भजन करणाऱ्यांचे दिवस! बोलणाऱ्या, लिहिणाऱ्यांचे दिवस फिरले!

rokhthokसरकारविरोधात एक व्यंगचित्र काढले म्हणून तामीळनाडूतील व्यंगचित्रकार तुरुंगाच्या वाटेवर आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवायलाच हवा, पण तुमच्या राजवटीत लोक उपाशी मरत असतील, रस्त्यावर स्वतःला जाळून घेत असतील तर संताप व्यक्त करणे हा गुन्हा ठरतो काय? स्पष्ट बोलणाऱ्यांचे तोंड बंद केले जाते. भजन करणाऱ्यांचे दिवस आज आहेत, पण ही एकाधिकारशाही देशाला घातक आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात परखड आणि सत्य बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जात आहे, असे आरोप सरकारविरोधातील लोक करीत आहेत. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय व हे स्वातंत्र्य नक्की कुणासाठी, याचा विचार न करता काही लोक स्वातंत्र्याचा स्वैराचार करीत आहेत, तर सरकारातील काही लोक हवे तसे बोलण्याचे आणि वागण्याचे स्वातंत्र्य उपभोगीत आहेत. ‘हत्ती व सात आंधळे’ या कथेप्रमाणे आज आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य झाले आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्ध एक व्यंगचित्र काढले म्हणून तामीळनाडूतील एका चित्रकारास अटक करण्यात आली आहे. गरिबी व कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून तिरुनेवली येथील एका कुटुंबाने स्वतःस जाळून घेतले. पती-पत्नी व दोन मुलांनी सरळ स्वतःचे जीवन संपविले. त्यांच्या आक्रोशाच्या ज्वालांनी तामीळनाडूचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले व राज्यकर्ते हादरले. तामीळनाडूत भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही. तेथे अण्णा द्रमुकचे सरकार आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले. वृत्तपत्रांनी सरकारला झोडपून काढले. पण बाला नावाच्या एका व्यंगचित्रकाराने या घटनेवर एक व्यंगचित्र रेखाटताच त्या चित्रकाराविरोधात गुन्हा दाखल झाला व अटक झाली. चित्रकार बालाने सांगितले, ‘‘माझा संताप अनावर झाला. त्या संतापाच्या भरात मी ते व्यंगचित्र रेखाटले.’’ बाला यांचा संताप महत्त्वाचा. एक संपूर्ण कुटुंब स्वतःस जाळून घेते, गरिबी व कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या करते याची लाज कोणत्याही सरकारला वाटायला हवी, पण महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक कुटुंबांनी जीवन संपवले, कर्जमुक्तीच्या घोषणेचेही फोलपण समोर आले. या फसवणुकीविरुद्ध बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा खटाटोप सुरू होतो तेव्हा हिटलरचे किंवा रावणाचे राज्य बरे होते काय, असा प्रश्न पडतो. बालाचे व्यंगचित्र अभिरुचीहीन व कमरेखाली वार करणारे होते, असे तिरुनेवलीच्या जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. शेवटी अभिरुचीहीन म्हणजे काय? व्यंगचित्रात मुख्यमंत्री व नोकरशहा ‘लुंगी’ सुटलेल्या अवस्थेत दाखवले आहेत व समोर एक कुटुंब जळते आहे. मुख्यमंत्र्यांचा व पंतप्रधानांचा सन्मान राखायलाच हवा, पण सरकारची लुंगी सुटली हे अभिरुचीहीन, की एक कुटुंब जाळून घेत आहे हे अभिरुचीहीन?

चांगली लोकशाही
सरकारला टीका आणि व्यंग सहन न होणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. टीका करणाऱ्यांवर खटले दाखल करणे, तुरुंगात टाकणे, धमक्या देणे किंवा मारून टाकणे हे तालिबानी कृत्य आहे. बोल लोकशाहीचे व ढोल तालिबानीचे असे वर्तन सगळ्यांचेच चालले आहे. इंदिरा गांधी यांनी फक्त १९ महिन्यांसाठी आणीबाणी लादली व प्रसारमाध्यमांवर बंधने आणली यावर त्यांच्या हत्येनंतर ३३ वर्षांनीही टीका होत आहे. पण सरळ आणीबाणीशी लढता येते, छुप्या आणीबाणीचा अत्याचार असह्य असतो. सध्या नेमके तेच सुरू आहे काय? तामीळनाडूतील व्यंगचित्रकारास अटक म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. सरकारविरोधी ‘टिपे’चा सूर लावणाऱ्या पत्रकारांना, संपादकांना, वृत्तवाहिन्यांतील प्रमुखांना उडवले जात आहे. एक तर सर्व वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्या अप्रत्यक्षपणे सरकारी मालकीच्या झाल्या आहेत किंवा सीबीआय, ‘ईडी’सारख्या संस्थांचा वापर करून प्रसिद्धीमाध्यमांना गुडघे टेकायला लावले जात आहे. सोशल मीडियावर सरकारविरोधी बोलणाऱ्यांना व लिहिणाऱ्यांना पोलीस नोटिसा बजावतात व गुन्हे दाखल करतात. हे महाराष्ट्रासारख्या राज्यातही घडू लागले असेल तर हिंदुस्थानी स्वातंत्र्याची घटना लिहिणाऱ्यां डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. २०२२ पर्यंत हिंदुस्थानातील गरिबी आणि दहशतवाद कायमचा नष्ट होईल, असे आता ‘निती’ आयोगाने स्पष्ट केले आहे. गरिबीला कंटाळून माणसे स्वतःस जाळून घेऊ लागली तर गरीब माणूस सहज नष्ट होईल. गेल्या ७० वर्षांत आपण हेच पाहत आहोत. प्रश्न राहिला दहशतवादाचा. धर्मांध अतिरेक्यांचा दहशतवाद शस्त्रांच्या बळावर मोडून काढता येईल, पण राज्यकर्त्यांच्या रक्तातला व डोक्यातला दहशतवाद कसा संपेल? विरोधात बोलणाऱ्यांना, चित्र रेखाटणाऱ्यांना, लिहिणाऱ्यांना मोडून काढण्याचा दहशतवाद सरकारी यंत्रणा वापरून सुरूच राहील.

