रोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय?

मल्ल्या आठवड्याला 90 हजार रुपयांची फळे, भाज्या आणि इतर साहित्य खरेदी करतो

rokhthokविजय मल्ल्या हा ‘बुडीत कर्ज’वाल्यांचा पोस्टर बॉय झाला आहे. लंडनला पळून जाण्याआधी मल्ल्या अर्थमंत्री जेटलींना भेटला. त्यावरून काँग्रेसने आदळआपट सुरू केली, पण कर्जफेडीसाठी तडजोडीचा मसुदा घेऊन आलेल्या उद्योगपतीस भेटणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? उद्योगासाठी इथले वातावरण पोषक नाही. उद्योग करणे हा गुन्हा व उद्योगपती हे चोरच हा अपप्रचार कसा थांबेल?

हिंदुस्थानच्या राजकारणात कधी कोणती भुताटकी निर्माण होईल ते सांगता येत नाही. सध्या विजय मल्ल्याचे भूत सगळय़ांच्याच मानगुटीवर बसले आहे. हे भूत हिंदुस्थानातून पळून गेले आहे व लंडनमधील त्याच्या आलिशान महालात सुखाने जगते आहे, पण तरीही हिंदुस्थानातील अनेक प्रमुख लोकांच्या माना ते लंडन येथून आवळत आहे. विजय मल्ल्याच्या नावाचा इतका धसका घ्यायचे कारण काय? विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बुडाली. त्यामुळे त्याला कर्ज दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकाही कोसळल्या. या सगळ्या बँकांचे पैसे न चुकवता विजय मल्ल्या सरकारच्या नाकासमोरून पळून गेला. त्याला विमानतळावर कोणी रोखले नाही किंवा हटकले नाही. मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात असे सांगितले की, ‘‘देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटलो व त्यांच्या पुढे बँकांच्या कर्जफेडीबाबत तडजोडीचा मसुदा ठेवला.’’ मल्ल्याने खोटे सांगितले की तो खरे बोलला हे बाजूला ठेवा, पण देशाच्या अर्थमंत्र्यांना एक उद्योगपती कर्ज फेडण्याबाबतचा मसुदा घेऊन भेटला असेल तर इतका गहजब माजवायचे कारण काय? आणि देशाच्या अर्थमंत्र्यांनाही इतका घाम फुटायचे कारण काय? विजय मल्ल्याचे प्रकरण आता विचित्र तितकेच रोचक बनले आहे. इतिहासात असे अनेक वाद आहेत. म्हणजे अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला की अफझलखान स्वतःच मेला. तसाच वाद विजय मल्ल्या पळून गेला की त्यास पळून जाऊ दिले यावर सुरू आहे.

उद्योग कसा जगेल?
देशातील वातावरण उद्योगधंद्यांसाठी पोषक राहिलेले नाही. मुकेश अंबानी, अदानींपासून सगळ्यांच्याच उद्योगांवर बँकांची हजारो कोटींची कर्जे आहेत. धंद्यात गमावले ते अनिल अंबानींसारख्या उद्योगपतीने राफेल विमानाच्या सौद्यात कमावले असा आरोप सुरू आहे. त्यावरून सरकार कोंडीत सापडले, पण अंबानीच्या राफेल सौद्याचे समर्थन करण्यासाठी सरकार व भाजपतर्फे मंत्री आणि प्रवक्त्यांची मोठी फौज उभी राहिली व राफेलच्या संशयास्पद सौद्याचे समर्थन करताना कुणालाही घाम फुटला नाही. म्हणजे जे उद्योगपती भाजपास हवे आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहायचे व इतरांच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यायची. हे औद्योगिक धोरण नसून उद्योगाचे मरण आहे. बुडणारा उद्योग जगवायचा की संपूर्ण खतम करायचा हे एकदा ठरवायला हवे. दक्षिण आफ्रिकेतील हिंदुस्थानी वंशाचे एक मोठे उद्योगपती भेटले. त्यांची संपत्ती अंबानींच्या बरोबरीची आहे व त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे एक रुपयाचेही कर्ज नाही. बंद पडलेले, तोट्यात चालणारे उद्योग विकत घ्यायचे, ते दुरुस्त करायचे, मनुष्यबळ विकास (HRD) व्यवस्थापन सांभाळायचे, ते उद्योग पुन्हा उभे करायचे हा त्यांचा धंदा आहे व सरकार त्यांना संपूर्ण मदत करते. आपल्याकडे हे का घडत नाही? उद्योग बंद पाडून त्या जागांचे स्मशान करायचे, मग लिलाव करायचे व त्या बंद पडलेल्या उद्योगांवर इमारती उभ्या करायच्या हे आपले धोरण झाले. म्हणजे उद्योग व कामगार कायमचा मेला. गिरणी व्यवसायाचे तेच झाले. मुंबईतील इंजिनीअरिंग, फार्मा उद्योग बंद पडले. तिथे नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी बंद पडल्या आहेत व त्यांच्या जमिनीवर सगळ्यांचाच डोळा आहे. म्हणजे या सर्व जमिनी बिल्डरांच्याच घशात जाणार. उद्योगांच्या जमिनीवर घरबांधणी हा कायद्याने गुन्हा ठरत नाही तोपर्यंत हा खेळ संपणार नाही.

