दिल्ली ते अहमदाबाद; मुंबईचे काय?

116

rokhthokइस्रायलसह सर्वच प्रमुख राष्ट्रांचे प्रमुख आधी दिल्लीत व लगेच अहमदाबादला जातात. मुंबई आता मागे पडली. हे ठरवून सुरू आहे काय? चि. मोशे हा इस्रायलचा हीरो ठरला. आमच्या देशातील असंख्य ‘मोशे’ अंधारात गडप झाले आहेत.

मुंबईत चिरंजीव ‘मोशे’चे व अहमदाबादेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे जोरदार स्वागत झाले आहे.

बेंजामिनसाहेब हिंदुस्थानच्या भेटीवर सपत्नीक सहकुटुंब आले आहेत. त्यांचे दिल्लीत जेवढे जोरात स्वागत झाले नाही त्यापेक्षा अतिभव्य स्वागत अहमदाबादेत झाले. अहमदाबादचा विमानतळ ते साबरमती अशी नऊ-दहा किलोमीटरची जी भव्य शोभायात्रा बेंजामिनसाहेबांच्या स्वागतासाठी निघाली (काढण्यात आली) ती अचंबित करणारी होती. जणू गुजरातमध्ये भाजप सरकारचा विजय उत्सव साजरा करण्यासाठीच ते शोभायात्रेत सहभागी झाले. अहमदाबादचे ते शोभावृत्त पाहून हिंदुस्थानातील इतर शहरांनी जणू पंतप्रधानांना प्रश्नच विचारला, ‘‘साहेब, हिंदुस्थानात फक्त अहमदाबाद हेच एकमेव शहर आहे काय? आपण देशाचे पंतप्रधान आहात, फक्त गुजरातचे नाही.’’ इंदिरा गांधी, नेहरू व वाजपेयींनंतर देशाला राष्ट्रीय नेतृत्व मिळाले नाही. खुर्चीवरचे प्रत्येक नेते हे राज्याचा, शहराचा व आपल्या गावाचाच विचार करीत राहिले.

राष्ट्रीय कोण?
कोणत्याही देशाचा पंतप्रधान हा स्वतःचे राज्य व गावाचेच गोडवे गातो तेव्हा तो संपूर्ण देशाचा राहात नाही. सध्या असे घडत आहे खरे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा इतर हिंदुत्ववादी संघटनांना महात्मा गांधी यांच्याविषयी किती प्रेम व आदर आहे ते सांगायला नको. संघ विचारांचे लोक कधी राजघाटावर जात नाहीत, पंडित नेहरूंना मानवंदना देत नाहीत, पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून साबरमतीच्या गांधी आश्रमास जे सोन्याचे दिवस आले ते काँग्रेस राज्यातही आले नव्हते. पंतप्रधान मोदी हे जवळ जवळ सर्वच विदेशी राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांना गुजरातला नेऊन साबरमतीच्या गांधी आश्रमातील चरख्यावर बसवतात, सूतकताई करून घेतात व गांधींचे थोरपण सांगतात. जपान, चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांचे प्रमुख आतापर्यंत ‘साबरमती’त सूतकताई करून गेले. हा गांधी विचारांचा विजय आहे. काँग्रेस राजवटीत सर्व विदेशी पाहुणे दिल्लीतील राजघाटावर जाऊन गांधींना श्रद्धांजली वाहत. आता त्यांची पावले गांधींच्या साबरमती आश्रमाकडे ‘वळवली’ जातात, पण गांधी फक्त ‘साबरमती’तच नव्हते, ते देशातील इतर शहरांत व खेड्यात होते. विदर्भातील वर्ध्याच्या पवनार आश्रमातही होतेच. पाटण्यात व कोलकात्यातही होते.

मुंबईचे मारेकरी
मुंबईचे एक जागतिक महत्त्व आहे तसे राष्ट्रीय महत्त्व आहे. ब्रिटिशांना अखेरचा इशारा आणि ‘चले जाव’चा नारा देण्यासाठी गांधीजींनी मुंबईची निवड केली. कारण मुंबईत ठिणगी पडताच देशात वणवा पेटतो. आजही मुंबईच्या मेहनतीवर देशाचे आर्थिक चक्र सुरू आहे व मुंबईतलाच पैसा अनेकांना धनाढ्य बनवीत आहे. पण जास्तीत जास्त लोकांनी श्रम करायचे व मूठभर लोकांनी मुंबईचे ऐश्वर्य भोगायचे, हे दुष्टचक्र संपलेले नाही. मुंबईची लूट आतापर्यंत सगळय़ांनीच केली. दिल्लीचा आशीर्वाद लाभलेले अनेक बाबर व गझनीचे मोहम्मद मुंबईची लूट करीत राहिले, पण त्यांनीही मुंबईचे महत्त्व कमी होऊ दिले नाही. सोन्याची अंडी सदैव खायची असतील तर अंडी देणारी कोंबडी जिवंत राहिलीच पाहिजे, ही भूमिका अनेकांनी ठेवली. आता नेमके विचित्र घडताना दिसत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी जी धडपड सुरू आहे तो प्रयोग यापूर्वी इतर कोणत्याही नेत्याने केला नव्हता. दिल्लीत उतरलेल्या प्रत्येक विदेशी नेत्याचे पुढचे पाऊल हे मुंबईतच पडत असे. आता त्या पावलाची दिशा अहमदाबादकडे का वळवली गेली? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आजही मुंबईच्याच पैशांवर गुजरातची अर्थव्यवस्था बरी चालली आहे व त्याबद्दल पोटात दुखायचे कारण नाही. कारण गुजरात आपलेच आहे, पण मुंबईचा राजमुकुट चोरण्याचा छुपा प्रयत्न कुणी करीत असेल तर आपण सावध राहायला हवे. नव्या राजवटीत ताजमहालचे महत्त्व कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या कॅलेंडरवरही ताजमहालला स्थान मिळवताना झगडावे लागले, पण शेवटी सर्वच आंतरराष्ट्रीय नेत्यांना ताजमहालला भेट देण्याचा मोह आवरता येत नाही. मुंबईचेही जागतिक नकाशावर तेच महत्त्व आहे.

