देश खड्ड्यात का जात आहे?

rokhthokअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रे. ट्रम्प यांच्या कन्येसाठी हिंदुस्थान सरकारने पायघड्याच घातल्या. महिला उद्योगपतींच्या परिषदेसाठी इव्हांका मॅडम हैदराबादेत पोहोचल्या, पण दिल्लीसह देशात तिच्या स्वागताचे फलक लागले. ही गुलामीची मानसिकता आहे. इव्हांका मॅडमचे आगमन व एकंदरीत तिच्या सुरक्षा व्यवस्थेवर ३५ कोटी रुपयांवर खर्च झाला. हे खरे मानले तर देश खड्ड्यात का जात आहे ते समजेल.

महाराष्ट्राचे राजकारण आजही दिल्लीच्याच मर्जीने चालते हे पाहिले की वाईट वाटते. काँगेस राजवटीत असे घडत राहिले तेव्हा सगळ्यांनीच त्यावर टीका केली. आज महाराष्ट्रात व दिल्लीत काँगेसचे राज्य नाही, तरीही तेच घडत आहे व महाराष्ट्राचे राजकारण बाहेरचेच लोक चालवीत आहेत. विधान परिषदेच्या एका जागेची निवडणूक आहे. पण मध्यरात्री दिल्लीने मंजुरी दिली व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतले प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली. लाड यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांना मान्य नसावी. श्री. रावसाहेब दानवे यांच्या चेहऱ्यावरून तसे स्पष्ट दिसले. लाड हे काँगेस, राष्ट्रवादी काँगेस असा प्रवास करून भाजपात आले. म्हणून ही नाराजी असेल तर मग नारायण राणे यांचे काय? लाड यांना उमेदवारी देऊ नये असे ज्यांना वाटते ते राणे यांना मान्यता देत होते व श्री. राणे हेसुद्धा शिवसेना, काँगेस असा प्रवास करूनच भाजपच्या तंबूत शिरले आहेत हे विसरता येत नाही.

निर्णय कोण घेतंय?
शेवटी दिल्लीला विचारूनच सर्व निर्णय घ्यायचे आहेत. याआधी उत्तर प्रदेशातील लोक दिल्लीत बसून निर्णय घेत. आता उत्तरेची जागा अहमदाबादने घेतली आहे. दिल्लीत सतत राज्यकर्ते बदलत असतात. दिल्लीत कोणीच स्थिर राहिले नाही. हा मोगल काळापासूनचा इतिहास आहे. सत्ता व संपत्तीसाठी तेव्हाही लढाया झाल्या व त्या आताही होत आहेत. लाचारी पत्करण्यात दिल्लीचा हात कोणीच धरणार नाही. परकीयांच्या स्वागतासाठी पायघड्या घालून हात बांधून उभी राहणारी दिल्ली आजही दिसते. हा मजकूर लिहीत असताना मी दिल्लीच्या विमानतळावर उतरलो आहे व सर्वत्र इव्हांका ट्रम्प यांच्या स्वागताचे फलक लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची इव्हांका ही कन्या. मोदी यांच्या खास आमंत्रणावरून ती इकडे येत आहे व उद्योगपतींना वगैरे मार्गदर्शन करणार आहे. प्रे. ट्रम्प व अमेरिकेला खूश करण्यासाठीच हे सर्व चालले आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे लाखो हिंदुस्थानींना तेथे नोकऱ्या गमवाव्या लागतील असे चित्र आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत अमेरिका ठामपणे आमच्या पाठीशी उभी नाही, तरीही दिल्लीने पायघड्या घातल्या. पाहुण्यांचे स्वागत व सन्मान हा आमचा धर्म आहे. पण आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कन्या अमेरिकेत जाईल तेव्हा तिचे असे स्वागत होईल काय?

