नागझरी ग्रामस्थांच्यावतीने पावसासाठी मांजरा नदीकाठी रुद्र पूजा

सामना प्रतिनिधी । लातूर

नागझरी येथील चिंतातूर शेतकऱ्याने श्रावण महिन्यात जागृत नागनाथ मंदिर येथे रुद्र पूजा करुन देवाला मांजरा नदी भरू दे, असे साकडे घातले. या वर्षी पावसाळा संपत आला तरी मांजरा नदी पूर्णपणे कोरडी आहे. मागील दोन वर्षात अत्यंत चांगला पाऊस झाला होता त्यामुळे जून जुलै महिन्यातच लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीचे पूर्ण पात्र पाण्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी समाधानी होता.मात्र संपूर्ण पावसाळ्यात मागील तीन महिन्यांत ९० दिवसात फक्त सात ते आठ वेळा पाऊस पडला आहे, तो ही जेमतेम पिकांपुरताच.

जिल्ह्यातील शेती मोठ्या प्रमाणात मांजरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये कुठेही मोठे धरणे नाही किंवा पाण्याचा इतर स्रोत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून आहे . मागील दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी एकापेक्षा अधिक पिके घेऊन आपले उत्पन्न चांगले घेत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीमध्ये मोठ्या पूर्व प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. मात्र या वर्षी पावसाने अचानक उघडीप दिल्यामुळे सर्वच शेतकरी चिंतातूर आहेत. सप्टेबर महिन्यात गणपती दरम्यान मोठा पाऊस जर पडला नाही तर शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. आजच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच धरणे व लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरणातील पाणी मृत साठा पर्यंत पोहोचले आहे. म्हणून नागझरी येथील चिंतातूर शेतकऱ्याने श्रावण महिन्यात जागृत नागनाथ मंदिर येथे रुद्र पूजा करुन देवाला मांजरा नदी भरू दे असे साकडे घातले. याप्रसंगी नागझिराचे सरपंच श्रीराम साळुंके व सर्व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रुद्र पूजेसाठी बेंगलोर आश्रमहुन आर्ट लिव्हिंगचे स्वामीजी राजेश शर्मा व इतर साधक उपस्थित होते. तसेच याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून मांजरा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या कारवाई जेवली टाकली भू समुद्रा रायवाडी या गावातूनही मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रकल्प संचालक महादेव गोमारे, किरण देशपांडे सचिन फपाळ, प्रकाश कदम, वशिष्ट कुकडे, शहाजी कांबळे, रोहित सर्वदे, सुलोचना देवकर, संजय गायकवाड व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.