रोखठोक : निवडणुकांचा खेळ आणि उद्योग, अखेरच्या टप्प्यातील लढाई!

243

rokhthok

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका उद्या संपतील. मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात मतदान होत आहे. निवडणुकांकडे आता खेळ आणि उद्योग म्हणून पाहायला हवे. इतका रोमांच व आर्थिक गुंतवणूक कोणत्याही दुसऱ्या खेळात आणि उद्योगात नसेल. निवडणुकांत ते सर्व काही आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी महाराष्ट्र उद्या सामोरा जात आहे. छत्रपती शिवरायांचा नामोल्लेख प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी केला. पण शिवरायांसारखे राज्य कोणी केले नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रातील 48 जागा देशाचे भवितव्य व देशाचा पंतप्रधान ठरवतील. उत्तर प्रदेशच्या 75 जागांनंतर 48 लोकसभा असलेले महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य. 2014च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने 71 जागा जिंकल्या. हिंदुत्व, राममंदिर व मोदीनामाची प्रचंड लाट उत्तरेत उसळली. आज उत्तरेत मायावती व अखिलेश यादव यांची आघाडी झाली आणि यादव, दलित, मुसलमानांची एकगठ्ठा मते या उमेदवारांना पडणार आहेत. उत्तर प्रदेशातील किमान चाळीस जागांवर भाजप उमेदवार लढतीत नाहीत, असे जाणकारांचे मत. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आता सांगितले, 2014 पेक्षा उत्तर प्रदेशात एक जागा कमी मिळाली तरी राजकारणातून संन्यास घेईन. 2014 साली 71 जागा जिंकल्या. आता 72 जागा जिंकू, अशा ज्या आत्मविश्वासाने श्री. शहा सांगतात तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाची कमाल वाटते. महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकूच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. 45 वी जागा बारामतीची असेल, असे चंद्रकांत पाटील सांगतात आणि बारामतीत पराभूत झालो तर कायमचा राजकारण संन्यास घेईन, असे अजित पवार ठणकावतात. हा आत्मविश्वास आमच्या राजकारण्यांत येतो कोठून, हा प्रश्न अनेकांना पडतो.

व्यक्तीभोवती निवडणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीच ही निवडणूक पुन्हा फिरते आहे. मोदी यांचे व्यक्तिमत्त्व हे तीक्र आहे आणि त्यांच्या ठिकाणी गतिमानता आहे ही गोष्ट त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल. त्यामुळे जसे ते जनतेला आकर्षित करतात त्याचप्रमाणे त्यांना तीव्र स्वरूपाचा विरोध होतो. आज खुद्द भाजपातही त्यांच्या नेतृत्वाला विरोध करणारा एक गट निर्माण झालेला आहे आणि जे त्यांचे नेतृत्व निःशंकपणे मानतात तेसुद्धा पुन्हा त्यांची एकाधिकारशाही येईल या भीतीपासून मुक्त आहेत असे नाही. ही भीती नाहीशी करण्याचा काही मार्ग नरेंद्र मोदींना काढावाच लागेल. मोदी यांच्याकडे राजकीय सामर्थ्य आहे म्हणूनच त्यांना तीव्र विरोध होतो आणि या विरोधामागे त्यांच्या सामर्थ्याची भीती अनेकांना जाणवत असते. नरसिंह राव यांच्या बाबतीत हीच भीती अनेकांना जाणवत होती. भाजपात आडवाणी यांच्या बाबतीत व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत हीच भीती आहे. सत्ता सामर्थ्यवान बनवते. पण हे सामर्थ्य एकाधिकारीशाहीचे गुलाम बनले तर लोकशाही धोक्यात येत असते.

