मंगेशकर कुटुंबाला देशभक्तीची परंपरा! मोहन भागवत यांचे प्रतिपादन

2

सामना ऑनलाईन । मुंबई

मंगेशकर कुटुंबाला जशी कलेची परंपरा आहे तशीच देशभक्तीची परंपरा आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायकी, विद्वतेचा वापर समाजासाठी केला. आपली पुंजी समाजासाठी खर्ची केली. त्यांच्या नाटकांनी, गीतांनी शौर्यता आणि वीरतेचा सन्मान केला. फक्त गुणवान असून उपयोग नाही, तर इतरांसाठी उपयोगी ठरले पाहिजे. मंगेशकर कुटुंबाने हे दाखवून दिले आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगेशकर कुटुंबाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून एक कोटीची तर संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांकडून 18 लाख रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर, विनीत गोरे आदी उपस्थित होते.

‘भारत के वीर’ पोर्टलला पुलवामा हल्ल्यानंतर 250 कोटी निधी

शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षयकुमार याने केंद्र सरकारच्या सहकार्याने ‘भारत के वीर’ हे पोर्टल सुरू केले आहे. पोर्टलवर देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे. या पोर्टलवर शहीदांची माहिती पोर्टलवर असते. त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत दिली जाते. पुलवामा हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतर नंतर अवघ्या दीड महिन्यात या पोर्टलवर तब्बल 225 कोटींचा निधी जमा झाला आहे, अशी माहिती सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार यांनी दिली.

सरस्वतीचे अखंड वरदान असलेले कुटुंब – सलीम खान
प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात आला. मंगेशकर कुटुंबावर सरस्वतीचे वरदान असेच अखंड राहू दे, अशा सदिच्छा सलीम खान यांनी व्यक्त केल्या.

संगीत, कला क्षेत्राचा पुरस्कार ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांना, तर चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी मधुर भांडारकर, प्रदीर्घ अभिनय कारकीर्दीसाठी अभिनेत्री हेलन यांना सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्राचा ‘वागविलासिनी’ पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांच्या वतीने त्यांची कन्या राही डहाके आणि नातू बिल्व यांनी स्वीकारला. सर्वांना भयमुक्त समाजात जगता यावे. शब्दांचा आणि स्वरांचा स्वतंत्र आविष्कार करता यावे, अशा भावना वसंत आबाजी डहाके यांनी संदेशातून व्यक्त केल्या. भद्रकाली प्रॉडक्शनच्या ’सोयरे सकळ’ या नाटकाला मोहन वाघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसाद कांबळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सामाजिक क्षेत्रासाठी तालयोगी आश्रमाला देण्यात आलेल्या पुरस्कार पंडित सुरेश तळवलकर यांनी स्वीकारला. 1 लाख 1 हजार 101 रुपये आणि मानचिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.