धावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

धावपटू पालेंदर चौधरीने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. 18 वर्षीय पालेंदरने आपल्या वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकून गळफास घेतला. यासंदर्भात हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाने (साई) चौकशीचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात बोलताना ‘साई’चे महासंचालक नीलम कपूर म्हणाले, आत्महत्येची घटना ही जवाहरलाल नेहरू स्टेडियमधील अकादमीच्या परिसरात घडली आहे. त्यामुळे याप्रकरणी आम्ही विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘साई’चे सचिव स्वर्ण सिंग छाबरा यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. आठवडाभरात ही चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पालेंदर चौधरी हा जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरातील अकादमीत असलेल्या वसतिगृहात राहत होता. मंगळवारी सराव संपवून तो सायंकाळी 5.30 वाजता आपल्या खोलीत परतला होता. त्यानंतर 6.30 च्या आसपास त्याने खोलीत गळफास घेतला.