गढूळ गंगेत…
ब्रिटिश गेले तरी गुलामीची बीजे कायम आहेत व एकूण एक राज्ये दिल्लीच्या दरबारी व दिल्ली अमेरिका, युरोप, फ्रान्सच्या दारात त्याच मानसिकतेत उभी आहे. सवा लाख कोटी लोकसंख्येचा हिंदुस्थान हा जगासाठी सगळ्यात मोठा खुला बाजार आहे. राफेल विमानांपासून चीनच्या खेळण्यापर्यंत येथे त्यांचा माल सहज विकला जाऊ शकतो. पण या सामर्थ्याची कल्पना नसलेले लोक दिल्लीत बसतात व सरळ वाहत जातात. कारण वाहत्या गढूळ गंगेत त्यांनाही हात धुऊन घ्यायचे असतात. ट्रम्प यांच्या कन्या हैदराबाद येथे आल्या व त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींपासून देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांपर्यंत सगळेच हजर राहिले. हिंदुस्थानात किरण श्रॉफ, चंदा कोचर, नीता अंबानी, विद्या मुरकुंबी या महिलांनी बँकिंग व उद्योग क्षेत्रांत स्वकर्तृत्वावर मोठी भरारी घेतली आहे व त्यांचे कर्तृत्व ट्रम्प यांच्या मुलीपेक्षा जास्त आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांच्या कन्येस बोलावले व त्याच वेळी श्रीमान ओबामा यांचेदेखील आगमन होत आहे. जणू गुजरातमध्ये मोदी यांच्या प्रचारासाठीच हे परदेशी पाहुणे ‘वेळ’ ठरवून बोलावले!

रडताय कशाला?
गुजरातच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदी नेहमीप्रमाणे भावूक झाले व त्यांना व्यासपीठावरच रडू कोसळले, हे गमतीशीर आहे. मोदी हे वारंवार असे का रडतात हा मोठा प्रश्न आहे. सीमेवर हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांसाठी त्यांनी अश्रू ढाळायला हवेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी ते रडावेत, पण प्रचारात त्यांच्या चहावाल्या भूमिकेची खिल्ली काँग्रेसने उडवली म्हणून ते व्यासपीठावर रडले. पंतप्रधानांना हे शोभत नाही. हिंदुस्थानचा कोणताही मोठा नेता अशाप्रकारे जाहीर सभांतून रडल्याचे स्मरत नाही. १९६१ च्या चिनी आक्रमणानंतर दिल्लीतील एका सोहळ्यांत ‘जरा याद करो कुर्बानी’ हे गीत लता मंगेशकर गात होत्या तेव्हा सैनिकांच्या आठवणीने पंडित नेहरूंचे डोळे पाणावले एवढेच देशाला माहीत आहे. राजकारणातले व एकंदरीतच जीवनातले सत्य नष्ट झाले व नाटक-दिखाऊपणास महत्त्व आले. वैभव, सत्ता व सर्व साधने पायाशी लोळण घेत असताना आपण भोगी-उपभोगी नसल्याचे दाखविण्यासाठी धडपडणे हासुद्धा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार सध्या सगळ्यात जास्त फोफावला आहे. श्री. दलबीर सिंग भंडारी हे देशाचे मुख्य न्यायाधीश होते. आता ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश झाले. हेच श्री. भंडारी मंगळवारी जोधपूरच्या विमानतळावर उतरले व साध्या रिक्षातून बाहेर पडल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. मला गंमत वाटली!

ता. क. – ट्रम्प कन्या इव्हांका यांच्या आगत-स्वागतावर व सुरक्षा व्यवस्थेवर ३५ कोटींवर खर्च झाल्याच्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अनेक तहानलेल्या गावांना त्यातून पाणी योजना देता आल्या असत्या.

@rautsanjay61
[email protected]

  • dhavalkg

    bhau sanjay raut … barych goshti tumchya samjnya baher chya ahet.
    tumhi lok fakta divacha divachi che rajkaran karta … dam ahe na tumchyat tar nigha na sarkar baher … sarkar madhe rahun ka tika kartai ??

    Balasaheb yanchi shivsena rahili nahi ata … tyancya navacha tumhi lok gairwapar karat ahat… Balasaheb bolnya peksha krutivar jast vishawas thevat … ani tumhi lok fakta bolnyawar …