राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची अफवा

54

सामना ऑनलाईन, दिल्ली

देशभरात काँग्रेसचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने याची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी  आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली. सोनिया गांधी यांनी हा राजीनामा न स्वीकारल्याचेही बोलले जात होते. मात्र रात्री उशिरा ही अफवा असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.

उत्तर प्रदेशात प्रियंका फेल

निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी-वढेरा या राजकारणात सक्रिय झाल्या आणि त्यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. प्रियंका यांनी प्रचार जोरात केला पण त्या फेल झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. पूर्व उत्तर प्रदेशातील रायबरेली वगळता एकाही मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाला नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममतांना झटका

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला झटका बसला आहे. 42 लोकसभा मतदारसंघांपैकी 23 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, तर भाजपने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. 2014 च्या तुलनेत भाजपला मोठे यश येथे मिळाले आहे. काँग्रेसला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे. डाव्या पक्षांची तर पार धुळधाण झाली आहे. डाव्यांना एकही जागा मिळाली नाही. 2014 ला तृणमूल काँग्रेसला तब्बल 34 जागा होत्या, भाजपला 2, काँग्रेस 4 आणि माकपच्या डाव्या आघाडीला 2 जागा मिळाल्या होत्या. केंद्रीय मंत्री, भाजपनेते बाबूल सुप्रियो, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, तृणमूल नेते सुदीप बंडोपाध्याय हे विजयी झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र, काँग्रेस उमेदवार अभिजित मुखर्जी हे जंगीपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

चंद्राबाबूंना झटका आंध्रात ‘वायएसआर’ची त्सुनामी

विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा खटाटोप करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला आंध्र प्रदेशात जोरदार झटका बसला आहे.  विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसची अक्षरशः त्सुनामी आली आहे. ‘वायएसआर’ला 175 जागांपैकी तब्बल 148 जागा मिळाल्या असून चंद्राबाबूंच्या तेलगू देसमला केवळ 26 जागा मिळाल्या आहे. आंध्र प्रदेशात काँग्रेस आणि भाजपला खातेही उघडता आलेले नाही. आंध्रातील लोकसभेच्या 25 जागांपैकी तब्बल 24 जागांवर वायएसआर काँग्रेसने आघाडी घेतली असून केवळ एक जागा चंद्राबाबूंच्या तेलगू देसमला मिळताना दिसत आहे. हा निकाल चंद्राबाबूंसाठी मोठा राजकीय धक्का आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले आणि लोकसभेतही तेलगू देसमचा ‘आवाज’ राहिला नाही अशी दारुण स्थिती आहे.

साध्वी प्रज्ञासिंह विजयी दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य पराभूत

विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाची मध्य प्रदेशात पूर्णपणे वाताहत झाली आहे. लोकसभेच्या 29 जागांपैकी तब्बल 28 जागा भाजपला मिळाल्या असून केवळ एक जागा काँग्रेसकडे गेली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या भोपाळ मतदारसंघात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांचा दारुण पराभव केला. दीड लाखापेक्षा जास्त मतांनी साध्वी प्रज्ञासिंह विजयी झाल्या आहेत.

गुना  या  शिंदे घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसला मोठा दणका बसला. ज्योतिरादित्य शिंदे यांचा येथे पराभव झाला आहे. भाजपचे के. पी. यादव हे येथे विजयी झाले. केवळ छिंदवाडा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे विजयी झाले. 2014 मध्ये भाजपला 28 जागा  मिळाल्या होत्या. या वेळीही हे संख्याबळ कायम राहिले आहे.

दिल्लीत आप, काँग्रेस ‘गायब’

राजधानी दिल्लीतील सातही जागांवर कमल फुलले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, परवेश वर्मा, गायक हंसराज हंस, क्रिकेटपटू गौतम गंभीर, मीनाक्षी लेखी, केंद्रीय मंत्री  डॉ. हर्षवर्धन हे भाजप उमेदवार प्रचंड मतदाधिक्याने विजयी झाले.या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आप आणि काँग्रेस पक्ष ‘गायब’ झाला आहे. माजी मुख्यमंत्री  शीला दीक्षित, अरविंदरसिंग लवली, अजय माकन, जयप्रकाश अग्रवाल यांचा दारुण पराभव झाला.

तामीळनाडूत ‘डीएमके’ची लाट; अण्णा द्रमुक साफ

देशभरात मोदी लाट असताना तामीळनाडूत मात्र एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने बाजी मारली आहे. द्रमुक-काँग्रेस आघाडीने 38 पैकी तब्बल 37 जागांवर विजय मिळविला आहे. त्यात द्रमुक 23, काँग्रेस 8, माकप 2, भाकप 2, आयुएमएल आणि व्हीसीके पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. अण्णा द्रमुकला केवळ एका जागेवर विजय मिळाला. भाजपची येथे अण्णा द्रमुकबरोबर युती होती. भाजपला एकही जागा मिळाली नाही.

माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनामुळे तामीळनाडू राजकारणात पोकळी निर्माण झाली होती. निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष होते. कमल हसन यांचा राजकारणातील पहिलाच प्रयत्न फेल गेला आहे. कमल हसन यांना तामिळी जनतेने नाकारले आहे. विधानसभेच्या 22 जागांसाठीही पोटनिवडणूक झाली. यात अण्णाद्रमुकला 11 आणि द्रमुकला 9 जागा मिळाल्या आहेत.

ओडिशात पुन्हा नवीन पटनाईक यांची जादू

ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची जादू कायम आहे.   गेली 19 वर्षे ते मुख्यमंत्री असून आता पाचव्यांदा त्यांना सत्ता मिळाली आहे. देशभरात मोदी लाट असतानाही पटनाईक यांनी हे मोठे यश मिळविले आहे. ओडिशा विधानसभेच्या 146 जागांपैकी तब्बल 112 जागांवर पटनाईक यांच्या बीजेडीने विजय मिळविला आहे. भाजपला 21 जागा मिळाल्या असून 2014च्या विधानसभेत भाजपचे 10 आमदार होते. काँग्रेसचे 10 आमदार होते. काँग्रेसची संख्या 16 वरून 10 पर्यंत खाली घसरली आहे. ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. बीजेडी 15 तर भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. भाजपला येथे फायदा झाला आहे. काँग्रेसला मात्र खातेही उघडता आलेले नाही.

बिहारात महाआघाडीचा सुपडा साफ

बिहारमध्ये  राजद-काँग्रेस महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. ‘एनडीए’ला 40 जागांपैकी तब्बल 38 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप 16, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयुला 16, रामविलास पासवान यांच्या लोजपला 6 जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेसला केवळ एक तर राजदलाही एकच जागा मिळाली.  लालूप्रसाद यादव हे तुरुंगात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र तेजस्वी यांच्याकडे नेतृत्व आहे. लालूंची कन्या मिसा भारती विजयी झाल्या.पटनासाहब मतदारसंघात काँग्रेस उमेदवार, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा ‘खामोश’ झाले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांचा पराभव केला. बेगुसराईमध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे विजयी झाले असून कन्हैयाकुमाराचा दारुण पराभव केला. ‘आरएलएसपी’चे उपेंद्र कुशवाह या दोन मतदारसंघांत पराभूत झाले. माजी मुख्यमंत्री जितराम मांझी यांचाही गया मतदारसंघात पराभव झाला आहे.

 राजस्थानात 2014ची पुनरावृत्ती

विधानसभा  निवडणुकीत सत्ता मिळविणाऱ्या काँग्रेसला राजस्थानात प्रचंड पराभवाचा झटका बसला आहे. सर्वच्या सर्व 25 मतदारसंघांत भाजपने मोठा विजय मिळविला. भाजपचे 24 पैकी 7 उमेदवार दीड लाखावर मताध्क्याने विजयी झाले. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षालाही एक जागा मिळाली आहे. 2014 ला राजस्थानातील सर्वच जागा भाजपकडे होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे.

केरळमध्ये काँग्रेस-यूडीएफचा विजय

केरळमध्ये काँग्रेस- यूडीएफ आघाडीने मोठे यश मिळविले आहे. 20 जागांपैकी 19 जागा या आघाडीला मिळाल्या आहेत. सत्ताधारी माकप आघाडीचा मोठा पराभव झाला असून केवळ एक जागा मिळाली आहे. वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुमारे 4 लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. राहुल गांधींच्या उमेदवारीचा फायदा काँग्रेस-यूडीएफ आघाडीला झाला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला आघाडी

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. लोकसभेच्या 13 जागांपैकी काँग्रेसने आठ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परिणित कौर यांनी अमृतरसमधून मोठा विजय मिळविला. भाजपला दोन तर शिरोमणी अकाली दलाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. गुरुदासपूरमधून भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल विजयी झाले आहेत. 2014ला अकाली दल -भाजप युतीने सहा जागा जिंकल्या होत्या. 2014 ला चार जागा जिंकणाऱ्या आपला यावेळी जोरदार झटका बसला. केवळ भगवंत मान हे संगरूर मतदारसंघातून विजयी झाले.

उत्तर प्रदेशात बुवा-भतिजा जादू चालली नाही

देशातील सर्वात जास्त 80 लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशाकडे अवघ्या देशाचे लक्ष होते. 2014 मध्ये भाजपने तब्बल 70 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने 61 जागांवर विजय मिळविला आहे. यावेळी मायावती यांच्या बसपा आणि अखिलेश यांच्या सपाने आघाडी केली होती. परंतु बुवा-भतिजा महागठबंधनला  यश मिळाले नाही. बसपा 10, सपाला 6 जागा मिळाल्या आहे. राष्ट्रीय लोकदलचे अजितसिंग आणि त्यांचे पुत्र जयंत चौधरी दोघेही पराभूत झाले. पोटनिवडणुकीत गोरखपूर आणि फूलपूर मतदारसंघात सपा-बसपाने विजय मिळविला होता. यावेळी पुन्हा येथे कमळ फुलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  वारासणीमधून तब्बल 4 लाखांची आघाडी घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या