मराठी आणि गुजराती
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन प्रमुख राज्ये उद्याचा पंतप्रधान कोण हे ठरवतील. गुजरात हे 26 खासदारांचे राज्य या दोघांमध्ये उभे आहे. श्री. मोदी हे 21 तारखेस गुजरातला गेले. प्रचाराची सांगता करताना ते म्हणाले, मी इथला भूमिपुत्र. मी तुमचाच आहे. त्यामुळे गुजरातमधील एकही जागा विरोधकांना मिळता कामा नये. शेवटी मी गुजराती आहे व गुजरात राज्याने गुजराती म्हणून आपल्याला मतदान करावे ही मोदी यांची हाक आहे. त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. जगभरातील गुजराती बांधव आज मोदी यांच्या मागे उभे आहेत. मुंबई, महाराष्ट्रातील गुजराती बांधवांची संख्या मोठी आहे. ते सर्व मोदीमय आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना श्री. मुकेश अंबानी यांनी उघड पाठिंबा दिला, पण उद्धव ठाकरे यांनी गुजरातच्या मोदी यांना उघड पाठिंबा दिला. श्री. अंबानी हे गुजरातचे तर देवरा यांचे मूळ राजस्थानात. त्यामुळे गुजराती म्हणून त्यांनी देवरांना पाठिंबा दिला असे म्हणणे चुकीचे ठरेल. अंबानी यांचा पाठिंबा एका व्यक्तीपुरता मर्यादित म्हणता येईल, कारण मुरली देवरा आणि धीरूभाई अंबानी यांचे जवळचे संबंध होते. मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांची मते मिलिंद देवरा यांना पडतील, पण इतर सगळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यामागे उभे राहतील असे एकंदरीत वातावरण आहे. प्रांतीय नेत्यांना पंतप्रधान व्हावे असे वाटते, कारण राष्ट्रीय पक्षांची घसरण सुरू आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनाही ते वेध लागले. तेलंगणाच्या सर्व 16 जागा जिंकून दिल्लीचे नेतृत्व करावे असा त्यांच्या प्रचाराचा रोख आहे. माणूस कितीही सर्वोच्च पदावर गेला तरी तो कूळ आणि मूळ विसरत नाही हे या निवडणुकीने दाखवून दिले.

आचारसंहितेचे काय?
महाराष्ट्राने स्वतःची अस्मिता जपून नेहमी राष्ट्रीय प्रवाहाचा मार्ग स्वीकारला. मुंबईच्या लढ्यातून ही अस्मिता निर्माण झाली. त्या मुंबईतील सहा जागांवर कोणते निर्णय लागतील हे पाहायला हवे. मुंबई म्हटली की, ठाणे व कोकण येतेच. पुन्हा मुंबईबरोबर मावळ व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातदेखील निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका चार टप्प्यांत का होत आहेत, हा प्रश्न आहे. गुजरातमध्ये सर्व निवडणुका एकाच दिवशी झाल्या. महाराष्ट्र व गुजरातच्या निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला हरकत नव्हती. कारण दोन्ही राज्यांत शांतता आहे. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. तरीही महाराष्ट्राचे मतदान चार टप्प्यांत रेंगाळत ठेवले याचे आश्चर्य वाटते. महिनोन् महिने निवडणुका चालतात व या काळात प्रशासन ठप्प होते. महाराष्ट्रात चारा छावण्यांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न लोकांना नको असलेल्या आचारसंहितेत अडकून पडतात व जनतेचे सेवक त्यावर काहीच बोलत नाहीत. शिर्डीतील सभेत श्री. उद्धव ठाकरे जोरकसपणे म्हणाले, माणुसकी नसलेली आचारसंहिता मी मानायला तयार नाही. पुन्हा ही आचारसंहिता खरेच निःपक्षपाती आहे काय याचे उत्तर कुणीच देणार नाही. निवडणूक काळात विरोधकांची मानगूट पकडण्यासाठी आचारसंहितेचा फास जरा जास्तच आवळला जातो. हे या निवडणुकीतही दिसले. जात आणि धर्माचा वापर करून निवडणुका लढवणाऱयांवर कायद्याने बंदी आणली पाहिजे. जे कामाने कमजोर आहेत तेच जातीचा वापर करून निवडणुका लढतात व अशा लोकांना चाबकाने फोडून काढले पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले ते योग्य आहे. पंतप्रधानांपासून ते मायावतींपर्यंत सगळेच स्वतःची जात काढतात व मते मागतात. नरेंद्र मोदी यांना 2014 मध्ये संपूर्ण देशाने मतदान केले तेव्हाही त्यांची जात कुणी पाहिली नव्हती आणि आताही त्यांच्या जातीकडे न पाहता त्यांचे कर्तृत्वच त्यांना विजय मिळवून देणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कायस्थ ही जात महाराष्ट्रात अर्धा टक्काही नाही, तरीही संपूर्ण मराठी समाज त्यांच्या मागे वर्षानुवर्षे उभा राहिला. तरीही निवडणुकीत उमेदवाराची जात अनेकदा महत्त्वाची ठरते. अंतराळात यान सोडून जगात महाशक्ती बनू पाहणाऱया देशाला हे शोभत नाही. राजकारणातून एकमेकांना उखडण्याची भाषा जे करतात त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून आधी जात उखडावी. कश्मीरातून 370 कलम हटवायला पाहिजे तसे जातीचे राजकारणही उखडायला हवे. ही मागणी एकही नेता करीत नाही. फक्त बाळासाहेब ठाकरे हेच सरकारी कागदपत्रांवरून जात काढावी आणि जातीच्या आधारावर निवडणूक लढवू नये ही मागणी करीत राहिले. ज्या अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आपण पाहत आहोत तो हिंदुस्थान जाती आणि पोटजातींमध्ये फाटला आहे.

