रॉयल स्टार क्लबने फसवले, गुंतवणूकदारांना 4500 कोटींचा चुना

सामना प्रतिनिधी । मुंबई

विविध हॉलिडेज पॅकेजमध्ये गुंतवणूक करा आणि भरघोस व्याजासह परतावा मिळवा, अशा स्वरूपाचे आमिष दाखवून वडाळा येथील रॉयल ट्विंकल स्टार क्लबने 15 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना 4,500 कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तब्बल 15 हजार गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या असून त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखेने रॉयल ट्विंकलच्या दोघा संचालकांना बेडय़ा ठोकल्या आहेत.

प्रकाश उत्तेकर (58) आणि व्यंकटरामन नटराजन (60) अशी त्या दोघा संचालकांची नावे आहेत. या दोघांनाही कोर्टात हजर केले असता त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. क्लबचे दैनंदिन काम हे दोघे बघायचे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचण्यात या दोघांचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुह्यात पोलिसांनी याआधी ओमप्रकाश गोएंका याला अटक केली होती. गोएंका सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत 15 हजार गुंतवणूकदार पुढे आले असले तरी तक्रार देणाऱयांचा आकडा लाखाच्या घरात जाईल, तसेच यात आणखी भामटय़ांना बेडय़ा पडतील, असे एका अधिकाऱयाने सांगितले. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात पहिली तक्रार वडाळा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

तीन कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक

लोकांना फसविणाऱया भामटय़ांनी ट्विंकल एन्वयारेटेक प्रा.लि., रॉयल ट्विंकल स्टार क्लब, ट्रिट्स प्रा.लि. अशा तीन कंपन्या सुरू केल्या होत्या. या तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आरोपींनी लोकांना पैशांची वेगवेगळी आमिषे दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.

हॉलिडेजचा उपभोग घ्या अथवा दुप्पट कमवा

अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी हॉलिडेज पॅकेजच्या वेगवेगळ्या स्किम आणल्या होत्या. हॉलिडेज पॅकेजमध्ये गुंतवा आणि मज्जा लुटा. जर पॅकेजचा उपभोग घ्यायचा नसेल तर वर्षाला 13 टक्के व्याजाने पैसे कमवा, असे आमिष दाखविण्यात आले होते. शिवाय तीन-चार वर्षांसाठी एक ठराविक रक्कम गुंतवा आणि त्यावर दुप्पट पैसे कमवा, अशा स्वरूपाची विविध आमिष दाखवून लोकांना चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे.