29 हजार मुलांना सुरक्षा कवच, ठाणे जिह्यातील बालमृत्यू कमी होणार

63

सामना प्रतिनिधी । शहापूर

ठाणे जिल्हा परिषदेने 29 हजार मुलांसाठी रोटाव्हायरस लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या लसीने अतिसारासारख्या भयंकर आजारातून सुटका होईल. या सुरक्षा कवचामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात आरोग्य विभागाला यश येणार असून या मोहिमेस जून महिन्यात प्रारंभ होणार आहे.

सहा, दहा व 14 आठवडय़ांच्या बालकांना रोटाव्हायरसचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांची अतिसाराच्या कचाटय़ातून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे बालमृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे. रोटाव्हायरस लसीकरणाबाबत जिल्हा स्तरीय कार्यशाळा व प्रशिक्षण तसेच तालुका स्तरीय प्रशिक्षणदेखील घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश नगरे यांनी दिली. संक्रमणजन्य विषाणूमुळे बालकांमध्ये अतिसार उद्भवून मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. बालकांमधील अतिसार रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या या रोटाव्हायरस लसीकरणाची मोहीम राज्य शासनाकडून आदेश मिळताच जून महिन्यापासून जिल्हा परिषद सुरू करणार आहे.

पालकांना दिलासा
लसीकरणासाठी खासगी दवाखान्यात किमान एक हजार शुल्क आकारण्यात येत असल्याने गोरगरीब पालकांना दिलासा मिळणार आहे. अतिसारापासून संरक्षण होऊन बालकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पालकांनी या लसीकरणाचा लाभ घ्याका, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या