मुखवटे गळून पडत आहेत, मंत्र्यांनी किती बोलावे?

113

rokhthokराज्यकर्ते व राजकारण्यांनी किती बोलावे, हे आता ठरवायला हवे. महाराष्ट्रातील अनेक मंत्री वारेमाप बोलतात व अडचणीत येतात. चंद्रकांत पाटलांपासून रावसाहेब दानव्यांपर्यंत, अजित पवारांपासून प्रकाश आंबेडकरांपर्यंत सगळेच बोलत सुटले आहेत!

मनुष्य एकदा इरेस पेटला म्हणजे त्याच्या ठिकाणी तारतम्य बुद्धी राहात नाही, पण हा मनुष्य जेव्हा मोठ्या जनसमुदायाचे नेतृत्व करीत असतो, तेव्हा त्याने शक्यतो इरेला पेटू नये व तारतम्याचा बाजार मांडू नये. महाराष्ट्राचे मंत्री व राजकीय पुढारी सध्या काय बोलतात त्याचे चिंतन करावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता स्पष्ट केले आहे की, ‘‘अयोध्येत जनजागृतीतून राममंदिर उभारणार.’’ श्री. भागवत यांचा विचार योग्य आहे, पण जनजागृती म्हणजे नक्की काय? राममंदिराबाबतच्या जनजागृतीतूनच दिल्लीत रामभक्तांचे म्हणजे मोदींचे व उत्तर प्रदेशात योगींचे राज्य आले आहे. मग आता कोणत्या जनजागृतीच्या प्रतीक्षेत संघ परिवार आहे? राममंदिर हे जनजागृतीतूनच निर्माण करायचे होते तर मग अयोध्येत राममंदिराच्या लढ्यात इतके हिंदू का मारले व शरयू नदीत हिंदू रक्ताच्या लाटा का उसळल्या?

बेताल बोलण्याची स्पर्धा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत जपून बोलतात, तोलून मापून वागतात. त्यांचे भान सुटते ते फक्त निवडणूक प्रचारांत, पण त्यांचे मंत्री व पदाधिकारी उधळलेल्या घोड्यावर मांड ठोकण्याचा प्रयत्न करतात व कोसळतात. शिवसेनेवर सर्वाधिक टीका कोण करतो यात किरीट सोमय्या व आशीष शेलार यांच्यात स्पर्धा सुरू होते व स्पर्धा संपली कधी हे त्यांना कळत नाही. रावसाहेब दानवे यांनी किती बोलावे हे आता अमित शहा यांनीच ठरवून दिले पाहिजे. मुख्यमंत्री न बोलता कमावतात ते दानवे बडबडून गमावतात. चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री. उद्याचे मुख्यमंत्री म्हणून ते वावरतात; पण ‘‘भारतीय जनता पक्षात भिंग घेऊनही चांगले कार्यकर्ते शोधता येणार नाहीत’’ असे एक विधान करून अनेकांच्या मनातले सत्य त्यांनी समोर आणले. या विधानाबद्दल त्यांना शेवटी माफी मागावी लागली. भाजपात सध्या जी गुंडापुंडांची भरती सुरू आहे व ते विचाराने संघ किंवा भाजपचे नाहीत. निवडणुका जिंकून देणारे कोणीही चालतील अशा भूमिकेत आज फक्त भाजपच नाही, तर सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. श्री. चंद्रकांत पाटील हे आठवड्यापूर्वी कर्नाटकातील मराठी सीमाभागात गेले व तेथील मराठी बांधवांच्या भावना पायदळी तुडवून परतले. श्री. पाटील यांनी तिथे जाऊन कानडीत भाषण केले. त्याविषयी आक्षेप घेण्याचे कारण नाही, पण ते ज्या भूमीवर उभे राहून कानडी गीत गात होते त्या भूमीवर गेल्या पन्नासेक वर्षांत मराठी भाषा व संस्कृतीची प्रचंड गळचेपी सुरू आहे आणि मराठीसाठी संघर्ष करणाऱ्या चार पिढ्या चिरडून टाकल्या जात आहेत. मराठीवर कानडीची जबरदस्ती व त्यासाठी सुरू असलेला सरकारी दहशतवाद ही चिंतेची बाब आहे. अशा वेळी सीमाभागाशी समन्वय साधण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात व ‘‘मला कर्नाटकात जन्म घ्यावा असे वाटते’’ असे बोलतात. हे क्लेशदायक आहे. सीमाभागात जाऊन त्यांनी मराठीचा गजर करायला हवा होता. तसे झाले नाही व ते भलतेच, पण ‘सहज’ बोलून गेले. त्यामुळे अनेकांचे मुखवटे गळून पडले.

गुजरातचे उदाहरण
राज्यकर्ते व राजकारण्यांनी तोंडावर लगाम घातला नाही तर काय होते याचे प्रात्यक्षिक जनतेने गुजरात निवडणुकीत दाखवून दिले आहे. राहुल गांधींची यथेच्छ खिल्ली पंतप्रधानांपासून सगळ्याच भाजप नेत्यांनी उडवली. त्याच राहुल गांधींनी गुजरातच्या भूमीवर भाजपला गुडघ्यावर उभे केले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अहंकारी राजकारणाची कवचकुंडले त्यांच्याच सहकाऱ्यांनी ओरबाडून काढली आहेत. श्री. अजित पवार हे मंत्री असताना तोंडाला येईल ते बोलत व वादळ ओढवून घेत. आता त्यांच्याइतका जिभेवर बंधन ठेवणारा व संयमी नेता उभ्या महाराष्ट्रात नसेल. नितीन गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात नौदलावर टीकेची झोड उठवली व नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनी गडकरींना उत्तर दिले. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर आंबेडकरी जनतेने श्री. प्रकाश आंबेडकर यांना हत्तीवर विराजमान केले, पण प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना भान ठेवले नाही तर महाराष्ट्रात सामाजिक एकतेच्या ठिकऱ्या उडतील असे वातावरण आहे. कर्तबगारीने कमावलेली राज्ये अति बडबडल्याने बुडतात. सध्या अनेक जण गटांगळ्या खात आहेत. कोणत्याही क्षणी ते सर्व बुडतील असे वातावरण आहे.

राज्य बुडू नये यासाठी आता सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत.

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या