इतर राज्यांत जा…
हिंदुस्थान बहुरंगी आणि बहुढंगी आहे. हे रंग व ढंग विदेशी पाहुण्यांना दाखवायला हवेत. जागतिक नेत्यांना देशाच्या इतर प्रांतांतही फिरवायला हवे. पाटणा, बिहार, कोलकाता, ईशान्येकडील राज्ये हिंदुस्थानचेच भाग आहेत. वाटल्यास पंतप्रधानांच्या मतदारसंघात ‘वाराणसी’ येथे विदेशी राष्ट्रप्रमुखांना न्यावे. त्यामुळे वाराणसी साफ होईल व रस्ते रुंद होतील. नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आहे. चीन, जपान, इस्रायलच्या राष्ट्रप्रमुखांना तिथे कधी नेणार? मुंबईचे तूर्त बाजूला ठेवा, नागपूर कधी दाखवणार? मुंबई-नागपूरचेही राहू द्या. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना खरे तर कश्मीरच्या भूमीवर नेऊन त्यांचे जंगी स्वागत करायला हवे होते. म्हणजे पाकिस्तान, चीन या दुश्मनांना व जगातही एक खरमरीत संदेश गेला असता. इस्रायलसारखे राष्ट्र कश्मीरप्रश्नी ठामपणे हिंदुस्थानच्या मागे उभे आहे. इस्रायलचे पंतप्रधान ताजमहाल भेटीस गेले. तेथून अहमदाबादेत जाऊन पतंग उडवले, चरखा फिरवला व नंतर मुंबईस पोहोचले.

मोशे याचे आगमन
इस्रायलमधून चि. मोशे होल्टझ्बर्ग खास आला. पंतप्रधान मोदी काही महिन्यांपूर्वी इस्रायलला गेले होते तेव्हा ‘मोशे’ याला खास मुंबई भेटीचे आमंत्रण दिले. त्यानुसार बारा वर्षांचा चि. मोशे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन यांचे बोट धरून दिल्लीस आला व तिथून मुंबईस आला. मोशे कोण? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. वृत्तपत्रांत त्याचे फोटो झळकले. वृत्तवाहिन्यांनी त्याला कडेवर घेतले. ‘२६/११’ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. मुंबईतील नरीमन हाऊसच्या छाबड सेंटरवरदेखील हल्ला झाला. त्यात मोशेचे तरुण आई-वडील मरण पावले व मोशे बचावला, पण पोरका झाला. तेव्हा तो दोन वर्षांचा होता. मोशेला नंतर त्याच्या आजी-आजोबांनी इस्रायलला नेले व पुढची दहा वर्षे तो तिथेच राहिला. मोशे आता बारा वर्षांचा आहे. तो मुंबईत काल आला तेव्हा त्याला नक्की काय आठवत असेल? त्याने सर्वस्व गमावले तेव्हा तो सज्ञान नव्हता व आताही नसावा, पण अहमदाबादेत श्री. बेंजामिन यांच्या आगमनाचा तर मुंबईत चि. मोशेच्या आगमनाचा उत्सव साजरा झाला. मुंबईत येताच मोशे भावुक झाला. त्याने माता-पित्यांचे छत्र गमावले आहे. त्याची वेदना समजून घेतली पाहिजे, पण जगभरात अनेक मुलांनी दहशतवाद्यांच्या क्रौर्याने माता-पित्यांचे छत्र गमावले व ते निराधार झाले. त्यामानाने मोशे भाग्यवान आहे. कश्मीर खोऱ्यातील अनेक हिंदू पंडितांचे शिरकाण दहशतवाद्यांनी केले व त्यात अनेक निरागस, अज्ञान मुलांनी माता-पित्यांचे छत्र गमावले. त्या मुलांना कुणीही पुन्हा त्यांच्या घरी कश्मीरला घेऊन जायला तयार नाही. सीमेवरील सैनिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडत आहेत. त्यांची मुलेही पित्याचे छत्र गमावतात. मोशे भावुक झाला, तशी ती निराधार मुलेही भावुक होताना मी पाहतो.

चि. मोशेचे दुःख हे जगातील सर्व निराधार मुलांचे दुःख आहे. ‘२६/११’ च्या हल्ल्यातून बचावलेला चि. मोशे हा इस्रायलचा हीरो ठरला. हिंदुस्थानात असे असंख्य लोक, मुले शेवटी अंधारातच गडप होतात. त्यांचे ‘हीरोपण’ तात्पुरते ठरते. त्यासाठी मोशेचे भाग्य व इस्रायलचे काळीज लागते.

मोशे, तुला सलाम!

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या