रोखठोक : तीन मूर्तीवरील नेहरू!

rokhthokपंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचे तीन मूर्तीवर 16 वर्षे वास्तव्य होते. देशाला दिशा देण्याचे काम याच वास्तूतून झाले. नेहरूंनी येथेच अखेरचा श्वास घेतला. या घराचे रूपांतर स्मारकात झाले. ते स्मारक आता फक्त नेहरूंचे राहणार नाही. मोदींच्या मनात काय आहे?

‘भारताला मी कोणता वारसा दिलाय? स्वतःवर राज्य चालवायला पात्र असलेले चारशे दशलक्ष भारतीय हाच मी भारताला दिलेला वारसा आहे.’ – जवाहरलाल नेहरू

दिल्लीच्या भेटीत मी पुन्हा एकदा तीन मूर्ती रोडवरील नेहरू स्मारक आणि संग्रहालयात गेलो. पंतप्रधान मोदी यांनी ठरवले आहे की, तीन मूर्ती रोडवरील नेहरूंचे हे स्मारक आता राहणार नाही. त्या वास्तूत इतरही माजी पंतप्रधानांची स्मारके होतील. म्हणजे पंडित नेहरूंच्या नावाने ही वास्तू ओळखली जाणार नाही. विद्यमान राज्यकर्त्यांचा काँग्रेसविरोध मी समजू शकतो, पण व्यक्तिगत आकस आणि नेहरूविरोध टोकाचा आहे. हिंदुस्थानसारख्या महाकाय राज्यात अशा प्रकारे सूडाने राज्य करता येणार नाही. पुन्हा ज्यांनी विकासाची एकही वीट रचली नाही व नवा देश घडविण्याची संधी मिळूनही त्या दिशेने एकही पाऊल टाकू शकले नाहीत अशांनी पंडित नेहरूंच्या स्मृतीवर हातोडा मारावा? देश घडविण्याची प्रक्रिया पंडित नेहरूंनी सुरू केली. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम (जे आता विकायला काढले आहेत), मग ते ओएनजीसी असेल नाहीतर पेट्रोलियम, स्टील कंपन्या, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर असेल नाहीतर आयआयटी, हे सर्व नेहरूंनी उभे केले. त्याच पायाभरणीवर आपण आज राज्य करीत आहोत.

पंतप्रधानांना आवाहन
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक सच्चे व प्रामाणिक गृहस्थ आहेत याविषयी मतभेद असण्याचे कारण नाही. मनमोहन यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र आता लिहिले आहे. त्यातील भावना सगळय़ांनी समजून घेतल्या पाहिजेत.

‘‘प्रिय प्रधानमंत्रीजी,
नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालय (नेहरू मेमोरियल म्युझियम अॅण्ड लायब्ररी) या ऐतिहासिक वास्तूच्या स्वरूपात आपण बदल करू इच्छिता हे चिंताजनक आहे. देशाचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हे फक्त काँग्रेसचे नव्हते, तर संपूर्ण देशाचे होते. या स्मारकाची स्थापना नेहरूंच्या स्मृती जतन करण्यासाठीच करण्यात आली व ही तेव्हा देशाची इच्छा होती. पंतप्रधान म्हणून येथे नेहरूंचे वास्तव्य होते. तीन मूर्ती भवनातील संग्रहालयातील काही खोल्या या आजही तशाच ठेवल्या आहेत, नेहरूंचे निधन झाले तेव्हा होत्या तशा. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे नेहरूंचे भक्त होते. अटलजी पंतप्रधान असतानाही नेहरू स्मारकात बदल व्हावा असे त्यांना वाटले नाही. नेहरू हे एक ‘जिवंत व्यक्तिमत्त्व’ होते. नेहरूंनी ज्या प्रकारे तीन मूर्ती परिसरास शोभायमान केले तसे पुन्हा कधीच कोणी करू शकणार नाही असे श्री. अटलजी यांनी संसदेत सांगितले आहे. तीन मूर्ती परिसराशी छेडछाड ही देशाच्या इतिहासाशी छेडछाड ठरेल. तोच देशाचा इतिहास आणि वारसा आहे. त्यामुळे तीन मूर्ती परिसर जसा आहे तसाच राहू द्या. यातच सगळय़ांचा सन्मान राहील.

