पुतळ्यांच्या विटबंनेचा संघाकडून निषेध

सामना ऑनलाईन । नागपूर 

त्रिपुरा राज्यात लेनिनचा पुतळा तोडल्यानंतर कोलकाता व चैन्नईमध्ये झालेल्या पुतळ्यांच्या विटंबनेच्या घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केली.

रा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेची बैठक गुरुवारपासून नागपुरातील रेशिमबागेत सुरू झाली. या बैठकीची पत्रकारांना माहिती देताना वैद्य म्हणाले, ‘त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यानंतर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने तोडला. यानंतर उत्तरप्रदेश, कोलकाता व चेन्नई येथेही काही नेत्यांचे पुतळे तोडण्याच्या घटना घडल्या. या प्रकारे पुतळे तोडणे योग्य नाही. या कृत्यांचे रा. स्व. संघाने कधीही समर्थन केलेले नाही.’ या घटना निंदनीय असल्याचे सांगत मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात रा. स्व. संघाची भूमिका स्पष्ट केली.

रा. स्व. संघाची अ. भा. प्रतिनिधीसाठी संघ परिवारातील ३५ संघटनांचे दीड हजार प्रतिनिधी नागपुरात येणार आहेत. दर तीन वर्षांनी ही बैठक नागपुरात होते. यात गेल्या तीन वर्षात विविध संघटनांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येतो तसेच पुढील तीन वर्षात करावयाच्या कामाची आखणी केली जाते.

अमित शहा उपस्थित राहणार 

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शुक्रवारी सकाळी सहभागी राहणार आहेत. यासाठी ते शुक्रवारी सकाळी नागपुरात येत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अमित शहा नागपुरात येऊन गेले आहेत. याशिवाय भाजपतर्फे सरचिटणीस राममाधव व रामलाल बैठकीत सहभागी होणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण ठराव मांडले जाणार आहेत. या बैठकीत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना बदलणार जाणार असल्याची चर्चा आहे. जोशी यांनी प्रकृती चांगली राहत नसल्याने त्यांच्या ऐवजी दुसऱ्यांची निवड केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु या संदर्भात शुक्रवारी चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगून वैद्य यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही.