राणी पद्मावतीचा आणखी एक ‘जोहार’!

465

rokhthokराणी पद्मावती (पद्मिनी) हिने देश, देव, धर्मासाठी ‘जोहार’ केला. संजय लीला भन्साळी यांचा पद्मावतीवरील चित्रपट वादात अडकला, हासुद्धा एक राजकीय ‘जोहार’ आहे काय? स्त्रीची प्रतिष्ठा जपण्यासाठी जगात अनेक स्त्रियांनी त्याग केला, पण त्याची तुलना पद्मावतीच्या ‘जोहार’शी होऊ शकत नाही! अल्लाउद्दीन खिलजी व बाबर ही विकृतीच होती. खिलजीचा खरा पराभव राणी पद्मावतीनेच केला. गुजरात निवडणुकांच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी व राणी पद्मावतीचा विषय मागे पडला आहे.

राणी पद्मावतीची इज्जत आणि प्रतिष्ठेसाठी राजपूत समाज ‘जोहार’ करण्यासाठी सज्ज झाला. राणी पद्मावतीची कहाणी देशासाठी सतत प्रेरणादायी ठरली; पण जगातही ‘राणी पद्मावती’ कमी नव्हत्या. पद्मावतीचा जोहार हा राष्ट्राभिमान, धर्माभिमान व स्वाभिमान होता. आज कुणीही उठते व पद्मावतीशी आपले नाते जोडते. ‘‘मी तेथे असते तर जोहार वगैरे केला नसता.’’ असे सौभाग्यवती शोभा डे यांचे म्हणणे आहे. अशी वक्तव्ये हा पद्मावतीचा अपमान ठरतो. कुणी सती जातात, कुणी जोहार करतात. हे सर्व स्वतःच्या स्त्रीत्वाची प्रतिष्ठा जपण्यासाठी करतात. संजय लीला भन्साळी यांनी पद्मावतीच्या निमित्ताने नक्की काय केले, हे पडद्यावर पाहावे लागेल, पण तो पडदाच जाळण्याची धमकी आता दिली आहे. शेवटी ‘जळणं’ हेच पद्मावतीचे जीवन आहे.

जोहार सर्वत्र घडले
सीतेला प्रतिष्ठेसाठी अग्निदिव्य करावे लागले व पद्मावतीस जोहार. जगभरातील अनेक स्वातंत्र्य युद्धात स्त्रियांच्या नशिबी सीता व पद्मावतीचे अग्निदिव्यच आले. स्वित्झर्लंड देशाच्या स्वातंत्र्य युद्धात एक सरदार व त्याच्या पत्नीचा संवाद खूप गाजला. शिलर या लेखकाने तो काव्यमय प्रसंग चितारला आहे. स्टाफॉचर नावाच्या योद्धय़ास त्याची ‘पतिव्रता’ स्त्री युद्धाची व शत्रूस मारण्याची एक युक्ती सुचविते. त्या वेळचे त्या दोघांचे संभाषण फार मनोरंजक आहे.

बायको – शत्रूची एवढी भीती कशाला पाहिजे? ते पुरुष आहेत तसे तुम्हीही पुरुष आहा आणि त्यांच्याप्रमाणे तुम्हालाही आपली अस्त्री उगारता येतात! प्रयत्न तर करून पाहा! जिकडे न्याय आहे, त्या पक्षाला परमेश्वर यश देतो.
नवरा – लढाईपासून किती नुकसान होते याची तुला कल्पना नाही, म्हणून तू मला हा मार्ग सुचवीत आहेस.
बायको – नुकसान किंवा नफा यापैकी परमेश्वराच्या मनातून जे काही करावयाचे असेल ते सोसण्याला मनुष्याने तयार असले पाहिजे, पण लोकांचे अन्याय विनाकारण सहन करीत बसण्याची आपल्या मनाला सवय लागलेली चांगली नाही.
नवरा – पण हे जे आपले घर तुला इतके आनंद देत आहे, ते कदाचित लढाई झाली तर जळून खाक होईल.
बायको – माझी जरी असल्या या ऐहिक क्षणभंगुर वस्तूंवर प्रीती असली तरी आपल्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी जरूर असेल तर मी आपल्या हाताने या घराला पहिल्याने आग लावून देईन!
नवरा – या निर्जीव वस्तूंचा त्याग करण्याला तू कदाचित तयार होशील, पण पाळण्यात जी लहान मुलं खेळत आणि बागडत असतात, तीसुद्धा त्या निष्ठेवर लढाईला बळी पडतात.
बायको – तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की, जे अनाथ आणि निरुपद्रवी प्राणी आहेत त्यांचे परमेश्वर संरक्षण करीत असतो, पण तुम्हाला मागची मुलाबाळांची काळजी नको. तुम्ही पुढे पाऊल टाकून शत्रूवर चला म्हणजे झाले.
नवरा – आमचे काय? आमचे ठीकच आहे. आम्ही समरांगणात जाऊ आणि शत्रूंशी लढून मरू. परंतु आमच्या मागे तुमच्यासारख्या स्त्रियांची काय वाट?
बायको – आमच्यासारख्या अबलांनाही देवाने संरक्षणाचा मार्ग मोकळा ठेवला आहे. एखाद्या कडय़ावर जाऊन तेथून खाली उडी टाकली म्हणजे झाले!