सरकारचे अपयश
विजय मल्ल्याचे मूळ कर्ज सहा हजार कोटींचे होते व त्याची परतफेड करायला तो तयार होता. थकलेल्या व्याजाबाबत त्याला तडजोड करायची होती. हिंदुस्थानात राहून त्याला या कर्जफेडीची संधी मिळायला हवी होती. किंगफिशर एअरलाइन्सचे दहा हजार कर्मचारी होते. एअर इंडियापेक्षा हा आकडा दुप्पट आहे. 80 विमानतळांवर किंगफिशरचे ‘कनेक्ट’ होते. जगातही त्याची उड्डाणे सुरू झाली होती. जी.आर. गोपीनाथ हे नागरी हवाई क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व. एअर डेक्कन ही विमान कंपनी त्यांनी सुरू केली. पुढे ती मल्ल्याच्या यू.बी. ग्रुपने विकत घेतली. मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स कंपनी सरकारला वाचवता आली असती असे त्यांचे म्हणणे आहे. किंगफिशर एअर लाइन्सच्या संचालक मंडळावर अत्यंत अनुभवी आणि कार्यक्षम लोक होते. देशाचे माजी अर्थ सचिव आणि ‘सेबी’च्या माजी चेअरमनचा त्यात समावेश होता. किंगफिशर एअरलाइन्स ही Publicly listed कंपनी होती. इतर सर्व हिंदुस्थानी कंपन्यांप्रमाणे मल्ल्या कुटुंबाचे या कंपनीवर पूर्ण नियंत्रण होते. खासगी कंपनीप्रमाणेच ती चालवली गेली. संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक होते, पण कायदेशीर बाबी, कंपनी नियमांचे पालन करण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. कंपनीच्या छोटय़ा भागधारकांचे हक्क जपण्यासाठी ते काहीच करीत नसतात हे अनेक प्रकरणांत सिद्ध झाले आहे. किंगफिशर एअरलाइन्स प्रकरणातही वेगळे घडले नाही, पण किंगफिशर कोसळल्यावरही राजकीय आणि व्यक्तिगत धोपटेगिरी करण्यापेक्षा सरकार व बँकांनी कंपनीची मालमत्ता, दहा हजार लोकांच्या नोकऱया वाचविण्यासाठी काय केले? असा श्री. गोपीनाथ यांचा प्रश्न आहे. अत्यंत दुर्गम भागात (Remote areas) हवाई उड्डाणे भरण्यासाठी सरकारने आता ‘उडान’ योजना सुरू केली. त्यात मोठी गुंतवणूक केली. यापैकी अनेक ठिकाणी किंगफिशरचे जाळे आधीच निर्माण झाले होते. सरकारला ते वापरता आले असते. गोपीनाथ त्यांच्या कॉर्पोरेट भाषेत सांगतात ते महत्त्वाचे, “The bank debt could have been converted into equity and mallya removed from management. The Airline could have been put up for auction and Jobs saved. Banks would have recovered their money and the probe on mallya could have continued.” म्हणजे 6,000 कोटींच्या कर्जाची हमी घेऊन मल्ल्यास संचालक पदावरून हटवायला हवे होते. एअर इंडिया व 5,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकारने 50,000 कोटींची तरतूद केली. इथे 6,000 कोटींचे कर्ज फेडून 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या व नागरी हवाई क्षेत्रातले मोठे Infrastructure सरकारच्या ताब्यात आले असते. विजय मल्ल्यास हिंदुस्थानात अडकवून कर्जवसुलीदेखील करता आली असती, पण हे न करता सरकार व तपास यंत्रणा मेलेला साप धोपटत राहिले.

