कोहलीच्या टीमसमोर ‘गंभीर’ आव्हान

सामना ऑनलाईन । बंगळुरु

रॉयस चॅलेंजर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन्ही टीमची या स्पर्धेतील वाटचाल सारखीच झाली आहे. दोन्ही टीमच्या गोलंदाजांनी आजवर निराशा केली आहे. टॉप ऑर्डरवर अवलंबून असलेल्या या टीमच्या मधल्या फळीनेही अजून आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. दोन्ही संघांनी चारपैकी एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. पॉईंट टेबलमध्ये बंगळुरु सातव्या तर दिल्ली आठव्या क्रमांकवर आहे.

दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध धावांचा पाठलाग करता निराशा केली होती. कर्णधार गौतम गंभीरला पहिल्या सामन्यानंतर मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. गंभीर हा दिल्लीच्या फलंदाजींचा मुख्य आधारस्तंभ असून त्याचा फॉर्म दिल्लीच्या वाटचालीसाठी निर्णायक ठरणार आहे. जेसन रॉय, ऋषभ पंत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

दिल्लीचे गोलंदाज मात्र या स्पर्धेत सर्वात महागडे ठरत आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये सर्वात महागडी गोलंदाजी केली असून १०.७५ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. मधल्या ओव्हर्समध्येही दिल्लीची गोलंदाजी धावा देण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आरसीबीचा संघही गोलंदाजांपेक्षा फलंदाजीसाठीच नेहमी ओळखला जातो. मात्र मुंबई इंडियन्स विरुद्ध फलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कोहली, डी कॉक आणि ए.बी. डिव्हिलियर्स ह्या तिघानंतर कोण? हा प्रश्न अजूनही आरसीबीला सुटलेला नाही.

आता घरच्या वातावरणात जुन्या चुका टाळून नवी भरारी घेण्याची संधी आरसीबीला आहे. पॉईंट टेबलमध्ये तळाशी असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धचा सामना ही त्यासाठी सर्वोत्तम संधी आहे.

टीम न्यूज

बंगळुरुमध्ये होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे दोन्ही संघांना सरावही रद्द करावा लागला होता.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आजारपणामुळे हिंदुस्थानात येऊ शकला नव्हता. तो आता आरसीबीच्या टीममध्ये दाखल झाला आहे.

संभाव्य ११

दिल्ली डेअरडेव्हिल्स

१) गौतम गंभीर २) जेसन रॉय ३)ऋषभ पंत ४) ग्लेन मॅक्सवेल ५) श्रेयस अय्यर ६) विजय शंकर ७) ख्रिस मॉरीस ८) राहुल तेवतिया ९) शादाब नदीम १०) ट्रेंट बोल्ट ११) मोहम्मद शमी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

१) क्विंटन डी कॉक २) विराट कोहली ३) ए.बी. डिव्हिलियर्स ४) मनदीप सिंह ५) कोरे अँडरसन ६)सर्फराज खान ७) वॉशिंग्टन सुंदर ८) ख्रिस वोक्स ९) उमेश यादव १०) यजुवेंद्र चहल ११) मोहम्मद सिराज /  कुलवंत खुजरोलीया