एका जिवंत हुतात्म्याचे जगणे, एक मराठा लाख मराठा!

114

rokhthok‘‘कुलभूषण जाधव हासुद्धा लाखमोलाचा मराठा आहे. त्यांचे जगणे हे जिवंत हौतात्म्याचे जगणे ठरावे. पाकिस्तानने त्यांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. त्यांना भेटावयास गेलेल्या मातेचा व पत्नीचा अपमान केला आहे. ही विकृती कायमची नष्ट झाली तर बरे होईल.’’

हिंदुस्थानच्या काही राज्यांतील निवडणूक उन्माद संपला असेल तर राज्यकर्त्यांनी ‘राष्ट्रीय’ हिताच्या प्रश्नाकडे पाहावे. गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपचे मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत. देशातील १९ राज्यांत भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांची सरकारे विराजमान झाली याचा आनंद साजरा होत असतानाच कुलभूषण जाधव हे त्यांची आई व पत्नीस काचेआडून भेटत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ते अस्वस्थ करणारे आहे. तब्बल अडीच वर्षांनी कुलभूषण जाधव हे नातेवाईकांना भेटले. या भेटीचा उल्लेख पाकिस्तान ‘मानवता’ वगैरे न पेलणारे शब्द वापरून करीत आहे. हिंदुस्थानच्या सरकारने अत्यंत गंभीरतापूर्वक घ्यावे व १२५ कोटी जनतेने चिंता व्यक्त करावी असे हे प्रकरण आहे. निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना अफगाणिस्तानच्या सीमेवरून पाक सैन्याने अटक केली. हिंदुस्थानसाठी हेरगिरी करीत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला. कुलभूषण जाधव हा हिंदुस्थानच्या दहशतवादी कृत्याचा चेहरा असल्याचा डांगोरा यानिमित्ताने पाकने पिटला व कुलभूषणना पाकच्या सैनिकी कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली. जाधव यांचे भविष्य आता अंधःकारमय आहे.

पुरावा काय?
कुलभूषण जाधव हे नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. ते पाकिस्तानात दहशतवाद माजवू इच्छित होते याचा कोणताही पुरावा पाक देऊ शकलेले नाही. तरीही जाधव यांना बचावाची संधी न देता फाशीची सजा ठोठावली गेली आहे. हा अन्याय आहे, पण ‘न्याय’ व ‘मानवता’ या शब्दांशी कोणतेही देणेघेणे नसलेल्या पाकच्या अजगरी जबड्यात कुलभूषण जाधव अडकले आहेत. १९७१ च्या युद्धातील ५६ युद्धकैदी पाकिस्तानच्या कैदेत आजपर्यंत खितपत पडले आहेत व त्यांचा ठावठिकाणा पाकिस्तानने लागू दिलेला नाही. मेजर तांबे हे पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचे पुरावे अनेकदा समोर आले, पण तांबे यांच्यासह ५६ हिंदुस्थानी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले ते कुणालाच समजले नाही. तांबे यांच्या पत्नी या ५६ युद्धकैद्यांसाठी सरकारदरबारी व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी लढाई लढल्या; पण श्रीमती तांबे यांचा आवाजही शेवटी क्षीण पडला. त्यामानाने कुलभूषण जाधव यांच्याबाबत लोकांत व सरकारात जागरूकता दिसत आहे. जाधव यांना आतापर्यंत फासावर लटकवले नाही व आता त्यांच्या पत्नीला व आईला इस्लामाबादेत जाऊन भेटता आले हे देशाच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे यश आहे.

आईचे मन
कुलभूषण जाधव यांच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार झाले आहेत. पाकिस्तान हा कसायांचा देश आहे व तिथे नाती, माणुसकीची किंमत शून्य आहे. पाकिस्तानातील गंभीर आजार झालेल्या रुग्णांना हिंदुस्थानात उपचारांसाठी यायचे असेल तर वैद्यकीय व्हिसा देण्याचा ‘माणुसकी’ धर्म आपण जपतो. पाकिस्तानने मानवतेचा डांगोरा अजिबात पिटू नये. तो लुटारूंचा आणि कसायांचा देश आहे. ताप, सर्दी आणि खोकल्यावरही तिथे चांगले औषध निर्माण होत नाही. असंख्य पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी आजही हिंदुस्थानात येतात व आपले परराष्ट्र मंत्रालय अत्यंत उदार अंतःकरणाने या सगळय़ांना ‘मेडिकल व्हिसा’ देत असते. याला म्हणतात मानवता धर्म. पाकिस्तानला ‘मानवता’ शब्दाची अॅलर्जी आहे. त्यांनी एक सरकारी फतवा काढून त्यांच्या जनतेला सांगायला हवे की, कुणीही वैद्यकीय कारणासाठी व कलावंतांनी पैसे कमविण्यासाठी हिंदुस्थानात पाय ठेवू नये. कुलभूषण दहशतवादी असतील तर त्यांच्या देशात भीक मागायला येताय कशाला? पण कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी इस्लामाबादेत भेटायला गेल्या तेव्हा त्या मातेच्या व मुलाच्या मध्ये त्या सरकारने जाड काच उभी केली आणि त्या मातेला मुलाला स्पर्शही करू दिला नाही. पत्नीच्या कपाळावरील व गळ्यातील सौभाग्यलेणेही पाक अधिकाऱ्यांनी उतरवायला लावले. हिंदुस्थानात बसून जे पाकचे गोडवे गातात, पाकिस्तानबरोबर संबंध सुधारायला हवेत असे जे म्हणतात त्यांनी कुलभूषणच्या आईचे मन एकदा जाणून घ्यायला हवे.

