रोखठोक : हे चित्र काय सांगते? देशसेवेची घसरलेली पातळी!

300

rokhthokलोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तच इरेला पेटले आहेत. ‘देशद्रोह’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांची नवी व्याख्या या निवडणुकीत ठरत आहे. कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला सुरू आहे, पण बिहारच्या बेगुसरायमधून तो निवडणूक लढतोय. तेथील लोकांनी कन्हैयासाठी वर्गणी काढून निवडणूक लढवण्यास पैसे दिले, हे काय आहे?

देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय होईल, याचा निकाल तसा लागल्यासारखाच आहे. सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच येत आहे. मतदारांनी प्रबळ विरोधी पक्ष निवडायचा आहे. देशात कुणाचीही एकाधिकारशाही राहू नये म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रबळ विरोधी पक्ष निर्माण व्हावा. विरोधी पक्षनेत्यांची मुस्कटदाबी सुरू होते तेव्हा संविधान व लोकशाहीची हत्या होते हे प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनीही लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत व्यक्तिपूजा असू नये; पण पन्नास वर्षांपासून त्या व्यक्तिपूजेतच आपण धन्यता मानत आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना जे सांगितले ते आजच्या पिढीनेही समजून घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकर आपल्या अनुयायांना वारंवार असे ऐकवीत की, ‘‘माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच मान्य नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतिपूजा कशी आवडेल? विभूतिपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याच्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर या भावना बाळगायला हरकत नाही. तेवढय़ानेच त्या पुढाऱ्याचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे. पण पुढाऱयांची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकूल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱयाबरोबर त्याच्या भक्तांचेही अधःपतन होते.’’

अंध भक्तांची लढाई
लोकसभा निवडणूक नेते आणि मतदार लढत नसून सर्वच पक्षातले अंध भक्त लढत आहेत. एकमेकांविषयी इतका द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व मी याआधी कोणत्याच निवडणुकीत पाहिले नव्हते. इंदिरा गांधी यांच्या विरोधात आणीबाणीनंतर विरोधक एकवटले. ती वैचारिक लढाई होती. इंदिरा गांधींबद्दल द्वेष नव्हता. विरोधक देश अस्थिर करीत आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने निवडून आलेली सत्ता उलथून टाकायची आहे असे इंदिरा गांधी म्हणत. वाजपेयी, आडवाणी, लोकनायक जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस हे देशद्रोही आहेत असे इंदिरा गांधी म्हणाल्याचे मला आठवत नाही. आता ‘देशद्रोही’ हा एक सोपा आणि परवलीचा शब्द झाला आहे. ऊठसूट कोणीही कुणाविरुद्ध वापरत आहे. लोकसभा निवडणुकीतून पुलवामा हल्ला, राफेल हे मुद्दे बाजूला पडले व ‘देशद्रोह, चौकीदार’ या शब्दांवर निवडणुकीचा शिमगा सुरू आहे.

देशद्रोही कोण?
‘पुलवामा’ हल्ल्याबाबत सरकारवर शंका व्यक्त केली म्हणून समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. एकेकाळी मिसा, टाडा, पोटा, तडीपारीचा वापर राजकारण्यांवर होत असे. आता ‘देशद्रोहा’चे आरोप व गुन्हे यांनी त्यांची जागा घेतली. राफेल प्रकरणात काँग्रेसने भाजपच्या नेत्यांना देशद्रोही ठरवले, तर पुलवामा प्रकरणात सत्ताधारी हे काँग्रेस व इतरांना देशद्रोही ठरवत आहेत. देशद्रोही शब्दाचे महत्त्व आणि भीती त्यामुळे संपली. देशातील 40 ते 45 टक्के जनता अशाने देशद्रोही ठरेल. कारण हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या सरकारविरुद्ध मतदान करीत असतात. देशप्रेमाला जितके महत्त्व तितकेच देशद्रोह शब्दाचे भय राहायला हवे. ते आज संपले आहे.

