रोखठोकः मुलुंडच्या नाट्य संमेलनातही मराठीचे मारेकरी; कला, संस्कृतीचे सरकारीकरण


rokhthokमुलुंड येथे अखिल भारतीय नाटय संमेलन साजरे होत आहे. राजकारण्यांची रेलचेल तेथे आहे, पण ज्यांनी एक भाषा म्हणून मराठीला सतत विरोध केला ते भाजपचे खासदार या नाटय संमेलन स्वागत समितीचे उपाध्यक्ष बनले व मराठीची पालखी ते वाहतील. राजकारण्यांचा वावर रसिक म्हणून असावा. सरकारी पैसे देणारे अशा संमेलनांचे मालक होत आहेत.

मराठीचे काय होणार? असा घोर आपल्या सगळयांनाच लागून राहिला आहे. महाराष्ट्रात मराठीची लक्तरे निघत आहेत अशी ओरड होत असते. पण ज्या उत्साहात मराठी नाट्य संमेलने आणि साहित्य संमेलने साजरी होतात ते पाहता मराठीस घरघर लागली आहे असे म्हणता येणार नाही. ९८वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मुंबईच्या मुलुंड येथे होत आहे व त्याची जोरदार तयारी सुरू आहे. साहित्य आणि नाटय संमेलनासाठी राज्याचे सरकार साधारण पन्नास लाख देते व त्याची किंमत म्हणून सत्ताधारी पक्षाचे लोक अशा संमेलनाच्या व्यासपीठांचा ताबा घेतात. रंगकर्मींना व त्यांच्या कार्यास झाकोळून टाकायची स्पर्धाच अशा वेळी लागते. कारण आम्ही पैसे दिले आहेत या तोऱ्यात मग ही संमेलने पार पडतात व ती राजकीय संमेलने ठरतात. मुलुंडच्या नाट्य संमेलनात हे चित्र पुन्हा दिसले. अशा संमेलनास राजकीय व्यक्तींनी रसिक म्हणून यावे असे मानायला काहीजण तयार नाहीत. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राज्यकर्ते, राजकारणी नकोत अशी भूमिका १९७५ च्या सुमारास कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी दुर्गा भागवत यांनी घेतली होती. त्यावर बरीच चर्चा आणि वादंगही झाले. मात्र त्यावर यशवंतराव चव्हाण यांनी आपण रसिक म्हणून साहित्य संमेलनाला येऊ अशी भूमिका घेत तेथे हजेरी लावली होती आणि ते श्रोत्यांत बसले होते. २००८मध्ये सांगली येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आपण व्यासपीठावर जाणार नाही, प्रेक्षकांतच बसू अशी भूमिका संमेलनाआधीच बोलून दाखवली होती आणि प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी तेदेखील प्रेक्षकांतच बसले होते. दुर्गा भागवत यांनी त्या वेळी याच मुद्दयावरून एक समांतर साहित्य संमेलन भरवले होते. मात्र ते पहिल्याच वर्षी कोसळले. कारण अशी संमेलने यशस्वी करण्यासाठी जी साधनसामग्री लागते ती शेवटी सत्ताधारी, उद्योगपती व सहकारी साखर कारखानदारांकडेच असते व अशी सांस्कृतिक संमेलने त्यांच्या सहकार्यानेच यशस्वी होतात.

कीर्ती शिलेदार
मुलुंडच्या ९८व्या नाट्य संमेलनाचे वैशिष्ट्य असे की, संगीत रंगभूमीच्या शिलेदार कीर्ती शिलेदार या नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यामुळे हे संमेलन एका शिखरावर आधीच पोहोचले आहे. साहजिकच या संमेलनात सत्ताधारी व राजकारण्यांचा कमीत कमी वावर असायला हवा होता, पण तसे घडले नाही. सरकार म्हणून या सोहळयाला बगलेत मारण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले. विनोद तावडे हे सांस्कृतिक मंत्री म्हणून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष बनले ते एकवेळ समजून घेता येईल, पण भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक नाटय संमेलनाचे पदाधिकारी रातोरात बनले. त्यात ‘मराठी’च्या विरोधात सतत काम करणारे किरीट सोमय्यादेखील आहेत. शिशिर शिंदे हे राजकारणात कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात ते बाजूला ठेवा. शिंदे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो महत्त्वाचा. ते म्हणतात, ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे नाटय संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, पण भाजपचे मराठीद्वेष्टे खासदार किरीट सोमय्या हे नाटय संमेलन स्वागत समितीचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मराठी हा विषय सक्तीचा केला तेव्हा मराठीविरोधात न्यायालयात धाव घेणारे हेच किरीट सोमय्या होते. असे किरीट सोमय्या हे मराठी नाटय संमेलनाची पालखी राजकीय मतलबासाठी उचलतात हे निषेधार्ह आहे. अशा संमेलनात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे लोक वावरत होते तेव्हा त्यांना प्रचंड विरोध झाला, पण यशवंतरावांपासून ते शरदराव पवार, विलासराव देशमुखांपर्यंत सर्व लोक निदान रसिक तरी होते. स्वतः बाळासाहेब ठाकरे अशा संमेलनास गेले ते एक कलावंत व रसिक म्हणून. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे स्वतः कलाकार आहेत. पण इतर राजकीय घुसखोरांचे काय? येथे प्रमुख आक्षेप आहे तो किरीट सोमय्या यांच्या मराठीद्वेष्ट्या भूमिकेस.

