तप्त वाळवंटातील सुरक्षा!

rokhthok देशभरात ‘पद्मावती’ सिनेमाचा वाद पेटला आहे व गुजरात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा व जगण्यामरण्याचे प्रश्न काही काळ मागे पडले. या सर्व पार्श्वभूमीवर राजस्थानमधील हिंदुस्थान-पाक सीमेवर जाता आले. आपले जवान तेथे काय करीत आहेत?

हिंदुस्थानच्या चौफेर सीमांवर काय सुरू आहे याकडे नागरिक म्हणून आपले किती लक्ष आहे? कश्मीर हे पाकिस्तानच्या सीमेवरील आपले राज्य. तिकडे पाक सैनिक व दहशतवाद्यांची सतत घुसखोरी सुरू असते. चकमकी होतात व आपले जवान शहीद होतात. त्यामुळे कश्मीरची चिंता आपण करतो. कश्मीरातील अस्वस्थता व अशांतता हा गेल्या ७० वर्षांच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग झाला आहे. पण कश्मीरशिवाय देशाला इतरही मोठा सीमाभाग आहे व ७५ हजार किलोमीटरच्या सीमेवर आपले जवान डोळ्यांत तेल घालून जागता पहारा देत असतात. राजस्थानलगतच्या सीमा थेट पाकिस्तानशी जोडल्या आहेत व उद्या पाकिस्तानबरोबर युद्ध झालेच तर ते राजस्थानच्या भूमीवर, तेथील वाळवंटात सर्वांत जास्त होईल. १९७१ साली पाक युद्धात ते घडले व १९६५ सालीही तेच घडले. कश्मीरातील रक्त गोठवणाऱ्या बर्फात आमचे जवान उभे आहेत तसे राजस्थानच्या रक्त उकळवणाऱ्या उन्हातही उभेच आहेत. जैसलमेरच्या तप्त वाळूवर पापड भाजला जातो, ‘रोटी’ शेकली जाते व आमचे जवान तिथे सीमेवर उभे आहेत. हे सर्व मला जवळून पाहता आले.

तप्त सीमा
कश्मीरच्या सीमा या बर्फ व थंडीत गोठलेल्या सीमा; तर जोधपूर, जैसलमेर, बारमेरच्या सीमा या तप्त सीमा. थंडीही कडाक्याची व उष्णताही टोकाची. जणू मध्यान्हीचा सूर्य त्या वाळूतूनच आग ओकतो. जोधपूरचे खासदार कर्नल सोनाराव चौधरी बरोबर होते व त्यांच्यामुळे सीमेवर जाता आले. अनेक गोष्टी जवळून पाहता आल्या. येथे युद्धसदृश स्थिती आज नाही. त्यामुळे सैन्याच्या हालचाली नाहीत. पण हिंदुस्थानी सीमांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते सीमा सुरक्षा दलाचे जवान (BSF) तिथे डोळ्याला दुर्बीण लावून उभे आहेत. सीमेवर तारांचे कुंपण आहे व पलीकडे पाकिस्तानची भूमी सुरू होते. पण पाकच्या हालचाली नाहीत व चौक्याही नाहीत. त्यांनी समोर बऱ्यांपैकी खंदक खणले आहेत व तयारी सुरू आहे अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने दिली. तारेचे कुंपण हे दोन देशांतील सीमा रेषा. पण त्यापलीकडे जागा आंतरराष्ट्रीय नियमाने मोकळी ठेवावी लागते. ती आंतरराष्ट्रीय बॉर्डर असते. जेव्हा युद्ध नसते तेव्हा सीमा सुरक्षा दलाचे जवान तेथे गस्त घालत असतात. तारांचे कुंपण जुने झालेय व ते वर करून कोणीही आत येईल, पण सीमा सुरक्षा दल जागरूक आहे. ‘आतापर्यंत घुसखोरीचे किती प्रयत्न झाले?’ हा माझा त्यांना प्रश्न. ‘पलीकडे गावे आहेत. त्यांची गुरं इकडे वाट चुकून येतात. आम्ही त्यांच्या चौक्यांना संदेश देतो. काही वेळा स्मृतिभ्रंश झालेले लोक भटकत येतात. ते रस्ता चुकलेले असतात’ अशी माहिती दिली. राजा-महाराजांचा हा प्रदेश. अनेक राजांचे वैभवशाली राजवाडे, महाल आजही दिमाखात उभे आहेत. पण स्वातंत्र्याआधी फाळणी झाली तेव्हा जोधपूरच्या महाराजांचा कल पाकिस्तानात सामील होण्याचा होता व ते शेवटपर्यंत निर्णय घेण्यास चालढकल करीत होते. पाकिस्तानच्या दारातच हे संस्थान आहे. पण सरदार पटेलांनी चक्रे हलवली व महाराजांची नाकेबंदी करून येथेच ठेवले, असा इतिहास सांगणारे लोकही जोधपुरात आहेत. त्यामुळे जोधपूर, जैसलमेर, बारमेर येथे हवाई दल व लष्कराचे तळ आहेत. उत्तरलाई व मुंगीबाई या प्रत्यक्ष सीमेवरील गावांना भेटी दिल्या. ही गावेसुद्धा लष्करी छावण्याच बनल्या आहेत. जैसलमेर-बारमेर सीमेवरील या गावांत जाणे हेसुद्धा पर्यटनच आहे. पण पंजाबमधील ‘वाघा’ सीमेवर जास्तीत जास्त पर्यटक जातात व संध्याकाळचे सैनिकी संचलन बघतात. तसे येथे नाही. तनोट नावाचे गाव सीमेवर आहे. तेथे तनोट राय मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. दुर्गेचे हे प्रतिरूप व ही दुर्गाच सीमेवरील गावांचे रक्षण करते अशी श्रद्धा येथील लोकांत व सैनिकांत आहे. सीमेवरील या गावांनी पाकिस्तानबरोबरची दोन मोठी युद्धे पाहिली आणि तोफगोळे व बॉम्बचा वर्षाव झेलला. पण नुकसान झाले नाही ते मातेश्वरी तनोट रायमुळेच या विश्वासावर येथे लोक सकाळी डोळे उघडतात. १९६५ च्या हिंदुस्थान-पाक युद्धात पाकिस्तानने मंदिरावर व आसपास तीन हजारांवर बॉम्ब फेकले. ४५० बॉम्ब मंदिराच्या आवारात पडले. पण मंदिरास इजा झाली नाही. १९७१ च्या युद्धांतही तेच घडले. याच परिसरात हिंदुस्थानी सैन्याने पाक सैन्याचे शेकडो टँक व गाड्या उद्ध्वस्त केल्या. ही सर्व माता तनोट रायची कृपा असे आपले सैनिकही मानतात. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी १९६५ साली येथे चौकी स्थापन केली व मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन, पूजाअर्चा याची जबाबदारी जवानांनी घेतली. यासाठी बी.एस.एफ.ने एक ट्रस्ट निर्माण केला व मंदिराचे व्यवस्थापन आज या जवानांकडे आहे. दुश्मनांशी लढण्यासाठी त्यांच्या हाती शस्त्र आहे आणि लढण्यासाठी व मरण्यासाठी ते तयार आहेत. पण सीमेवरील दुर्गामातेची ही शक्ती त्यांना लढण्यासाठी हवीच आहे.

