आता ‘अटळ’ राहुल गांधी!

212

rokhthokराहुल गांधी ‘अजिंक्य’ आहेत काय ते मला माहीत नाही, पण गुजरातच्या निकालांनी एक स्पष्ट केले ते म्हणजे, आता या पुढच्या राजकारणात राहुल गांधी ‘अटळ’ आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’ व्हावा असे ज्यांना वाटत होते त्यांच्या नाकासमोर ‘काँग्रेसयुक्त’ गुजरात झालेला आपण पाहिला!

काँग्रेसच्याच काही जणांनी ऐन वेळेस शेण खाल्ले नसते तर गुजरातमध्ये सत्तापरिवर्तन घडलेले दिसले असते व राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची तुतारी खऱ्या अर्थाने फुंकली गेली असती, पण काँग्रेस पक्ष म्हणजे भांग पिऊन बेतालपणे वागणाऱ्या म्हाताऱ्यांचा घोळका झाला आहे व त्या काँग्रेसचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता राहुल गांधींवर पडली आहे.

मी राहुल गांधींचा समर्थक किंवा भक्तगण अजिबात नाही. त्या विचारांच्या मुशीतून मी कधीच गेलो नाही, पण इंदिरा गांधींचा नातू व राजीव गांधींचा मुलगा म्हणून त्यांच्याविषयी ममत्व बाळगणे हा गुन्हा नाही. राष्ट्रभक्तीच्या कुणी कितीही गप्पा मारल्या तरी नेहरू-गांधी कुटुंबाचे योगदान राष्ट्रीय जडणघडणीत आहे व त्यागही आहे. देशासाठी दोन दिवसही तुरुंगवास न भोगलेल्या लोकांकडून आज नेहरू-गांधींची खिल्ली उडवली जाते तेव्हा कीव येते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी रक्ताचे दोन थेंब सोडा, बलिदान तर दूरच; पण ज्यांनी घामही गाळला नाही असे लोक सत्ताधारी बनून नेहरू-गांधींना देशाचे दुश्मन ठरवतात व लोक त्यावर टाळ्या वाजवतात तेव्हा कमाल वाटते. गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ‘आई रिटायर झाली’ व चि. राहुल यांच्यावर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पडली. कोणताही बडेजावी सोहळा व गर्जनाबाजी न करता हा पक्षांतर्गत उपक्रम पार पडला. त्यानंतर सोशल मीडियावर नितीन वैद्य यांनी लिहिलेली एक ‘पोस्ट’ मला अस्वस्थ करून गेली. ‘‘कितीही टीका करा, दूषणं द्या.यांच्या वाट्याला आलेली दुःखं कोणाच्याही वाट्याला आलेली नाहीत आणि भविष्यात यांच्याइतकं अनिश्चित जगणं कोणाचंही नसेल…म्हणूनच यांचं आपल्या आयुष्यातलं असणं अटळ आहे. या कुटुंबाला सलाम!’’

rokh-thok-24-dec1

‘तो’ बदलला आहे
देशप्रेम हे ढोंग व ‘बाजार’ झाल्याच्या वातावरणात राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. राहुल गांधींनी देशाचे लक्ष वेधून घेतले. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींना बिलगलेल्या छोट्या राहुलला मी पाहिलं तेव्हा त्याचे डोके वडिलांच्या पोटाला लागत होते. आज काँग्रेसचे अध्यक्षपद त्याने स्वीकारले तेव्हा प्रेमाने आईच्या कपाळाचे ‘चुंबन’ घेतानाचे छायाचित्र पाहून १९८४ चा राहुल गांधी आठवला. त्याच्या गालावरील ‘खळी’ सोडली तर राहुल गांधी आज ‘तो’ राहिलेला नाही. राजीव गांधींच्या हत्येनंतर हादरलेल्या कुटुंबाने राजकारण सोडल्यासारखेच होते. परदेशी वंशाच्या सोनिया गांधी मुलांना घेऊन ‘इटली’त जातील अशी वावटळ उठली. पण सोनिया गांधींना काँग्रेसवाल्यांनी शेवटी राजकारणात खेचलेच व सोनियांना सिंहासनावर बसवून नेहमीच्या कोंडाळ्याने सूत्रे हाती घेतली. परिवाराच्या नावावर सत्ता भोगणाऱ्यांनी ‘गांधी’नामास गोचिडाप्रमाणे चिकटून पुरेपूर शोषण केले. सोनिया गांधी या राजकारणात कच्च्या, पुन्हा ‘विदेशी’ म्हणून त्यांना मर्यादा. सोनियांच्या माहेरच्या माणसांनी सत्तेचा गैरवापर केला व ‘बोफोर्स’पासून पुढे अनेक व्यवहारांचे शिंतोडे उडत राहिले. शरद पवार यांना डावलून सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात सत्तास्थापनेचा दावा ठोकण्यासाठी पोहोचल्या तेव्हा ‘विदेशी’ वंशाच्या मुद्द्यावर काँग्रेसचा तुकडा पडला. यास मोठा कालखंड उलटून गेला, पण हे टीकेचे व बदनामीचे घण पुढे राहुल यांनी सोसले. ते पक्षाचे सरचिटणीस झाले, उपाध्यक्ष झाले. पक्षाची सूत्रे हाती घेऊनही राहुलना फारशी चमक दाखवता आली नाही. कारण सोनिया गांधी यांच्याभोवती जमलेल्या गोतावळ्यात राहुल ‘पप्पू’ आहे, राहुलच्या हाती सूत्रे म्हणजे आपल्याला घरी बसावे लागेल, हा प्रचार भाजपकडून कमी व काँग्रेसअंतर्गत नेतृत्वाकडून जास्त झाला. राहुल गांधी हे बेभरवशाचे व अपरिपक्व नेते आहेत, काँग्रेस पक्ष ते संपवून टाकतील हीच धारणा गेल्या २० वर्षांपासून आहे. राहुल गांधी यांच्यामुळेच ‘काँग्रेसमुक्त भारत’चे स्वप्न साकार होईल व राहुल गांधी यांच्याकडे जोपर्यंत काँग्रेसचे नेतृत्व आहे तोपर्यंत भाजप सत्तेवर व मोदी पंतप्रधान राहतील, असे बेताल बोलणाऱ्यांच्या तोंडास गुजरातच्या निकालाने ‘बूच’ लावले व भाजपच्या प्रचाराचा रोख पूर्णपणे राहुल गांधींवर राहिला. गुजरातची निवडणूक पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच झाली व काँग्रेस बुडवायला निघालेल्या राहुल गांधी यांनी भाजप व पंतप्रधानांची दमछाक केली आणि भाजप धापा टाकत जिंकला. राहुल गांधी यांनी काँग्रेसला गुजरातेत भले सत्ता मिळवून दिली नसेल, पण विजयी केले. विजय म्हणजे फक्त ‘सत्ता’ आणि सत्ता विकत घेऊ शकतो या भ्रमाचा भोपळा फोडण्याचे काम या ‘पप्पू’ म्हणून हिणवल्या गेलेल्या तरुणाने केले.