आंतरराष्ट्रीय गुन्हा
गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत असल्याचा मुद्दा गाजला. त्याचे राजकीय भांडवल केले गेले, पण सीमेवर मारले जाणारे जवान, त्यांचे हौतात्म्य व कुलभूषण जाधव यांच्यासारख्यांनी भोगलेल्या यातना व त्याग कधीच प्रचार व चर्चेचा मुद्दा ठरत नाही. कुलभूषण जाधव हे खरोखरीच हिंदुस्थानची ‘सेवा’ बजावताना पकडले गेले असतील तर त्यांचे शौर्य मोलाचे व सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या तोडीचे ठरावे. त्यांचे जगणे हे जिवंत शहीदाचे व ते अधिक वेदनेचे ठरते. आता कुलभूषण जाधव व त्या आधी सरबजित. सरबजितलादेखील हिंदुस्थानी हेर म्हणून पकडण्यात आले होते. त्यालाही फाशी ठोठावली गेली होती, पण फाशी देण्याआधीच पाकिस्तानी तुरुंगात सरबजितला अत्यंत निर्घृणपणे मारण्यात आले. सरबजित काय किंवा जाधव काय, हे देशाचेच काम करीत असतात, पण देश त्यांना जाहीरपणे कधीच स्वीकारू शकत नाही. पाकिस्तानने दाऊदसारख्यांना स्वीकारले, पण कसाबला झिडकारले. अर्थात जाधव व कसाब यांच्यात फरक आहे. कसाब हा नराधम होता व पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्यासाठी त्यास हातात बॉम्ब घेऊन पाठवले होते. कुलभूषण जाधव हे हिंदुस्थानच्या दहशतवादी कृत्याचा चेहरा होऊ शकत नाहीत. त्यांना अफगाणिस्तानात अटक करून पाकिस्तानात नेले गेले. दुसऱया देशाच्या भूमीवरून परकीय नागरिकास अशा प्रकारे उचलून नेणे हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा आहे.

थांबवा हे!
श्री. मणिशंकर अय्यर या पाकधार्जिण्या काँग्रेस नेत्याने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी एक जेवणावळ ठेवली. त्यास पाकिस्तानी अधिकारी व राजकीय नेते उपस्थित होते. पण मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनीही तिथे हजेरी लावावी? पाक अधिकारी व राजकारण्यांना पाहताच मनमोहन सिंग यांनी तिथून बाहेर पडायला हवे होते. जे पाकडे लोक हिंदुस्थानचे सैनिक मारतात, कुलभूषणसारख्यांना बंदिवान बनवून छळ करतात आणि मुलाला भेटावयास गेलेल्या मातेचा व पत्नीचा अपमान करतात, त्यांची सौभाग्यलेणी उतरवतात, अशा नालायकांशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पाकिस्तानात जाऊन हिंदुस्थानला ‘शहाणपण’ शिकवणारे व कश्मीरातील फुटीरतावाद्यांना जाहीर मिठय़ा मारणारे हे मणिशंकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारा हा माणूस. तो पाकडय़ांना जेवायला बोलावतो व तिथे काँग्रेसचे नेते हजर राहतात. प्रश्न देशभक्ती व निष्ठेचा नसून मणिशंकरसारख्यांच्या विकृतीचा आहे. सैनिकांनी मरायचे, कुलभूषणसारख्यांनी यातना सहन करायच्या व काही जणांनी पाकड्यांसोबत मेजवान्या झोडायच्या? हे आता थांबले पाहिजे.

लाख मराठा
देशासाठी परकीय तुरुंगात जाणारा शेवटी ‘मराठा’च आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत मुंबईसह महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे निघाले. आरक्षण व महिलांवरील अन्यायाविरोधातले शिस्तबद्ध मोर्चे गाजले; पण एक लाखमोलाचा मराठा पाकिस्तानी तुरुंगात एकाकी लढतो आहे व रोज पाकड्यांच्या छळाचा शिकार होतो आहे याचा विसर सगळ्यांनाच पडला. दुश्मनांच्या गोळीने शहीद झालेल्या सैनिकांची अंत्ययात्रा एकदाच निघते. कुलभूषणसारखे जिवंत शहीद मात्र रोजच गळय़ाभोवती आवळलेला फास घेऊनच दुश्मनांच्या तंबूत जगत असतात.

कुलभूषण यांना जिवंतपणीच ‘परमवीरचक्र’ बहाल करायला हवे. कुलभूषण यांची आई व पत्नीस पाकच्या पत्रकारांनी घेरले आणि आयएसआयने पढवून ठेवलेले प्रश्न विचारले, ‘‘तुमचा मुलगा खुनी आहे. त्याने हजारो पाक निरपराध्यांची हत्या केली आहे. खुनी मुलाला भेटून कसे वाटले?’’

असे प्रश्न हिंदुस्थानी मातेस विचारणे म्हणजे विकृतीचा कळस आहे.

कुलभूषण देशाचे हीरो ठरावेत.

एक जिवंत हुतात्मा पाकिस्तानच्या तुरुंगात देशासाठी रोज ‘बलिदान’ देत आहे!

Twitter – @rautsanjay61
 Email – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या