रुईयाचा नाटय़ सोहळा

मराठी रंगभूमीवरील अनेक ज्येष्ठ कलाकार घडवणारा ‘रुईया नाटय़वलय’… या नाटय़वलयाचा ‘रुईयांक’ हा महोत्सव  माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात येत्या 16 मार्चला सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या  ‘रुईयांका’त ‘मुक्तिधाम’, ’आयुष्यमान’, ‘द्रोणायन’, ‘एकादशावतार’ अशा एकूण चार एकांकिका पाहायला मिळणार आहेत.

पूर्वीच्या स्पर्धा कशा होत्या, काय स्वरूप होतं आणि आताच्या स्पर्धांमध्ये काय बदल झाले आहेत हे रसिकांना आणि विद्यार्थ्यांना कळावं या उद्देशाने या एकांकिका सादर होतील. हा उद्देश यावेळी रुईयांक महोत्सवादरम्यान आयोजकांनी ठेवला आहे. यामुळे प्रेक्षक, कलाकार आणि विद्याद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधायला मदत होईल, असे मत आयोजक आकाश पांचाळ व्यक्त करतात.

या अनोख्या संकल्पनेविषयी त्यांचे म्हणणे आहे की,  नाटय़क्षेत्रातील रुईयाच्या प्रभावी कारकीर्दीची जाणीव  तरुण पिढीला होईल. तसेच यातून त्यांना शिकताही येईल. ‘रुईयांक’ ही संकल्पना मुळात कोणा एकाची नसून ती सगळ्या आजी-माजी विद्यार्थ्यांची आहे. नाटय़संस्कृती जपणाऱ्या  रुईया महाविद्यालयाने मनोरंजनसृष्टीला अनेक दिग्गज कलावंत दिले. येथे येणारा नवा कलाकार विद्यार्थी येथील एकांकिका परंपरेशी एकरूप व्हावा, नाटय़परंपरेचे संस्कार त्याच्यावर व्हावेत यासाठी आम्ही रुईयाचे आजी-माजी विद्यार्थी ‘रुईयांका’चा हा नाटय़सोहळा सादर करतो.

महोत्सवाचं वैशिष्टय़

 ‘मुक्तिधाम’, ‘आयुष्यमान’, ‘द्रोणायन’ या एकांकिका आणि ‘एकादशावतार’चा दीर्घांक स्वरूपाचा शुभारंभाचा प्रयोग या महोत्सवात सादर होणार आहे. या महोत्सवाचं वैशिष्टय़ म्हणजे 10 ते 12 वर्षांपूर्वी झालेल्या एकांकिका त्याच कलाकारांकडून सादर केल्या जाणार आहेत.  व्यावसायिक कलाकार म्हणून नावारूपाला आलेले काही कलाकारही या एकांकिकांतून अभिनय करणार आहेत.