नेहरू म्हणजे काँग्रेस नाही, तर
देशाचे नेतृत्व होते याच
भावनेतून मी हे पत्र आपणांस
लिहीत आहे.’’
नेहरू कसे संपतील?

काँग्रेस संपवता येईल, पण नेहरू-गांधी-आंबेडकरांना संपवता येईल? आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष तरी आज कुठे अस्तित्वात आहे? पण आंबेडकर जिवंत आहेत. नेहरू कसे होते? कविमनाचा, व्यापक दृष्टीचा, सर्वसमावेशक उदारतेचा आणि हिंदुस्थानच्या संस्कृतीशी नाळ न तोडता अत्याधुनिक, सर्वांगीण धोरणाची शिल्पाकृती हिंदुस्थानला बहाल करणारा पंडित नेहरूंसारखा नेता या शतकात तरी झाला नाही. पहिले पंतप्रधान म्हणून नेहरू यांनी पहिल्या स्वातंत्र्यदिनी ज्या भावना व्यक्त केल्या, ज्या शब्दांत त्या व्यक्त केल्या, ते शब्द आजही हृदयस्पर्शी वाटतात, ‘‘पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केलेला होता. त्या अभिवचनाची संपूर्णपणे नव्हे, तर बऱयाचशा प्रमाणात पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे. मध्यरात्रीच्या ठोक्याबरोबर सारे जग झोपले असताना भारत जागृत होऊन नव्या जीवनाला आणि स्वातंत्र्याला सामोरा जाईल. एक क्षण येतो, इतिहासात असा क्षण क्वचितच येतो की, ज्या क्षणाला आपण जुन्यातून बाहेर पडून नव्याकडे पदार्पण करतो. ज्या क्षणाला एका कालखंडाची समाप्ती होते आणि प्रदीर्घ काळ बंदिस्त असलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. त्या या गंभीर क्षणाला भारताच्या, भारतीय जनतेच्या आणि त्याहीपेक्षा महान अशा मानवजातीच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा करूया.’’

नेहरू हे सांगत होते तेव्हा देशाची फाळणी सुरू होती. हिंसाचार, दंगली भडकल्या होत्या. हिंदुस्थानच्या अशा अभूतपूर्व विजयाच्या आणि शोकांतिकेच्या प्रसंगी नेहरूंच्या मनात मानवजातीच्या कल्याणाचा विचार यावा हे त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते.

चुका कोण करत नाही?
नेहरू किती थोर होते हे सांगण्याची गरज येथे नाही. चुका कोणाकडून होत नाहीत? चीनबरोबरचे युद्ध आपण हरलो व प्रचंड सैनिक हानी झाली. त्या धक्क्याने नेहरूंनी अंथरुण धरले व त्यातच ते मरण पावले. या सगळय़ांचा साक्षीदार तीन मूर्ती परिसर आहे. आज कश्मीरचे युद्ध आपण रोजच हरत आहोत व सैनिक हानीला अंत नाही, पण राज्यकर्त्यांच्या चेहऱयावर हास्य आहे, हा फरक समजून घेतला पाहिजे. नेहरूंनी देशास स्वतःला समर्पित केले. ते व्यापारी नव्हते. वडिलोपार्जित सर्व संपत्तीच त्यांनी देशाला दान केली. ते जन्मजात राजबिंडे होते. पांढऱयाशुभ्र पेहरावावर गुलाबाचे फूल ते लावत असत आणि त्यांचा गुलाबी मोहक चेहरा त्या फुलालाही लाजवीत असे, हे त्यांचे जे वर्णन करून ठेवले आहे ते योग्यच आहे. त्यांनी कविता केल्या, चिंतन केले, पुस्तके लिहिली. मोठा ग्रंथसोहळा निर्माण केला. ते सर्व तीन मूर्ती परिसरात आहे. ते सर्व जाणार काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे, पण एखाद्या व्यक्तीचा खून करण्याने विचार मरत नाही. कागद अगर पुस्तक जाळल्यानेही विचार नाहीसा होत नाही. नेहरूंच्या बाबतीत तेच म्हणावे लागेल. दिल्लीतील अनेक शासकीय निवासस्थाने स्मारके बनली. लालबहाद्दूर शास्त्री, बाबू जगजीवनराम, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींची. तसेच एक स्मारक नेहरूंचे आहे. ते राहायला हवे.

ट्विटर- @rautsanjay61
जीमेल- [email protected]