकार पाळला आहे. प्रबोधनकाराचा वारसा असणाऱ्या दैनिकाकडून ही अपेक्षा नाही…

  दुसरे भाऊ कदम यांचा विषय यामध्ये उगाच घुसडून फुले-आंबेडकरांचा पराभव हे शिर्षक देऊन स्वतःचेच हसे करुन घेतले आहे. प्रबोधन म्हणजे कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करणार नाही याबाबत सांगणे गुन्हा नाही आगरकरांपासून दाभोळकरांपर्यंत कर्मकांडांवर टिका टिप्पणी केली आहे तो गुन्हा आहे का? आपण आपल्या देशात प्रबोधनाची प्रक्रीया घडूच नये असा काही विडा उचलला आहे का? असा प्रश्न पडतो…

  देशा आणि संविधाना पेक्षा कोणताच धर्म मोठा नाही…