रस्ते, पूल व बोगदे
हिंदुस्थानच्या बहुतेक सर्व सीमांवर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे व सीमा रस्ते विकास मंडळ हे राष्ट्र निर्माणाचे काम करीत आहे आणि ‘BRDB’ म्हणजे Border Road Development Board १९६० साली स्थापन झाले. पंतप्रधान स्वतः या बोर्डाचे चेअरमन होत. १९८५ साली त्यात बदल झाला व संरक्षणमंत्री त्या बोर्डाचे अध्यक्ष झाले. फक्त रस्तेच नाहीत तर सीमांना जोडणारे भव्य पूल व बोगदेही या बोर्डातर्फे निर्माण केले जातात. सीमा संरक्षणाच्या दृष्टीने बीएसएफ (Border Security Force) महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे व पाक सैन्याच्या व दहशतवाद्यांच्या हल्ल्याने बीएसएफचे अनेक जवान आतापर्यंत शहीद झाले आहेत. सीमा सुरक्षा दलांच्या चौक्यांवर हल्ले होतात. तिथे चकमकी होतात. जिथे मनुष्य वा जनावर श्वासही घेऊ शकत नाही, जिवंत राहू शकत नाही अशा भयंकर बर्फवादळात, तापलेल्या वाळूवर हे सीमा सुरक्षा दलाचे जवान उभे आहेत. जंगलात आणि दलदलीत त्यांच्या चौक्या आहेत. देशाचे डोळे व कान म्हणजे ‘बीएसएफ’चे जवान आहेत. १९६५ साली सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली. तोपर्यंत त्या त्या राज्यांचे पोलीस दल सीमांचे पहारेकरी होते व तेथे अनेकदा आपण कमजोर पडत होतो. सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेनंतर सीमा जास्त सुरक्षित झाल्या. १९७१ च्या पाक युद्धात राजस्थानच्या वाळवंटात हिंदुस्थानी सैन्याच्या बरोबरीने सीमा सुरक्षा दलाचे जवान लढत होते. पाकिस्तानी हवाई दलाचे बॉम्बहल्ले व तोफांची पर्वा न करता या जवानांनी पाक सैनिकांना मागे रेटले. राजस्थानात तेव्हा सीमा सुरक्षा दलाकडे १०० उंट होते व उंटावर स्वार होऊन हे ‘बीएसएफ’ जवान दुश्मनांशी लढत राहिले. आज त्यांची गस्त उंटावरून सुरूच आहे.

प्रेरणादायी
‘मुगबाव’च्या चौक्यांवरील जवानांनी त्यांच्या मेसमध्ये बनवलेल्या सामोसे व लस्सीचा स्वाद घेतला. त्या वाळवंटातही प्रेम, माणुसकी व देशभक्तीचा अखंड झरा वाहत आहे. १९६५ साली सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली तेव्हा के. एफ. रुस्तमजी हे त्यांचे पहिले महासंचालक होते. अत्यंत प्रेरणादायी असा हा सैनिकी फोर्स आहे. या दलाची एक प्रतिज्ञा हिंदीतच देतो व विषय संपवतो.

‘‘मैं सीमा प्रहरी के हथियारों का अपमान नहीं करूंगा। अपना साथी, जो मेरे साथ साथ लड रहा हो, चाहे वह अकेला हो या औरों के साथ हो, परित्याग नहीं करूंगा। मैं अपने देश के पवित्रता की हर किमत पर रक्षा करूंगा।’’

हे सर्व इमानदारीचे दर्शन मला जवळून घेता आले. प्रत्येकाने ते घ्यावे.

@rautsanjay61
[email protected]