राजकारण असे घुसले
मराठी नाटय परिषदेची निवडणूक दोन महिन्यांपूर्वी पार पडली. तेथे राजकारण्यांप्रमाणे सरळ दोन तट पडले. एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक लढावी तशी ही निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच नाटय परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे दर्शन घेतले. त्यामुळे राजकारण्यांना नाटकवालेच रंगमंचावर खेचतात हे दिसून आले. तरीही मंत्र्यांना कुठे बोलवावे व कुठे बोलावू नये याची एक यादी तरी जाहीर करा, असे कुणी म्हटले तर चूक ठरू नये इतका वैचारिक गोंधळ या विषयाबाबत उडाला आहे. कुठेही मंत्र्यांना बोलविण्यास हरकत नाही असे मानणारा साहित्यिक व कलावंतांचा, पत्रकारांचा एक वर्ग आहे आणि तोच वर्ग ही समस्या निर्माण करण्यास कारणीभूत आहे. मंत्र्यांशिवाय घरची सत्यनारायणाची पूजासुद्धा होत नाही, असा सत्तापूजकांचा फार मोठा वर्ग सर्व क्षेत्रांत निर्माण झाल्याने मंत्रीही अडचणीत येत असतात. मंत्र्यांच्या ओळखीपाळखी, स्नेहसंबंध हवे असलेले लोक त्यांना बोलावतात व त्याचा अतिरेक झाला की वाद सुरू होतो. आपल्या जीवनाच्या बहुतेक सर्व व्यवहारांचे सरकारीकरण झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आज आपल्याला सरकारच्या तोंडाकडे पाहावे लागते. पुन्हा सरकार नावाच्या या संस्थेकडे इतके पैसे आहेत, त्याचा इतका दुरुपयोग ते करीत असतात की चार चांगल्या कामांना ते मिळावेत असे वाटू लागते. त्यातून हे द्वंद्व निर्माण होते आणि म्हणून एक निश्चित धोरण या क्षेत्रातील सर्वांनी ठरवावयास हवे. मंत्र्यांच्या उपस्थितीचा अतिरेक व मंत्र्यांच्या विरोधाचा अतिरेक या दोन्ही अतिरेकांतून बाहेर येण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मंत्री हे आमचे शत्रू नाहीत, परंतु तत्त्वांची ते पायमल्ली करतात तेव्हा त्यांचे रावण होतात. ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाचे लोक नाटय आणि साहित्य संमेलनाचे ‘मंच’ व्यापून टाकतात. मुलुंडच्या नाटय संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे आहेत. नाटयक्षेत्रातलाच एखादा स्वागताध्यक्ष का नसावा?

‘हॅम्लेट’
मराठी माणूस नाटकवेडा आहे व रंगमंचाच्या कलाकारांना आजही मोठा मान आहे. एक उद्योग म्हणूनही ‘नाटक’ स्थिरावले आहे. कारण चांगल्या नाटकांना आजही प्रेक्षक गर्दी करतात. ‘झी’ वाहिनीने ‘हॅम्लेट’ भव्य स्वरूपात रंगमंचावर आणले. त्यांची आर्थिक ताकद मोठी असल्याने अनेक नाटयगृहांच्या महत्त्वाच्या तारखा त्यांनी मिळवल्या. नाटकांच्या तिकिटांचे दर वाढवले. तरीही लोकांनी ते सर्व शो हाऊसफुल केले. त्यावर इतर नाट्य व्यावसायिकांनी आक्षेप घेतले. हा मगरीचा जबडा आहे व लहान नाटय व्यावसायिकांना तो गिळून टाकेल ही त्यांची भीती खरी, पण म्हणून ‘हॅम्लेट’सारखे भव्य प्रयोग होऊ नयेत का? ते व्हायला हवेत. आगरकरांसारख्या समाजसुधारकाने ‘हॅम्लेट’ या जगप्रसिद्ध नाटकाचे रूपांतर तेव्हा केले होते. शेक्सपियरची अशी अनेक नाटके १९०० ते १९२० या काळात मराठी रंगभूमीवर आली. ते नाटकप्रेम आजही कायम आहे.