हे आपल्या बायकोचे भाषण ऐकून स्टाफॉचर याला अतिशय आनंद झाला व तिला आलिंगन देऊन तो म्हणाला, ‘‘ज्या लोकांना अशा शूर, स्वदेशाभिमानी आणि स्वातंत्र्यलोलुप स्त्रिया मिळाल्या आहेत, ते आपल्या देशाकरिता मोठय़ा आनंदाने लढण्याला तयार होतील आणि त्यांच्याविरुद्ध कितीही मोठे सैन्य आले तरी ते त्याचा तेव्हाच फडशा पाडून टाकतील.’’ हे संभाषणसुद्धा प्रेरणादायी आहे. प्रत्येक स्वातंत्र्य लढय़ात देश व धर्मासाठी असे त्याग घडले आहेत, पण राणी पद्मिनीचा जोहार हा सगळय़ात तेजस्वी.

दंतकथेच्या खुणा
राणी पद्मावतीची कहाणी म्हणजे एक दंतकथा असल्याचे म्हटले जाते, पण त्या दंतकथेच्या ‘खुणा’ आजही चित्तोडगडला दिसतात. पद्मिनीचा जोहार ही दंतकथा असेल तर रामायण आणि महाभारतदेखील दंतकथाच मानावी लागेल. मुसलमानांचा ‘जिहाद’ हा त्यांच्या धर्मासाठी असेल तर पद्मावतीचा ‘जोहार’ही धर्मासाठीच होता. देव, देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी, बलिदानाचा सर्वोच्च आदर्श निर्माण करणारी ही चित्तोडची महाराणी पद्मिनी. राणी पद्मिनीने तिच्यासमवेत चित्तोडगडावर १६ हजार राजपूत माता-भगिनीसह ‘बलिदान’ दिले. हा सर्व इतिहास आजही त्या मातीत व देशवासीयांच्या मनात जिवंत आहे. संजय लीला भन्साळीने पद्मिनीचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणायचा प्रयत्न केला, पण तो टीका, विरोध, राजकारणाचा बळी ठरला. पद्मिनीचा अपमान हा देशाचा इतिहास व संस्कृतीचा अपमान आहे, पण इतिहास खरोखर मांडलाय का व संस्कृतीचे धिंडवडे निघाले का, हे ठरवायचे असेल तर मोजक्या मंडळींनी ‘पद्मावती’चा जोहार एकदा अनुभवायला हवा. राजपूत समाजाचा विरोध म्हणजे त्यांच्या भावना आहेत. ज्या भावना राजपूत समाजाच्या आहेत त्याच समस्त देशवासीयांच्या आहेत.

इतिहास काय सांगतो?
नागपूरचे इतिहास संशोधक डॉ. सचिन जांभोरकर यांनी राणी पद्मिनीच्या इतिहासावर झोत टाकला आहे, तो महत्त्वाचा आहे. सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका व सासरा असणाऱ्या आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणाऱ्या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करून त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खुपसून पूर्ण सैन्यातून मिरवून, त्यानंतर आपले भाऊ व साळ्यांचे मुडदे पाडून २१ऑक्टोबर १२९६ रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला. सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दीनने हिंदुस्थानातील इतर राज्यांवर आक्रमण करून लूट मिळवण्याचे सत्र सुरू केले. चित्तोड (इ. स. १३०३), गुजरात (१३०४), रणथंबोर (१३०५), मालवा (१३०५), सिवाना (१३०८), देवगिरी (१३०८), वारंगल (१३१०), जलोर (१३११), द्वारसमुद्र (१३११) आदी राज्यांवर आक्रमणे करून अल्लाउद्दीनने परमार, वाघेला, चामहान (चौहान), यादव, काकाटीय, होयसाळ, पांड्या आदी साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला. लाखोंचे धर्मपरिवर्तन केले. कोट्यवधींची संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि आमच्या अगणित माताभगिनींचा शीलभंग करून त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले. इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहितानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दीन व त्याच्या सैनिकांनी हिंदुस्थानीयांवर केले.

अल्लाउद्दीन दिल्लीच्या गादीवर असताना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता. चित्तोडगड ही त्याची राजधानी होती. आणि रतीप्रमाणे अद्भुत, आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती. सिंहली (श्रीलंकेचा?) राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रूपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपुण होती. तिच्या स्वयंवराचा पण असा होता की, जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल आणि असे म्हणतात की, तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे. तर असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले. रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रूपासाठी विश्वविख्यात होते.

