बीसएनएलच्या स्पीडब्रेकरने राज्यातील आरटीओ तोंडघशी!

ऑनलाइन कारभार झाला ठप्प

प्रतिनिधी । मुंबई

बीएसएनएलच्या इंटरनेट स्पीडअभावी राज्यातील आरटीओच्या ऑनलाइन कारभाराचा बुधवारी आणि गुरुवारी चांगलाच बोऱ्या वाजला. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नव्या ‘सारथी ४.०’ या सॉफ्टवेअर प्रणालीचे त्यामुळे पुरते बारा वाजले. राज्यभरात बीएसएनएलची १० एमबीपीएस वेगाची इंटरनेट जोडणी घेतली असताना बीएसएनएलकडून कमी वेगाची सेवा देण्यात आल्याने गेले दोन दिवस प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी बंद झाल्याने हे काम प्रत्यक्ष हातांनी करावे लागले.

त्यानंतर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसह परिवहन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी चर्चा करून यावर तातडीने तोडगा काढला. गुरुवारी दुपारपर्यंत राज्यभरातील ५० कार्यालयांपैकी ४४ कार्यालयांमधील काम पुन्हा हळूहळू पूर्ववत झाले.

कमी वेगामुळे उडाला गोंधळ…

ही प्रणाली प्रभावीपणे चालण्यासाठी बीएसएनएलची १० एमबीपीएस वेगाची इंटरनेट जोडणी राज्यभरात घेतली होती. बीएसएनएलने प्रत्यक्षात ठरलेल्या वेगापेक्षा कमी वेगाची इंटरनेट जोडणी देऊ केल्याने ही समस्या आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा गोंधळ उडाल्यानंतर तातडीने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना वेग वाढवण्याची विनंती करण्यात आली.