नियम जाणून घ्या!


दहावी, बारावीसाठी बरीच मोठी नियमावली लागू करण्यात आली आहे. पाहूया हे नियम…

फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या सजगतेची परीक्षा घेणारी ठरणार आहे. कारण यंदा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना ‘परीक्षा द्यायची असेल तर वेळ पाळा’, अशी तंबी दिली आहे. परीक्षाकेंद्रावर साडेदहा वाजता हजर राहिलात तरच परीक्षेला बसता येईल अन्यथा विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतानाच वेळेचे गणितही सोडवावे लागणार आहे.

गेल्या वर्षीच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षाकेंद्रात येणाऱया विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली असून परीक्षा संपेपर्यत बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या या निर्णयाच लेटलतिफ विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसणार आहे. कारण पेपरफुटीच्या घटना यंदाच्या परीक्षेवेळी टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने आधीच खबरदारी घेतली आहे. त्यानुसार परीक्षा सुरू झाल्यानंतर उशिराने येणाऱया विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद करून, उशिरा येण्याचे कारण विचारून त्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षागृहाबाहेर जाण्यासही बंदी घातली जाणार आहे असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव के. बी. पाटील म्हणाले.

घर ते परीक्षा केंद्र यांची सांगड घाला
यंदा पेपर कसा असेल याचबरोबर विद्यार्थ्यांवर वेळ पाळण्याचे दडपणही असणार आहे. मुंबईतील ट्रफिकची समस्या लक्षात घेता घरातून निघाल्यावर इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. त्यामुळे घरापासून परीक्षाकेंद्रावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, त्यावेळी ट्रफिक असते का, याचा अभ्यास परीक्षेच्या आधी केलेला बरा. त्यानुसारच परीक्षेच्या दिवशी घरातून निघण्याची वेळ ठरवली तर बरे होईल.

वेळ पाळली तर परीक्षा सोपी
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेळ पाळली तर त्यांच्यासाठी परीक्षा सोपी ठरणारी आहे. लाखात एखादा विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षाकेंद्रावर उशिरा पोहोचतो. नैसर्गिक आपत्ती किंवा वैयक्तिक समस्या या कारणामुळे जर विद्यार्थ्याला उशीर होत असेल तर कारण लक्षात घेऊन त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी मिळणार आहे. पण विद्यार्थ्यांनी जाणूनबुजून उशीर करू नये. – मुरलीधर मोरे, समुपदेशक, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ

विद्यार्थ्यांच्या मोबाईलचीही तपासणी?
व्हॉट्सऍपवरील ‘एचएससी स्टुडंट’या ग्रुपवर गेल्या वर्षी बारावीचे पेपर लीक होत होते. त्यामुळे यंदा परीक्षेला मोबाईल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्याने मोबाईल घेऊन येऊ नये तसेच मोबाईल फोन आणल्यास तो परीक्षा संपेपर्यंत पर्यवेक्षकांकडे जमा करावा, अशी सूचना दिली जाण्याची शक्यता आहे.