रेल्वेनं दिलं वर्ष ‘३०१३’चं तिकीट, प्रवाशाने वाजवले ‘तीन तेरा’

15

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा आतापर्यंत अनेक प्रवाशांना फटका बसलेला आहे. याच बेजबाबदारपणामुळे एका प्रवाशाने रेल्वेचे तीन तेरा वाजवले आहेत. रेल्वेने प्रवाशाला २०१३ ऐवजी ३०१३ ची तिकीट दिल्याने ग्राहक न्यायालयाने रेल्वेला तेरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पाच वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमधील सहरानपूर येथील विष्णू कांत शुक्ला (७३) यांनी सहारनपूर जौनपूरी हिमगीरी एक्सप्रेसचे १९ नोव्हेंबरचे तिकीट काढले होते. शुक्ला यांना देण्यात आलेल्या तिकीटात रेल्वेने २०१३ च्या ऐवजी ३०१३ छापले होते. शुक्ला यांच्या ते लक्षात आले नाही. मात्र प्रवासाच्या दिवशी तिकीट तपासनीसाने त्यांना हे तिकीट ३०१३ चे असल्याचे सांगितले आणि रेल्वेतून उतरायला लावले. तसेच त्यांच्याकडून ८०० रुपयांचा दंडही घेतला.

‘मी जे.व्ही जैन पदवी महाविद्यालयाचा हिंदी विभागाचा प्रमुख होतो. खोटी तिकीट घेऊन प्रवास करण्याविषयी मी कधी विचारही करू शकत नाही. मात्र त्या टीसीने माझा सर्वांदेखत अपमान केला व मला ट्रेनमधून खाली उतरवले. मी त्याला सांगत होतो की रेल्वेची चूक आहे की त्यांनी २०१३ च्या ऐवजी ३०१३ छापले आहे. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. मी खूप महत्त्वाच्या कामासाठी जात होतो. पण रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला’, असे शुक्ला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

याप्रकरणी शुक्ला यांनी ग्राहक न्यायलयात रेल्वेविरोधात खटला दाखल केला होता. न्यायालयाने शुक्ला यांच्या बाजूने निकाल देत त्यांचा मानसिक छळ केला म्हणून दहा हजार रुपये आणि तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वला दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या