गुजरातचे ‘न्यूड’ राजकारण

rokhthok बदनामी आणि चारित्र्यहनन हे सध्याच्या राजकारणातील एकमेव शस्त्र झाले आहे. स्वतःच्या कामापेक्षा विरोधकांचे चारित्र्यहनन करून निवडणुकांत प्रचाराचा धुरळा उडवला जातो. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांची एक सीडी प्रसिद्ध झाली. पटेल हे तरुण नेते. त्यांच्या बेडरुममध्ये शिरून निवडणुका जिंकण्याचे राजकारण चिंताजनक आहे.

देशाचे राजकारण किती खालच्या पातळीवर घसरले आहे ते गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचाराकडे पाहताना दिसते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे व त्याचवेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात निकराची लढाई सुरू आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असते. आता त्यात राजकारणाचीही भर पडली आहे. पाटीदार आंदोलनाचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल हे भारतीय जनता पक्षावर तुफानी टीका करीत आहेत. पटेल यांचा तोफखाना शब्दाने रोखता येत नाही हे पटल्यावर हार्दिक पटेल यांची एक ‘सेक्स’ सीडी बाहेर आणली. एका बंद खोलीतील ही सीडी राजकीय फायद्यासाठीच ऐन निवडणुकीत बाहेर काढली व गुजरातच्या राजकारणात त्यामुळे खळबळ उडाली. भारतीय जनता पक्ष म्हणतोय, हे आमचे काम नाही व हार्दिक पटेल म्हणतोय, ‘‘त्या सीडीतील ‘तो’ मी नव्हेच! हे सर्व प्रचार कमरेखालचे आहेत.’’ प्रचाराची रणधुमाळी नेत्यांच्या बेडरूमपर्यंत आणि बाथरूमपर्यंत पोहोचली. हे सर्व कुठपर्यंत जाणार? असा प्रश्न आता पडतो.

तत्त्वाचे राजकारण संपले
साधनशूचितेचे, विचारांचे आणि तत्त्वांचे राजकारण हद्दपार झाले व ज्या लोकांकडून या भूमिकेची सर्वात जास्त अपेक्षा होती त्यांनीच तत्त्वांना तिलांजली दिली. ‘‘हे जग मूर्खांनी भरलेले आहे. जे मूर्ख नसतील त्यांनी फक्त एवढेच ठरवायचे आहे की आपण या मूर्खांच्या हाताखाली राहायचे की त्या मूर्खांना आपल्या हाताखाली राबवत ठेवायचे,’’ असे एका अमेरिकन विचारवंताने म्हटले आहे. हिंदुस्थानात सध्या यापेक्षा वेगळे वातावरण दिसत नाही. कुख्यात चार्ल्स शोभराजने एकदा हिंदुस्थानविषयी काढलेले उद्गार आजच्या घडीसही योग्य आहेत. शोभराज म्हणतो, ‘‘सर्वत्र संख्यात्मक वाढ झाली आहे, गुणात्मक वाढ कुठेच दिसत नाही.’’ हे सर्व आता आपल्या बाबतीत खरे ठरताना दिसत आहे. फक्त खुर्च्यांवरील माणसे बदलली म्हणजे परिवर्तन झाले असे होत नाही. २०१४ साली खुर्च्यांवरील माणसे पुन्हा बदलली. पण चार्ल्स शोभराज म्हणतोय तेच खरे आहे. देशात गुणात्मक बदल कोठेच दिसत नाही. ठगांचे राज्य गेले व भामटय़ांचे राज्य आले! महाराष्ट्रातील शेगाव येथे शेतकऱयांवर गोळीबार झाला व कन्नडचे एक आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला. शिवसेना सोडून भाजपात येण्यासाठी त्यांना पाच कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने सरकारचे समर्थन काढले तरी आम्ही राज्य करू, असे कशाच्या भरवशावर सांगितले जाते ते आता दिसले. शेतकऱयांची कर्जमुक्ती अधांतरी लटकली आहे. शेतमालास हमीभाव नाही. बेरोजगारांना काम नाही, पण आमदार विकत घेण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे कोटय़वधी रुपये आहेत. जनतेचा पैसा सरकारी तिजोरीत न जाता सरकारातील माणसांच्या खिशांत जात आहे व त्याच ‘काळय़ा’ पैशांतून सरकारे टिकवली जात आहेत. या काळय़ा पैशांवर मोदी व शहा कधीच कारवाई करणार नाहीत. छगन भुजबळ तुरुंगात आहेत. विजय मल्ल्या यांना लंडन येथून आणण्यासाठी खटपट सुरू आहे. पण आमदारांच्या खरेदीसाठी कोटय़वधी रुपये ओतणारे मंत्री त्यांच्याच परिवारात आहेत. मुंबईत ‘मनसे’चे सहा नगरसेवक फुटले व शिवसेनेत आले तेव्हा ‘भ्रष्टचारा’च्या नावाने तांडव करणारे लोक आज गप्प आहेत; कारण इतरांकडे आहे तो काळा पैसा व स्वतःकडे आहे तो उपवासाचा साबुदाणा, अशा भूमिकेत सगळे आहेत.