प्रश्न सोडवा!
नाटय व्यवसायाचे कोणते प्रश्न सरकारने सोडवले? संमेलनासाठी वार्षिक पन्नास लाख देणे ही राज्याची सांस्कृतिक सेवा नाही. रंगभूमीच्या विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे सोयिस्कर नाटयमंदिरांची उणीव. मुंबईत रंगभवन हे एक खुले प्रेक्षागृह सरकारी. बाकी सर्व रंगमंदिरे एकतर खासगी संस्थांची किंवा महानगरपालिकांची. मुंबई-ठाण्यातील महानगरपालिकांनी हे काम केले. नाशिक, पुण्यातही आहे. पण सरकार म्हणून रंगमंचाला मदत नाही. मुख्यमंत्री व मंत्री फक्त येतात व भाषणे करून जातात. मुलुंडच्या संमेलनात तसे घडू नये. मराठीचा द्वेष करणारे, मराठीचे मारेकरी नाटय संमेलनात मिरवताना दिसतील तेव्हा बालगंधर्वांपासून ते बाळ कोल्हटकरांपर्यंत आणि वि. वा. शिरवाडकरांपासून ते वसंत कानेटकरांपर्यंत सगळयांचेच आत्मे अस्वस्थ होतील. राम गणेश गडकरी यांचे पुतळे फोडणारे मोकाट आहेत. नाटय संमेलनाच्या व्यासपीठावर राम गणेशांचा पुतळा ठेवून त्यांना मानवंदना द्या व मगच नटवरास नमन करा. मराठीचे मारेकरी आपल्याच घरात आहेत. मुलुंडच्या नाटय संमेलनातही ते असावेत.

अडथळे काय करणार?
नाटक आणि राजकारण यांचे वेड मराठी माणसाच्या रक्तातच आहे. त्यामुळे राजकारणात नाटय व नाटय व्यवसायात राजकारण रंगलेले दिसते. लोकमान्य टिळक मंडालेची शिक्षा भोगून सुटले त्यावेळी त्यांनी देशातल्या परिस्थितीविषयी जे काही प्रश्न विचारले त्यातच किर्लोस्कर नाटक मंडळींचं कसं काय चाललंय? हाही प्रश्न विचारला होता असं सांगतात. आजही मराठी रंगमंच, मराठी नाटक कीर्तिवंत आहे. नाटकाच्या आणि वर्तमानपत्रांच्या वेडापायी मुंबई-पुण्याचे मराठीपण टिकून आहे. नवे लेखक, नव्या संहिता, नवे नट निर्माण होत आहेत, पण जुन्या नाटकांच्या प्रयोगांनाही तितकीच गर्दी होत आहे. नाटकाचा किडा मराठी माणसांच्या रक्तात शिरलेला आहे व तो बाहेर काढता येत नाही. चॅप्लिनच्या ‘लाइम लाइट’ चित्रपटात एक प्रसंग आहे. रंगभूमीच्या प्रकाशझोताबाहेर फेकलेला तो नट भुकेकंगाल असतो. त्याचे गतवैभव ओसरते, पण पुन्हा त्या रंगमंचावर येण्याची त्याची धडपड चालूच आहे. त्याची मैत्रीण त्याला म्हणते, ‘अरे, ज्या रंगभूमीने तुला झिडकारले, जिचा इतका तिटकारा वाटतोय तुला तिथे पुन्हा जायची धडपड कशाला करतोस?’ त्यावर चॅप्लिनचे उत्तर असे होते – ‘Yes! I hate the sight of blood, but it is in my veins!’ हे रक्त गप्प बसू देत नाही. म्हणूनच कर्जाचा डोंगर उभा करून निर्माते ‘नाटक’ करीत आहेत. कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ नाटक उभे करीत आहेत. कुणी मदत करो वा न करो. मराठीद्वेष्टयांनी अडथळे निर्माण केले तरी नाटक सुरूच असते मित्रांनो! ते मुलुंडच्या नाट्य संमेलनातही दिसेल.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]