रोखठोक : काँग्रेस फाटाफुटीचे पर्व

172
rahul-gandhi-sad

rokhthokराहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण 135 वर्षांच्या काँग्रेसला नवा अध्यक्ष सापडत नाही. राज्याराज्यांत काँग्रेस रोज फुटत आहे. फाटाफुटीचे हे पर्व थांबेल असे वाटत नाही!

काँग्रेस पक्ष रोज फुटणार व तिचे अनेक तुकडे होणार हे आता बहुतेकांनी गृहीतच धरले आहे. केंद्रीय स्तरावर काँग्रेसचे मोठे नेतृत्व उरलेले नाही. जे काही आहे ते गांधी परिवारातच आहे. त्यामुळे राज्याराज्यांतील काँग्रेस नेतृत्वात फाटाफूट होईल व यातील अनेक नेते भारतीय जनता पक्षात सामील होतील. महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली आहे. सांगलीतील काँग्रेसचे दोन शक्तिमान नेते विश्वजित कदम आणि सत्यजित देशमुख हे भारतीय जनता पक्षात जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत (त्यांनी इन्कार केला). विश्वजित कदम हे पतंगराव कदमांचे चिरंजीव. संकटकाळातही त्यांचे कुटुंब काँग्रेसबरोबर राहिले. राजकारण, उद्योग व शिक्षण क्षेत्रात मोठे साम्राज्य त्यांनी निर्माण केले. त्यांनाही काँग्रेस पक्षात भविष्य दिसत नाही. सत्यजित देशमुख हे शिवाजीराव देशमुखांचे चिरंजीव. देशमुख व कदम यांनी काँग्रेस सोडणे हे प्रातिनिधिक आहे.

बंगालात हादरे
पश्चिम बंगालात तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शंभरावर नगरसेवक आणि पंचवीस आमदारांनी ममता बॅनर्जींविरुद्ध उघड बंड केले. हे सर्व लोक आज भाजपात चालले. पश्चिम बंगालात काँग्रेस पक्ष नाही, तृणमूल काँग्रेस हाच प्रमुख पक्ष. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी हे काँग्रेसचे विद्यमान खासदार होते. त्यांचा आता पराभव झाला, पण प्रचंड विजय मिळताच मोदी हे दिल्लीतील प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. प्रणवबाबू हे मोदी यांना स्वतःच्या हाताने मिठाई भरवत असल्याचा फोटो प्रसिद्ध झाला. काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वास अस्वस्थ करणारी ही भेट आहे. काँग्रेसला घायाळ करणाऱया अशा अनेक खेळय़ा मोदी व शहा ही जोडी करीत असली तरी त्यात सहजता आहे. मोदी यांच्या इराद्यांना मजबूत करण्याचे तंत्र अमित शहा यांच्या मेंदूत व मनगटात आहे. देशाचे पंतप्रधान व पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यात इतका एकोपा गेल्या पन्नास वर्षांत दिसला नव्हता. पक्ष आणि सरकार यांच्यातले असे मनोमीलन यापूर्वी कधीच दिसत नव्हते. ही एकजूटच देशातल्या सर्वच विरोधी पक्षांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.

शक्तिमान मोदी
2014 पेक्षा नरेंद्र मोदी हे अधिक शक्तिमान झाले आहेत. अमित शहा यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवत ते दोन दिवस केदारनाथला गेले. परतले तेव्हा त्या ‘संन्याशा’साठी 2019 चा राजमुकुट घेऊन शहा तयार होते. हे काहीतरी वेगळे रसायन आहे. राहुल गांधी हे निवडणूक प्रचारात जोरात बोलत होते. निकालानंतर ते मौनात आणि अज्ञातवासात गेले व काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी सोडले. उद्या ते देश सोडून गेले तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण राज्याराज्यांतील त्यांच्या लोकांनी शस्त्र्ाs कधीच फेकली आहेत. कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेशातील त्यांची सरकारे कोसळतील. अंतर्कलहाने ती जर्जर झाली आहेत. ही सरकारे केव्हाही कोसळतील व आमदार भाजपात जातील हे आता स्पष्ट आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या 12 आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाची दुर्गती कशी आहे ते पहा. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी अपयशी ठरले. त्यांनी पदाचा राजीनामा दिला. आपल्याला पर्याय शोधा असे त्यांनी सांगितल्याला आठ दिवस उलटले, पण अद्याप पर्याय सापडलेला नाही. मोदी यांच्या यशाला पर्याय नाही तसा राहुल गांधी यांच्या अपयशाला पर्याय नाही. देशाच्या राजकारणातली ही परिस्थिती विचित्र आहे.

महाराष्ट्राचे चित्र
महाराष्ट्राचेच चित्र खूप काही सांगून जाते. तालेवार घराणी व सहकार सम्राट ही काँग्रेसची ताकद होती. ही सर्व घराणी भाजपचा ‘गंडा’ बांधून पुढच्या राजकारणात उतरली. बीडचे सगळय़ात प्रभावशाली घराणे जयदत्त क्षीरसागरांचे. त्यांनी संपूर्ण ताकदीसह उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले. विखे-पाटील, मोहिते-पाटील भाजपात गेले. लातूर, परभणी, धाराशीव हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे गड. तिथे आता नेतृत्व आणि काँग्रेस नष्ट झाली. नांदेडात अशोक चव्हाण पडले. लातुरात विलासराव देशमुखांची पुढची पिढी निस्तेज झाली. वर्ध्यात दत्ता मेघे आधीच भाजपात गेले. गोंदिया, भंडाऱयात प्रफुल्ल पटेल नावापुरते उरले. चंद्रपुरात काँग्रेसने लोकसभा जिंकली. तेथे जिंकलेले खासदार धानोरकर काँग्रेसवासी नाहीत, ते शिवसेनेचे आमदार होते. संपूर्ण देशाचे हे चित्र आहे. जिह्याजिह्यांतील काँग्रेस पक्ष भाजप किंवा शिवसेनेत विलीन होत आहे. 1978 साली जनता पक्षाच्या काळातही नेमके हेच घडले होते. तेव्हा काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी इंदिरा गांधी होत्या. आज काँग्रेसचे नेतृत्व पराभवाने ‘कोमात’ गेले आहे. काँग्रेस संपूर्ण विसर्जनाच्या दिशेने जाण्याची ही सुरुवात आहे काय?

काँग्रेस इतकी हतबल आणि निराश कधीच दिसली नव्हती. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे महत्त्व टिकायला हवे, पण नवे नेतृत्व नाही. नवे कार्यकर्ते नाहीत तरीही महाराष्ट्रासारख्या राज्यात काँग्रेसला मतदान झाले. वाढलेले मतदान काँग्रेसच्या पारडय़ात पडले नाही. काँग्रेसचे डबके बनले आहे. प्रवाह थांबला की डबके होते. सध्या तरी काँग्रेसचे भविष्य अंधारात आहे!

Twitter : @rautsanjay61
Gmail : [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या