चित्र वेगळे आहे
महाराष्ट्रात आपण जे चित्र पाहत आहोत तसे चित्र देश पातळीवर नाही. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख लोक रोज भाजपात प्रवेश करताना दिसतात. निवडणुकीच्या हंगामात या गोष्टी अटळ आहेत व पक्षांतराचे सर्व कायदे मोडून हे सर्व घडवले जाते. कायद्याचे राज्य म्हणजे फक्त पोलीस, न्यायालयाचे नाही, तर ते राजकीय नीतिमत्तेचेही असायला हवे. राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या अनेक नेत्यांची जागा तुरुंगात असायला हवी होती, ते सर्व लोक सत्ताधारी पक्षात भरती होत आहेत. पुढेही होत राहतील. पण राजकारणात हे चालायचेच म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे तो कन्हैयाकुमार बिहारातील बेगुसराय मतदारसंघातून लोकसभा लढत आहे. त्याने निवडणूक लढण्यासाठी लोकांकडे पैसा मागितला तेव्हा दहा मिनिटांत पाच लाख रुपये जमा झाले. हे चिंताजनक. दहशतवाद्यांना पैसे देणारे दहशतवाद्यांचे हस्तक. मग कन्हैयाकुमारच्या झोळीत पैसे टाकणारे कोण? बेगुसराय मतदारसंघात कन्हैयाकुमारचा दारुण पराभव करण्याची जबाबदारी भाजपची आहे, पण या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीराजसिंह यांनी मैदान सोडले आहे. ईव्हीएमचा घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल, पण या विषाच्या बाटल्या संसदेत पोहोचता कामा नयेत. प्रकाश आंबेडकर यांनी बेगुसरायमध्ये जाऊन कन्हैयाकुमारच्या पराभवासाठी शर्थ करायला हवी. कन्हैयाकुमारचा पराभव हा संविधानाचा विजय ठरेल. सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा विडा प्रकाश आंबेडकर यांनी उचलला व ते स्वतः सोलापुरात जाऊन उभे राहिले. त्याऐवजी बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमारच्या पराभवाचा विडा प्रकाश आंबेडकर यांनी उचलला तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ती मानवंदना ठरेल!

जिंकणारे हवेत
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व मुंबईतून लोकसभा निवडणुकीत त्या उतरतील. उर्मिला मातोंडकर यांनी राजकारण्यांना जमणार नाहीत इतक्या सफाईदारपणे मुलाखती दिल्या. त्यांचा राजकीय गृहपाठ पक्का करून त्या राजकारणात आल्या. असा गृहपाठ कितीजण करतात? उत्तर प्रदेशातही काही भोजपुरी अभिनेत्यांनी भाजपात प्रवेश केला. देशसेवेसाठी ते आता निवडणुका लढवतील. त्याचवेळी भाजपच्या माध्यमातून 30-35 वर्षे देशसेवा करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत व ते पाटण्यातून निवडणूक लढवतील. निवडणुकांत आता ‘जिंकणारे’ हवेत. मग ते कोणीही असले तरी चालतात. सपना चौधरी या नर्तिकेस काँगेस पक्षात आणून हेमा मालिनीविरोधात काँग्रेसला लढवायचे होते. सपना चौधरीनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा अर्ज भरताच भाजपकडून तिच्यावर घाणेरड्या व अश्लील शब्दांत हल्ला झाला. आता त्याच सपना चौधरी भाजप नेत्यांना भेटल्या व लवकरच पक्षप्रवेश करतील. त्यामुळे त्या साध्वी ठरतील. अशा राजकारणातून देशाला काय मिळेल त्या फंदात कुणी पडू नये. निवडणुका आल्या की राजकारणाच्या शुद्धीकरणाचे वारे वाहतात. नैतिकतेवर चर्चा होते. अर्थात हे सर्व आज औषधालाही उरलेले दिसत नाही.

देशभक्ती व देशसेवेची पातळी घसरली. हे देशद्रोहापेक्षा गंभीर आहे.

देशाचे दुर्दैव ते हेच!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या