मोठे आव्हान!
काँग्रेस पक्षाला राखेतून बाहेर काढण्याचे काम आता राहुल गांधींना करावे लागेल. उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांनी समाजवादी पार्टीबरोबर ‘दुय्यम’ स्वरूपाची युती केली. तिथे अपयश आले. आतापर्यंत ते अपयशाचे धनी होते. त्यांना मूर्ख व अपयशी ठरविण्यासाठी एक यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करीत राहिली. राहुल गांधी हे या अग्निदिव्यातून पार पडले तर ते यशस्वी होतील. गुजरातने त्यांच्या अपयशाची मालिका मोडली आहे. त्यांनी उत्तम प्रचार केला. संयमी भाषणे केली. टीकेचे व बदनामीचे घाव सोसून ते कणखर व बेडर बनले असावेत. मोदी यांच्याप्रमाणे राहुलला कुटुंब नाही, पण बहीण व आई आहे आणि जड झालेल्या मेव्हण्याचे ओझे आहे. राहुल गांधी यांच्या गालावरील खळी अनेकांना मोहित करीत होती, पण आता ते Most eligible bachelor राहिलेले नाहीत. उन्हातान्हात वणवण करून त्यांचा चेहरा ‘राकट’ बनला आहे. गालावरील खळीचा ‘खड्डा’ होताना दिसत आहे. त्या खड्ड्यात कोण पडतंय ते पाहायचे!

महाभारत
२०१९ साली काय होणार, याचे अंदाज आता कोणीच बांधू शकणार नाही. गुजरातच्या निकालाने सगळ्यांच्या अंदाजपत्रकांची धूळधाण उडवली आहे. ३५० जागा लोकसभेसाठी जिंकण्याचा विडा श्री. अमित शहा यांनी उचलला आहे. मी त्यांना सुयश चिंतितो. गुजरात विधानसभेत १५० च्या खाली एकही जागा कमी घेणार नाही व एक जरी जागा कमी झाली तरी विजयोत्सव साजरा करू नका, असे श्री. शहा यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणे होते, पण भाजपचा डाव शंभरच्या आत आटोपला व २०१९ साली राहुल गांधी हे एक आव्हान आहे हे स्पष्ट झाले. ‘‘मी पंतप्रधानपदाचा आदर करतो, पण माझे भांडण अहंकारी मोदींशी आहे व ही लढाई मी सभ्यता व संयम न सोडता लढेन,’’ असे राहुल गांधी सांगत होते. विकास व भ्रष्टाचार याबाबत राहुल गांधी यांनी काही मूलभूत प्रश्न गुजरात प्रचारात उभे केले. त्यांची उत्तरे शेवटपर्यंत मिळाली नाहीत. १४ राज्यांचे मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, प्रचंड साधनसंपत्तीचा वापर व अमर्याद सत्ता गुजरात जिंकण्यासाठी वापरली गेली. त्यांच्यासमोर राहुल गांधी म्हणजे मातीचे गळके भांडे होते. तरीही राहुलनी त्यांचा घोडा रणाच्या मध्यभागी नेला व ते लढले. लोक लढणाऱ्याच्या मागे उभे राहतात. मी काँग्रेसचा समर्थक नाही, पण राहुलच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष उभा राहत असेल तर त्यांचे स्वागत असो. इंदिरा गांधी यांनी राजकारणात मुसंडी मारली तेव्हा एक घोषणा घराघरात घुमली, ती म्हणजे ‘इंदिरा गांधी आयी है, नयी रोशनी लायी है।’. ‘अब की बारी अटलबिहारी’ हेसुद्धा गाजले व मोदी उदयानंतर फक्त ‘नमो नमो’चाच गजर झाला. मोदी यांच्या प्रसिद्धी तेजाने सगळ्यांचेच दिवे झाकोळून गेले. आता राहुल गांधींसाठी कोणती घोषणा लोक देतात ते पाहायचे.

नव्या लढाईची सुरुवात झाली आहे. महाभारताप्रमाणे आज तरी रहस्य व गोंधळाचेच वातावरण आहे. कोण कोणाच्या बाजूला हे पुढच्या काळात ठरेल.

पण यापुढे मोदींनाही राहुलना टाळता येणे कठीण आहे!

@rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या