बदनामी
बदनामी व चारित्र्यहनन हे सध्याच्या राजकारणातील एकमेव शस्त्र झाले. सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाने तरी विरोधकांच्या बदनामीसाठी व निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधकांची बदनामी करू नये हा संकेत आणि संस्कृती आहे. गुजरात आणि महाराष्ट्रास संतपरंपरा लाभली आहे, पण आता संतांसारखे वागायला कोणी तयार नाही. हार्दिक पटेल या तरुणास बदनाम आणि उद्ध्वस्त करण्यासाठी सारी सरकारी यंत्रणा कामास लावली. वय कमी पडते म्हणून हार्दिक पटेल विधानसभेची निवडणूक लढवू शकला नाही, पण त्याचा पराभव व्हावा म्हणून त्याने तारुण्यात केलेल्या चुका लोकांसमोर हिडीसपणे आणल्या जात आहेत. हा बलदंड सत्तेचा मनातून झालेला पराभव आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप केले, पण कोणी त्याबाबत नखभर पुरावा देऊ शकला नाही. दाऊदला मागे टाकतील असे लोक आज सत्ताधारी पक्षात घुसताना दिसत आहेत. आदर्श इमारतीची भुताटकी राजकीय विरोधकांना अधूनमधून त्रास देण्यासाठीच जिवंत ठेवली असे वाटू लागते. लालू यादव यांनी नितीश कुमार व मोदींवर तोफ डागताच त्यांच्या संपत्तीबाबत केंद्रीय तपास यंत्रणांना जाग आली व सर्व कुटुंब एका रात्रीत गुन्हेगार ठरले. अशा वेळी तुंबलेल्या फाईलवरची धूळ दोन मिनिटांत झटकली जाते, पण ‘शारदा’ घोटाळय़ातील लाभार्थी ठरलेले तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय हे भारतीय जनता पक्षात सहज सामावून घेतले जातात व लालूंचा गळा आवळणारे ‘ईडी’वाले मुकुल रॉयच्या बाबतीत डोळेझाक करतात. हे काँग्रेसने केले असते तर त्यांना भाजपने व मीडियाने झोडपून काढले असते. हार्दिक पटेलबाबतची सीडी ज्या चवदार पद्धतीने वारंवार दाखवली जाते ती पीत पत्रकारिता आहे व राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठीच हे सर्व चालले आहे. हार्दिकची ‘सेक्स’ सीडी हा प्रचाराचा मुद्दा कसा होऊ शकतो? नरेंद्र मोदी हे त्यांच्या पत्नीस सांभाळत नाहीत व ते विभक्त राहतात हा प्रचाराचा आणि बदनामीचा मुद्दा झाला तेव्हाही मी विरोध केला होता.