स्वातंत्र्य कोणाचे?
राहुल गांधी यांना ‘पप्पू’ बोलण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे, पण थापा मारणाऱ्या राज्यकर्त्यांना ‘फेकू’ बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. मनमोहन सिंग यांना ‘मुका बाहुला’ म्हणून खिल्ली उडविण्याचे स्वातंत्र्य आहे, पण मोदींना ‘बोलघेवडे’ बोलण्याचे स्वातंत्र्य हा गुन्हा ठरतो. श्री. उद्धव ठाकरे यांना वांद्रय़ाचे बॉस असे उद्दामपणे बोलण्याचे स्वातंत्र्य काही चिरकूट मंडळींना आहे; पण काय हो, तुमच्या त्या अमित शहांच्या चिरंजीवांच्या प्रकरणावर जरा बोला, असे सांगण्याचे स्वातंत्र्य नाही. रॉबर्ट वढेरा चोर आहेत, पण राज्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या लुटीची अनेक प्रकरणे ‘चोरी’त बसत नाहीत. काँग्रेसमधील सर्व नेते भ्रष्ट, पण तेच भ्रष्ट भाजपात येतात तेव्हा त्यांचे शुद्धीकरण झालेच आहे असे समजून सगळय़ांनी आपल्या जिभा कापून सत्ताधाऱ्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. हेच स्वातंत्र्य सध्या आपण सगळेच उपभोगीत आहोत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे व असहिष्णुता वाढली आहे असे बोलणारे पापी व काँग्रेसधार्जिणे आहेत असा अपप्रचार सर्रास केला जातो. देशात आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी व त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत असे जे बोलतात त्यांची डोकी ठिकाणावर आहेत काय? असे प्रश्नही विचारले जातात. तामीळनाडूत एक व्यंगचित्रकार बाला तुरुंगात गेला. असे असंख्य ‘बाला’ तुरुंगाच्या वाटेवर आहेत. राज्यकर्ते जनतेच्या संतापाला घाबरू लागतात तेव्हा स्वातंत्र्याच्या गळय़ाभोवतीचा फास आवळू लागतो. संताप व टीकेला सामोरे जाणे ही लोकशाही. सत्तेची खुर्ची सामान्यांना हुकूमशहा बनवते. हिटलरही व्यंगचित्रांना घाबरत होता. इकडे तरी वेगळे काय घडत आहे!

लढा उभा करा
श्री. नरेंद्र मोदी हे लोकशाही व स्वातंत्र्य याविषयी नेहमीच बोलत असतात. संपादकीय स्वातंत्र्याचा उपयोग जनतेच्या हितासाठी करायला हवा. वास्तवाची मोडतोड म्हणजे लिखाणस्वातंत्र्य नाही, असे श्री. मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले. मनमोहन सिंग गुजरातला काँग्रेसच्या प्रचारासाठी गेले. त्यांचे भाषण सुरू होताच ‘केबल नेटवर्क’ बंद पडले (?). कपिल सिब्बल पत्रकार परिषद घेत असतानाही तेच झाले. नोटाबंदी, जीएसटी व सरकारच्या कामकाजावर कुणी बोलायचे नाही. वृत्तवाहिन्यांचे ‘अँकर्स’ दबावाखाली बोलतात व त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव सहज दिसतो. निखिल वागळे यांच्याशी माझे मतभेद असू शकतात. त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे व त्यामुळे त्यांच्यावर हल्लेही झाले. तरीही त्यांना जे बोलायचे आहे ते ओरडून सांगण्याचा अधिकार व स्वातंत्र्य मारता येणार नाही. ते जे बोलतात त्याबद्दल लोकांच्या संतापाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असेल तर ते सरकारविरुद्ध बोलतात म्हणून त्यांची आजन्म मुस्कटदाबी करणे हे चांगले लक्षण नाही. ‘झी २४ तास’चे संपादक उदय निरगुडकर यांना तडकाफडकी का जावे लागले हे एक रहस्यच आहे. देशात आज अशा अनेक रहस्यमय घटना रोज घडू लागल्या आहेत. विरोधी बोलणारे व सत्य सांगणारे लोक चीन व रशियात गायब होत असत. हिंदुस्थानात अद्यापि तसे घडताना दिसत नाही. श्री. शरद पवार यांनी आता असे चिंतन केले आहे की, केंद्रात एकाधिकारशाही सुरू आहे. मग त्या एकाधिकारशाहीविरोधात लढा उभा करा. ते त्यांना जमणार आहे काय?

@rautsanjay61
[email protected]

  • D.P.Godbole,

    श्री.बाळासाहेब ह्यांच्या निधनानंतर झालेल्या बंद विरोधात ज्या कोणी त्याविरुद्ध मत प्रदर्शन केले त्यावेळी कोणी किती तारे तोडले होते?