रोखठोक : स्टार्टअप- ‘पकोडा’ इंडिया

rokhthokदेशातील बेरोजगार तरुणांनी आता ‘पकोडे’ तळून रोजगार मिळवावा, स्वाभिमानाने जगावे असा दिव्य संदेश आपले पंतप्रधान श्री. मोदी यांनी दिला आहे. देश प्रगतिपथावर झेप घेत असल्याचे हे दर्शन आहे काय? देशातील बेरोजगार तरुण आधीच हे सर्व पोटापाण्याचे उद्योग करीत आहेत. मुंबईत वडापावच्या गाडय़ा आहेत. मोदी यांनी नवे काय सांगितले? हेच काय तुमचे ‘स्टार्टअप इंडिया’?

वृपत्तपत्रातील बातम्या वाचून पूर्वी मन संतप्त होत असे. आता भरपूर करमणूक होते. देशाचे काय होईल, महाराष्ट्राचे भवितव्य काय, असे फालतू प्रश्न मनात उभेच राहत नाहीत. देशात काही घडो, कश्मीरमध्ये रोज जवानांचे बळी जावोत, रेल्वे गाड्या घसरोत, बलात्कार होवोत, मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करोत, तरी कोणाचे मन विचलित होत नाही. One face on all occassions, म्हणजे सर्व काळात एकच मुखवटा धारण करण्याचे सामर्थ्य एकेकाळी नरसिंह रावांमध्ये होते. त्याच सामर्थ्याचे तेज आता पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले आहे. नरसिंह राव करकरीत चेहऱ्याचे स्थितप्रज्ञ होते तर मोदी सर्वप्रसंगी हसतमुख व कोणत्याही प्रसंगी काँग्रेसला झोडपणारे आहेत. राजस्थानातील पोटनिवडणुकांत भाजप पराभूत झाली, याबद्दल त्यांनी काँगेसला झोडपले नाही हेच नशीब. हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. कश्मीरात रोजच हल्ले सुरू आहेत. जवानांचे बळी जात आहेत, पण देशाच्या पंतप्रधानांनी देशात चर्चा सुरू केली आहे ‘पकोडे’ म्हणजे भजी तळण्याची. बेरोजगार युवकांनी रस्त्यावर पकोडे तळावेत किंवा विकावेत असा एक दिव्य संदेश श्री. मोदी यांनी देशवासीयांना आता दिला आहे. संसदेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे व त्यात प्रत्येक वक्ता पकोड्यांचा विषय तळताना दिसत आहे. संसदेचे सत्र पकोडे व भजी तळण्यात वाया जात असेल तर पंतप्रधानांनी त्यांचे काम फत्ते केले आहे.

बाके वाजवणारे लोक
श्री. अमित शहा यांनी पकोड्यांचा विषय राज्यसभेत काढला. भजी तळणे हा रोजगार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर भाजप सदस्यांनी बाके वाजवून समर्थन दिले. हिंदुस्थानात बेरोजगारी वाढते आहे. इंजिनीयर, डॉक्टर्स, वकील, एम.बी.ए. झालेले तरुणही रोजगाराच्या शोधात आहेत. या सगळ्यांनी आता भजी तळायचेच काम स्वीकारायचे काय? नोटाबंदीनंतर व्यापार व उद्योगांवर मोठे संकट आले. बेरोजगारी वाढली. बांधकाम व्यवसाय कोसळला. आता या सर्व लोकांना सरकारतर्फे झारा-कढई भेट देऊन रस्त्यावर भजी तळायला बसवायचे काय, हा प्रश्न आहे. यावर भाजपचे हुबळीचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितले. ‘त्यांच्या मतदारसंघातील एका इंजिनीयरने सरकारी नोकरी सोडली, तो आता भजी तळत आहे व त्याचे उत्पन्न वाढले आहे.’ हा सर्वच प्रकार हास्यास्पद आहे. लोकसभेत श्री. मोदी यांनी सांगितले, ‘आजच्या मध्यमवर्गीय तरुणांना नोकऱ्या करायच्या नाहीत. आजचा तरुण वर्ग नोकरीसाठी भीक मागत नाही. त्यांना स्वाभिमान आहे. देशभरातील आयएएस अधिकाऱ्यांना मी भेटत असतो. ते अभिमानाने सांगतात त्यांच्या मुलांना ‘आयएएस’ होऊन नोकरी करण्यात अजिबात रस नाही. त्यांची मुले परदेशात शिकत आहेत व त्यांना हिंदुस्थानात उद्योग-व्यवसाय करायचा आहे. हेच आमचे ‘स्टार्टअप इंडिया’ आहे.’ मोदी यांचे हे म्हणणे कुणाला पटेल काय? नोकरशहांची मुले पकोडा-भजी तळणार नाहीत. खरे म्हणजे हे सर्व मध्यमवर्गीय व गरीब पोरांच्या नशिबी आहे.

