एका पायावर उभे राहून ‘या’खेळाडूने केले अनेक विक्रम

सामना ऑनलाईन । डूनेडिन ( न्यूझीलंड)

न्यूझीलंडचा मधल्या फळीतील खेळाडू रॉस टेलरने बुधवारी १८१ धावांची अविस्मरणीय खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे अनेक विक्रमाची नोंद झालीय.

झुंजार खेळाचे प्रदर्शन

रॉस टेलरचा मांडीचा स्नायू दुखावल्याने तो मैदानावर लंगडत होता. तरीही त्याने हार मानली नाही. न्यूझीलंडच्या मेडिकल स्टाफने त्याला निवृत्त होण्याचाही सल्ला दिला होता. तरीही तो थांबला नाही. १७ चौकार आणि चार षटकारांसह त्याने नाबाद १८१ धावा केल्या. न्यूझीलंडला विजयी करुन परतत असताना टेलरच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. प्रेक्षकांनीही त्याच्या या लढाऊ वृत्तीला टाळ्यांची मानवंदना दिली.

वैयक्तिक सर्वोच्च धावा

टेलरची वन-डे करियरमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.  यापूर्वी २०११ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने १३१ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी आपल्या २७ व्या वाढदिवशी ( ८ मार्च २०११ ) त्याने हा विक्रम केला होता. आता सात वर्षानंतर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याने नाबाद १८१ धावा काढल्या आहेत.

धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी

टॉप ३ क्रमांकाच्या खाली येऊन धावांचा पाठलाग करताना १५० पेक्षा जास्त धावा करणारा टेलर हा पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोनिसने ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत १४६ धावा केल्या होत्या.

 चौथ्या क्रमांकावरची दुसरी खेळी

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन १८० पेक्षा जास्त धावा काढणारा टेलर हा दुसरा फलंदाज आहे. या क्रमांकावर येऊन सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम सर विव रिचर्ड्स यांच्या नावावर आहे. त्यांनी  १९९४ साली इंग्लंडविरुद्ध नाबाद १८९ धावांची खेळी केली होती.

सचिन-गांगुलीला टाकले मागे

रॉस टेलरने बुधवारी १९० व्या डावात १९ वे शतक झळकावले. त्याने हे शतक झळाकवत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांना मागे टाकले आहे. सचिनने २०१ तर सौरवने २०३ डावांमध्ये १९ शतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये हाशिम अमला पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १०४ डावात १९ शतकं झळकावली आहेत. हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीनं हा टप्पा १२४ वन-डेमध्ये पूर्ण केलाय.