पोस्टर बॉय
विजय मल्ल्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, पण बँकांची कर्जे बुडवणाऱ्या बड्या उद्योगपतींची जी यादी रिझर्व्ह बँकेने सरकारला सादर केली आहे, त्यात मल्ल्या नेमका कितव्या स्थानावर व मल्ल्याच्या वर आणखी किती उद्योगपती आहेत ते रिझर्व्ह बँकेने देशासमोर आणायला हवे. मल्ल्या हा कर्ज बुडवणाऱ्या उद्योजकांच्या यादीतील ‘पोस्टर बॉय’ झाला याला कारण विजय मल्ल्याने स्वतःची निर्माण केलेली प्रतिमा. आजही मल्ल्या लंडनच्या कोर्टात त्याच रुबाबात येतो. त्याच्या जीवनमानात व राहणीमानात कोणताही बदल झालेला नाही. तो ट्विटरवर त्याची भूमिका मांडत असतो. त्याचे 60 लाख चाहते ट्विटरवर आहेत. आजही तो लंडनमधील त्याच्या घरात लोकांना उत्तम ‘पार्टी’ देतो. तो त्याच्या ‘बेन्टली’ गाडीतून लंडनच्या कोर्टात येतो तेव्हा ‘ब्रिटिश बॉडीगार्ड’स्नी घेरलेला असतो. ब्रिटिशांना नोकरीवर ठेवणे व त्यांना ‘ऑर्डर्स’ सोडणे हा त्याचा जुना छंद आहे. तो हिंदुस्थान सरकारविरुद्ध हिमतीने केस लढतो आहे व प्रत्यार्पणाची त्याला चिंता वाटत नाही. मल्ल्या पुन्हा हिंदुस्थानात परतेल असे वाटत नाही. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तरी आणि नाही झाले तरी. यापेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेकांना युरोपातील न्यायालयाने परत पाठवले नाही. इकडे मल्ल्या तर कोर्टाला सांगतोय, ‘‘मी कर्जबुडव्या नाही. मला कर्ज फेडायचे आहे, पण माझा राजकीय फुटबॉल झालाय. हिंदुस्थानात मानवी हक्कांचे उल्लंघन होतेय आणि तुरुंग म्हणजे नरक आहेत.’’ हे सत्य युरोपातील कोणतेही न्यायालय नाकारणार नाही.

आज मल्ल्या पळाला, उद्या इतर उद्योगपती पळून जातील. त्यांचे पलायन सुरू झाले आहे. मालक जगला तर कामगार जगेल. ‘उद्योगपती’ ही शिवी नाही व व्यापार करणे हा गुन्हा नाही असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत. आज उद्योग करणे हा गुन्हा ठरला आहे व ई.डी., सी.बी.आय., ईओडब्ल्यूसारख्या तपास यंत्रणांचा वापर उद्योगपतींना गुडघ्यावर उभे करण्यासाठीच केला जातो.

अडचणीतले उद्योग व उद्योगपतींना जगवणे आणि टिकवणे हेच औद्योगिक धोरण असायला हवे. ते आज दुर्दैवाने होत नाही. निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना निधी न देणाऱयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो व त्या उद्योगपतींची कोंडी केली जाते अशा उद्योगांची संख्या वाढते आहे. हिंदुस्थानचे वातावरण उद्योग आणि व्यापारासाठी पोषक राहिलेले नाही. अशाने अच्छे दिन कसे येणार?

ट्वीटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]एक प्रतिक्रिया