राघव चेतन
रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्या तरी गुह्यासाठी राणाने राघव चेतनला अपमानित करून दरबारातून हाकलून दिले. सूडाग्नीने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका जंगलात जाऊन बसला. जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे. एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरू केले. बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दीनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. त्या वेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरीत वर्णन करून सांगितले की, ‘तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे.’ हे ऐकून खिलजीच्या व्यभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी १३०३ मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला. राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते. तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की, ‘मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले, तर मी दिल्लीला निघून जाईन.’ प्रजाहितास्तव राणाने हे मान्य केले. परंतु यामागील कुटील डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे, असे सुचविले. त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी, लंपट खिलजी राणीचे रूप पाहून आणखीनच चेकाळला. ‘अतिथी देवो भव’ या हिंदुस्थानी मूल्याचे पालन करण्यास्तव (परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे ही संस्कृती आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली ‘सद्गुणविकृती’ ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला. मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करून खाली आपल्या पडावात नेले आणि निरोप पाठवला की, ‘राणा जिवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा.’

गडावर सैनिकी खलबतं झडली आणि गडावरून निरोप गेला की, ‘राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दीनच्या डेऱ्यात दाखल होईल, पण त्या बदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे.’ ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालख्या उचलणारे चार-चार पालख्यांचे भोई खिलजीच्या डेऱ्यात दाखल झाले. राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली. राणा रतनसिंहाला मोकळे करून घोड्यावर बसवण्यात आले. पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली. अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला आणि…आणि हे काय? क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या. दगा झाला होता तर! राणीचा मामा गोरा हाच पद्मिनीचा वेश घेऊन आणि त्याचा पुतण्या बादल (ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे) काही निवडक सैनिकांना घेऊन स्त्रीवेश धारण करून खिलजीच्या डेऱ्यात घुसले होते. काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरू झाली. गोरा तर खुद्द अल्लाउद्दीनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले. स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले. आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले. बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राणाला घेऊन झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.

…आणि जोहार झाला
झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी नाग त्वेषाने चालून गेला. काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले. २५ ऑगस्ट १३०३ रोजी गडाचे दरवाजे उघडून, ‘जय एकलिंग, जय महाकाल’चे नारे देऊन राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली. परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला. दहा-दहा सुल्तानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत रणभूमीरूपी मातेच्या चरणी अर्पण होऊ लागला. लढाई संपली. राणासहित सर्व राजपूत मारले गेले अन् वखवखलेले सुलतानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार, म्हणून गडात घुसले.

पण गडावर शिरताच पाहतात तर काय, एकही स्त्री दिसेल तर शपथ. थोडे पुढे जाऊन चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध ‘विजयस्तंभ’ ओलांडल्यावर लागणाऱ्या विस्तीर्ण मैदानावर, जिथे आज ‘जोहार स्थल’ म्हणून पाटी लागलेली आहे, तिथे जाऊन पाहतात तर काय, ज्वाला आकाशाला भिडताहेत. राजपुतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळासहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते, त्याच अग्नीत उड्या घेतल्या. स्वतःच्या शीलाचे व देव, देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका अग्नीतच जळून भस्म झाल्यात. आईला मुलींच्याच रक्ताचा अभिषेक घडला. रणभूमीला रणरागिणींच्याच देहाच्या माला अर्पित झाल्या. अन् चित्तोडगडाने अनुभवला एक अलौकिक सोहळा- ‘जोहाराचा सोहळा.’ तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवलेत, पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.

लढाई संपल्यावर सुमारे ३०,००० निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दीनने कत्तल केली, असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवलेय. तसेही प्रत्येक युद्ध आटोपल्यावर तेथील निःशस्त्र व निष्पाप नागरिकांची कत्तल करून, त्यांच्या मुंडक्यांचे पहाड रचून त्यापुढे बसून मदिराप्राशन करणे, हा अल्लाउद्दीनचा आवडता छंद होता.

अल्लाउद्दीन व बाबर ही रानटी श्वापदेच होती. या सैतानांचा उदो उदो हिंदुस्थानी समाज व संस्कृती कधीच स्वीकारणार नाही. महाराणी पद्मिनी वा ‘पद्मावती’ने अतुलनीय शौर्य दाखवून एकप्रकारे त्या खिलजीचा पराभव केला. रणात जिंकलेल्या खिलजीस राणी पद्मावतीचे ‘नख’ही पाहता आले नाही. राणीने स्वाभिमान, देशाभिमान राखलाच, पण सीतेच्या तोडीचे अग्निदिव्य करून स्त्रीत्वाचाही सन्मान केला.

पद्मावतीची तुलना कुणाशीच होणार नाही.

संजय लीला भन्साळी पडद्यावर काय दाखवणार आहेत?

@rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या