मराठी मते निर्णायक
महाराष्ट्राची राजधानी मुंबईचे चित्र काय असेल ते पाहायला हवे. फक्त मराठी मतांवर मुंबईत निवडणुका जिंकता येतील का, हा प्रश्न आहे. पण मराठी मतदारांना टाळून कुणालाही पुढे जाता येणार नाही हे सत्य आहे. ईशान्य मुंबईचे भवितव्य हे सर्वार्थाने मराठी मतदारांच्या हाती आहे. मराठी मतदारांची नाराजी असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांची उमेदवारी कापली. या लोकसभा मतदारसंघातील विक्रोळी, भांडुप, घाटकोपर येथील मराठी मते निर्णायक ठरतात. दादर, नायगाव, चेंबूर, धारावी हे विभाग येणाऱया दक्षिण-मध्य मुंबईतही मराठीचा प्रभाव आहे. गेल्या पन्नास वर्षांत येथे मराठी उमेदवारच जिंकत आला. बाजूच्या दक्षिण मुंबईतील ‘गिरगाव’ हा मराठी माणसांचा बालेकिल्ला आता संमिश्र झाला आहे. कुलाबा ते परळ असा हा मतदारसंघ. त्यात भायखळा, भेंडीबाजार येतो आणि शेवटी परळ, लालबाग, शिवडी हे मराठी मतांचे बालेकिल्ले आहेत. मध्ये उच्चभूंचा पेडर रोड येतो. तो कुणाचाही नाही. त्यातले मतदानाला उतरतात किती, हा प्रश्न कायम आहे. तरीही शिवसेनेचे अरविंद सावंत येथे 2014 साली विजयी झाले. गुजराती व मराठी मतांचे गणित येथे हिंदू म्हणून जुळले. उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबईत ‘मराठी मुलगी’ म्हणून लढत आहेत. उर्मिलाच्या ‘मी मराठी’मुळे सगळय़ाच उमेदवारांना स्ट्रटेजी बदलावी लागली. प्रिया दत्त विरुद्ध पूनम महाजन, गजानन कीर्तिकर विरुद्ध संजय निरुपम या लढतीतही शेवटी मराठी मतांची बेरीज गुजराती आणि हिंदी भाषिकांबरोबर होईल. नरेंद्र मोदी यांची हवा आजही आहे. त्या हवेत उद्धव ठाकरे यांचा प्रवाह सामील झाला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची ‘युती’ म्हणून मोठय़ा ताकदीची लाट निर्माण झाली. त्या लाटेचे पाणी विरोधकांच्या नाकातोंडात जाईल अशी स्थिती आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुका उद्या संपतील, पण मे महिन्यात देशातील इतर राज्यांत निवडणूक सुरूच राहील. निवडणुकांकडे आता खेळ आणि उद्योग म्हणूनच पाहायला हवे. त्यात क्रिकेट, कबड्डीप्रमाणे थरार आहे, डावपेच आहेत, रहस्य आहे व उद्योग, व्यापार म्हणून मोठी गुंतवणूक आहे. पण या उद्योगात जनता ‘शेअर होल्डर’ म्हणजे भागधारक आहे काय?

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या