पकोडा की समोसा
पकोडे म्हणजे नक्की काय, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. पकोडे म्हणजे भजी असे महाराष्ट्रात म्हटले जाते. उत्तरेत पकोडे म्हणजे समोसे असा अर्थ घेतला जातो. पुन्हा मोदी यांच्या गुजरात राज्यात ‘पकोडे’ फारसे कुणी खात नाहीत. तेथे ढोकळा, जिलेबी, फाफडा व शेव-गाठीयांचा जोर आहे. म्हणजे तेथील बेरोजगार युवकांनी काय तळायचे? मुळात पंतप्रधान मोदी यांनी सांगायला हवे की, गेल्या साडेतीन वर्षांत सरकारने किती नोकऱ्या निर्माण केल्या व महागाई किती कमी केली? एकूण रोजगार किती निर्माण झाला? वास्तविक त्यापेक्षाही ‘नोटाबंदी’नंतर किती लाख लोकांनी असलेला रोजगार गमावला याचे खरे उत्तर आज सरकारने द्यायला हवे, पण सरकार ते देणार नाही. ज्या हातांना काम नाही त्यांनी भजी-समोसे तळावेत. भीक मागण्यापेक्षा भजी विकणे चांगले. मग देशाचे उद्योग खाते, अर्थखाते, रोजगार हमी योजनांना टाळे लावायचे काय? उद्योग खात्याचे नाव बदलून भजी-पकोडा खाते करण्याचा प्रस्तावही एकदा मंजूर करून टाका. पंतप्रधानांनी एकदा रस्त्यावर योगा दिवस साजरा केला तसा पकोडा दिवस साजरा होईल, काय सांगावे!

महाराष्ट्रात काय?
महाराष्ट्र हे उद्योगाच्या दृष्टीने एक प्रगत राज्य आहे. सर्वात जास्त सुरक्षित रोजगार देणारे हे राज्य. मुंबईसारखी शहरे देशाच्या अर्थकारणास मोठा हातभार लावतात, पण आज मुंबई शहरातील रोजगार कमी झाला तो सरकारच्या चुकीच्या व हटवादी आर्थिक धोरणांमुळे. महाराष्ट्रात व देशात मेट्रो किंवा बुलेट ट्रेन आणली म्हणजे रोजगार मिळाला असे होत नाही. शेवटी विकास झाला व तो फक्त चार वर्षांतच झाला असा दावा करणारे आता रोजगार नाही म्हणून ‘भजी’ तळा असे सांगतात. पण ‘पकोडे’ रोजगारास सरकार कायद्याचे संरक्षण देणार आहे काय? फेरीवाल्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची परवानगी सरकार व न्यायालय देत नाही आणि जनता त्यांच्या विरोधात आंदोलन करते. ‘पकोडे’ तळण्यासाठी रस्त्यावर स्टोव्ह किंवा गॅस पेटवावा लागेल व फायर ब्रिगेड सुरक्षेच्या नावाखाली त्यास परवानगी देणार नाही आणि हे सर्व सामान जप्त करून घेऊन जाणार. पकोडे राहिले बाजूला, पण लाख-दोन लाखांचा भुर्दंड त्या गरीबास पडणार. त्याची भरपाई तुम्ही कशी करणार?