महापुरुष
महापुरुषांच्या सहवासाने अत्यंत क्षुद्र वस्तूंनाही महत्त्व येते. आजही शेक्सपियरचे घर, चपला व त्याची लाकडी खुर्ची जपून ठेवली आहे. महात्मा गांधींच्या चपला, चष्मा, लोकमान्य टिळकांची पगडी आणि काठी, समर्थांच्या खडावा या तशा किरकोळ वस्तू. इतर कोणाच्या असत्या तर फेकून दिल्या असत्या, पण या किरकोळ वस्तूही आता पूजनीय झाल्या आहेत. हादेखील आपल्याच संस्कृतीचा भाग आहे. मृत्यूनंतरही संत आणि महात्म्यांची बदनामी केली जाते. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचे मोल न ठेवता त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाची आज खिल्ली उडवली जाते. पंडित नेहरूंच्या असलेल्या आणि नसलेल्या लफडय़ांचे चर्वण ठरवून केले जाते. भारतीय जनता पक्ष तेव्हा असता तर या महान मंडळींच्याही सीडी बाहेर आल्या असत्या. पंडित नेहरू व लॉर्ड माऊंटबॅटनची पत्नी एकत्र सिगारेट पीत असल्याचे फोटो अनेकदा प्रसिद्ध केले जातात व त्यावर नेहरूंना बदनाम केले जाते. गांधीचेही तेच होते. सुभाषचंद्र बोस यांचीही बदनामी केली जाते. ‘विकास’ झाला नाही हे लपविण्यासाठी, आपली कमजोरी लपविण्यासाठी हे नादान उद्योग केले जातात. संजय जोशी हे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असताना त्यांच्या बाबतची एक ‘सीडी’ गुजरातमधूनच प्रसारित झाली व जोशी हे भाजपच्या वर्तुळातून कायमचे बाहेर फेकले गेले. जोशी व तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांचे अजिबात पटत नव्हते. ही ‘सीडी’सुद्धा तेव्हा वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आली. हिंदुस्थानात चित्रपट, नाटक, टीव्हीवर काय दाखवू नये यासाठी एक ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे. ‘न्यूड’ नावाचा मराठी चित्रपटही आता नाकारल्याचे प्रकरण गाजते आहे. पण हार्दिक पटेलची ‘सीडी’ दाखवून अनेक वाहिन्यांनी सरकार पक्षाची सेवा केली. सोशल मीडियावर अक्षय काळे या तरुणाने उत्तम भाष्य केले. ‘‘एखाद्याच्या रूममध्ये विनापरवाना घुसून शूट केलेला व्हिडीओ रोज दिवसाला चॅनलवर दाखवतात; मग सिनेमाला सेन्सॉर बोर्ड कशाला हवं?’’ प्रश्न बिनतोड आहे. आंध्रच्या राजभवनात राज्यपाल एन. डी. तिवारी यांनी ‘रासलीला’ केल्या व त्यांच्या बेडरूममधले चित्रण प्रसारित केले. तेव्हा तिवारी यांना हाकलण्यासाठी भाजपने आंदोलन केले व तेच तिवारी आज भारतीय जनता पक्षात सामील झाले हे आश्चर्यच आहे.

या सर्व ‘सीडी’ प्रकरणांवर स्वतः हार्दिक पटेलने दोन प्रश्न विचारले-
१) २३ वर्षांच्या तरुणाची गर्लफ्रेण्ड असू शकत नाही का?
२) गुजरातच्या जनतेला २३ वर्षांच्या तरुणाची सीडी कसली दाखवताय! त्यांना २२ वर्षांत केलेल्या विकासाची ‘सीडी’ पाहायची आहे. ती कधी दाखवणार?
हे प्रश्न सगळय़ांच्याच मनात आहेत. उत्तरे मिळतील काय?

@rautsanjay61
– [email protected]