वडापाव योजना
पंतप्रधान चहा विकून उच्चपदी पोहोचले म्हणून पकोडे विकणारे राष्ट्रपती भवनात पोहोचणार नाहीत. ७० च्या दशकात बेरोजगार मराठी तरुणांसाठी ‘वडापाव’ विक्रीची योजना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणली तेव्हा त्यांच्यावर टीका झाली, पण शेवटी तेव्हा व आताही ते रोजगाराचे मोठे साधन ठरले. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरांत शिवसेनापुरस्कृत ‘वडापाव’ गाडय़ांनी आर्थिक क्रांती केली, पण शेवटी सरकार, म्युनिसिपाल्टी, पोलीस व स्थानिक गुंडांचा त्रास तेथे होतो. न्यायालयांना श्रीमंतांचा भ्रष्टाचार दिसत नाही, पण गरीबांच्या वडापाव विक्रीच्या गाडय़ा उचला असे ते सांगतात. ‘शिववडा’ची उत्तम योजना म्युनिसिपाल्टी, न्यायालयांच्या असहकार्याने संपली, पण आता देशाचे पंतप्रधान मोदी तीच ‘पकोडा’ योजना घेऊन पुढे आले तेव्हा सगळेच टाळय़ा वाजवून स्वागत करीत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसारख्या शहरांत पाच हजार ‘वडापाव’ विक्री केंद्रांना आधी कायदेशीर मंजुरी द्या व मगच ‘पकोडा रोजगार’चा उदो उदो करा.

एका बाजूला अवकाशात एकाचवेळी ५० उपग्रह सोडले म्हणून कौतुक करून घ्यायचे. काँग्रेस राजवटींनी व नेहरू-गांधी यांनी देश उभारणीसाठी काहीच केले नाही म्हणून टीका करायची व त्याचवेळी बेरोजगारांनी भजी तळून रोजगार मिळवावा असे सांगणे हा विरोधाभास आहे. देशातला मोठा तरुणवर्ग याआधीच ‘पकोडे’, ‘वडा’ तळून कुटुंबाचे पोषण करीत आहे. मग पंतप्रधानांनी नवीन ते काय सांगितले? ‘स्टार्टअप इंडिया’चा पूर्णविराम ‘पकोडा’ हाच आहे काय?

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल- [email protected]

3 प्रतिक्रिया

  1. मित्रो, सोच लीजिये, मेरी बाते शहजादे की समज की बाहर है. अगर सव्वासो करोड भारतीय रोज एक पकोडा भी खायेंगे तो उन के पेट जरुर बिगडेंगे. इस से डॉक्टर स्टार्ट अप कर सकते है. बेसन-तेल पातंजलि से आयेगा. इस की वजहसे स्वदेशी का प्रसार होगा. पकोडे कितने पौष्टिक है ये XXXपुराण मे जरुर पढिये. अगर आज वल्लभ भाई पटेल होते तो मेरी बात जरुर समज जाते. लेकिन इटली का पास्ता खाने वाले लोग मेरे मन की बात कैसे समझेंगे. वंदे मातरम्.

  2. sanjay raut tumhi mand buddhi aahat kay? Pakoda mhanaje nusata pakoda hot nahi. Basically swatah cha udyog kadha hech Modinna suchawayche aahe ho. Pakoda aso, dhokala aso, hotel aso, pustaka che dukan aso, ek chhotishi lathe ghalun manufacturing cha vyawasay aso kimvha kahihi aso (aata kahihi mhanaje sanjay raut balish pane rape, robbery, chorya, khun ase naka mhanu bareka?) pan swatahcha udyog kadha. Tumhala akkal nahi ka?